🌹वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!🌹
हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे साजरे करा, हेच आपल्या पूर्वसूरींचे आपल्याला सांगणे आहे. अशात दिवाळी ही सणांची राणी! सगळ्या सणांमध्ये तिच्या आगमनाची उत्सुकता वेगळीच असते. कारण पाच दिवस उत्सवाचा आणि उत्साहाचा माहोल असतो. यंदा कोणत्या दिवशी कोणते सण येणार आहेत, ते जाणून घेऊ.
वसुबारस :
कार्तिक कृष्ण द्वादशीचा दिवस गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो. त्यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. २१ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी द्वादशी सुरू होणार आहे. त्यादिवशी गोमातेची आणि वासराची पूजा करण्याचा मुहूर्त सायंकाळी ५.२९ ते रात्री ८. ७ मीनिटांपर्यंत असणार आहे.
धनत्रयोदशी :
२३ ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आहे. त्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ३ मीनिटांनी त्रयोदशीची तिथी सुरू होणार आहे. अकाली मृत्यू येऊ नये, म्हणून या दिवशी सायंकाळी घराबाहेर म्हणजे पूर्वीच्या प्रथेनुसार परसाकडे दीवा लावला जात असे. हा दीवा यमाला दान केला जात असे, म्हणून त्या विधीला यमदीपदान असे म्हणतात. या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६.२८ मीनिटांनी सुरू होऊन ७. १५ मीनिटांपर्यंत असणार आहे.
नरक चतुर्दशी :
दिवाळीचा तिसरा दिवस, कार्तिक कृष्ण चतुर्दशी. मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार अनेकदा चतुर्दशी आणि अमावस्या तिथी एकत्र येते. त्यामुळे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी केले जाते. यंदाही दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. परंतु त्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.२८ मीनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होणार आहे. हा दिवस नरक चतुर्दशीचा म्हणजेच अभ्यंग स्नानाचा, पहिल्या अंघोळीचा असणार आहे. नरकासूराचे प्रतीक म्हणून याच दिवशी पहाटे अंघोळ झाल्यावर कारिंटे पायाने फोडण्याचा आपल्याकडे प्रघात आहे.
लक्ष्मीपूजन :
लक्ष्मीपूजन देखील २४ ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दिवशी सोमवती अमावस्यादेखील आली आहे. ही तिथी सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून लक्ष्मी पूजेची वेळ सायंकाळी ६. वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असणार आहे. यंदा लक्ष्मी पूजेबरोबर महादेवाची पूजा करणे शुभ ठरेल.
गोवर्धन पूजा :
दिवाळीचा चौथा दिवस गोवर्धन पूजेसाठी तसेच अन्नकूट यासाठी राखीव ठेवलेला असतो. यंदा भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी अन्नकुट असल्याचे दिनदर्शिकेत सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळावर आलेले नैसर्गिक संकट परतावून लावण्यासाठी आणि गोकुळवासियांचा अतिवृष्टीपासून बचाव करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. निसर्ग हाच आपला देव आहे, त्याची राखण करा, पूजन करा, सन्मान करा, हा संदेश भगवंतांनी आपल्या आचरणातून दिला होता. हे स्मरणात ठेवण्यासाठी दिवाळीच्या चौथ्या दिवशी गोवर्धनाची प्रतीकात्मक पूजा केली जाते. किंवा कृष्णाला दूध-सारखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि निसर्गाशी नाते जोडावे, म्हणून या दिवशी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गोमातापूजन केले जाते. गोरगरीबांना अन्न,धान्य,शिधा दिला जातो.
भाऊबीज :
दिवाळीचा शेवटचा पण महत्त्वाचा दिवस भाऊबीजेचा. यंदा २६ ऑक्टोबर रोजी बुधवारी भाऊबीज आली आहे. त्यालाच यम द्वितीया असेही म्हणतात. ते यासाठी कारण, भाऊबीजेच्या दिवशी यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाकडे समस्त भावांच्या प्राणांचे दान मागून घेतले होते. परंतु, हे दान सृष्टीनियमाविरूद्ध असल्याचे यमाने सांगितले. बहिणीचे मन मोडू नये, म्हणून यमराजाने भाऊबीजेच्या दिवशी शक्यतो भावा-बहिणीची ताटातूट होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तेव्हापासून या सणाला यम द्वितीया असे देखील म्हटले जाऊ लागले. भाऊबीजेचा शुभमुहूर्त दुपारी १ वाजून ४३ मीनिटांनी सुरू होणार आहे.🌹 विश्वास गुरुजी🌹