तारुण्याचा उंबरठ्यावर…

नाशिकचे सुप्रसिद्ध मानसशास्रतज्ञ डॉ. शिरीष राजे यांनी तारूण्यात प्रवेश करणारा आपला सुपुत्र चि. अर्हान राजे यांस लिहीलेले हे पत्र… ते आयुष्यातील सुंदर व वास्तववादी विचारांनी ओतप्रोत आहे

सर्व नव तरुणांना महत्वाचे पत्र

माझ्या प्राण प्रिय लाडक्या चि.अर्हान यांस ….

बच्चा आज तुझा वाढदिवस.
तु आता १८ वर्षांचा झालायेस ..
म्हणजे सज्ञान, जाणता…
नवयौवनात प्रवेश करणारा,
पण, तितक्याच संवेदनशील स्थितीतुन तुझा जीवन प्रवासही सुरू होतोय…
या निमित्ताने मी जे पत्र तुला आज लिहितोय, …..
ते तू नीट वाच आणि ठरव..!!!
हवे तर, हे पत्र तू सेव्ह ही करून ठेव

बेटा, जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाहीत. सगळंच अतर्क्य.

आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोलायलाच हव्यात.

मी जन्मदाता आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते कदाचित तुला इतर कुणीही कधीच सांगणार नाही.

मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास खूपच कमी होईल. …

बेटा, प्रथम हे सतत लक्षात ठेव की, कधीही कोणत्याच माणसांविषयी मनात आकस ठेवू नकोस. कुणाचा ही द्वेष करू नकोस.

तुझ्याशी सर्वांनी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी सक्ती आपण कुणावरही करू शकत नाही. त्यामुळे ते असंच का वागतात ? असं म्हणून कधीही तणतणू नकोस.
तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त तुझ्या आईबाबांचीच आहे. तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तर चांगलं वागच. परंतु जे तुझ्याशी तुसडेपणाने वागतात त्यांच्याशी देखील तू वाईट वागु नकोस. पण हे देखील कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट, कुठल्या ना कुठल्या हेतुपोटी करीत असतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगली वागतात त्यांना तू खरंच आवडत असशीलच असे ही नव्हे, हेतुपुर्तीसाठी कदाचीत ते असे वागु शकतात.
तेव्हा माणसं जरा तपासून बघत जा. पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची कदापीही घाई करू नकोस. विश्वासघाताचा फटका बसु शकतो.

जगणं कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलय , ते तुझ्या आयुष्यातून निघून ही जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं कधीच थांबत नसते. आणि थांबतही नाही.

आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज तू वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाऊ शकते. त्यापेक्षा आजच मनापासून, भरभरून जग, आनंदी रहा. आनंदी जगणं उद्यावर अजीबात ढकलु नकोस.

प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणे बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतो ते समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतात. माझ्या परमपुजनीय मातोश्री म्हणजे तुझ्या आजी स्व. सौ. आक्कासाहेब ह्या गेल्यानंतर मी कित्येक दिवस अस्वस्थ होतो. परंतु कालांतराने मी देखील सेट झालोच ना ? या करीता काळ हे सर्वोत्तम औषध आहे. हे मनावर बिंबव. तसे सदैव लक्षात ठेव.

प्रेमात पडला म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं कधीही समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खाला जास्त कवटाळून ही बसू नकोस.

अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झालेत. अशा कहाण्या तू वाचल्या असशील, पण याचा अर्थ असा नाही की, शिक्षण सोडलं की तू यशस्वीच होशिल. ज्ञान हे एक शस्त्र आहे हे सदैव लक्षात ठेव, ते मिळवण्याचा प्रयास सातत्याने कर. कारण शून्यातूनच स्वर्ग निर्माण करता येतो म्हणुन आधी शून्यापासून सुरुवात ही करावी लागतेच. हे लक्षात असूं दे!
माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावसं, मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तेव्हा तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोपर्यंत तुला मदत करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे.
त्यानंतर मात्र तुला बसमधून फिरायचं की रोल्स राईस किंवा लिमोझीनमधून, …. म्हणजे गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय सर्वस्वी तुझा तुलाच घ्यायचाय.

आणखी शेवटचं एक, अनेक लोक लॉटरीचं तिकीट काढतात, पण एखाद दुसरा सोडून सर्वच श्रीमंत होतात का ? तेव्हा एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही.

श्रीमंत व्हायचं तर ध्येयाच्या अंतापर्यंत प्रयास करावेच लागतात. कारण जगात फुकट कधीच काही मिळत नसते.

या करीता तुला उदंड यश लाभो.
तुझे मनोबल उंच राहो….
हेच शुभाशिष

3 thoughts on “तारुण्याचा उंबरठ्यावर…”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top