कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको

कहाणी अनोख्या रिझल्टची

यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत. परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला आहे त्यामुळे या निकालाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.


परिक्षा न घेताच निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहिसे थट्टेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोविड बॅच, लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास अशी शेरेबाजी सुरू झाली आहे.

Whatsapp वर अशा अनेक मीम्स, वात्रट विनोद यांचा भडीमार होत आहे. या शर्यतीत लंगड्या घोड्यांनीही बाजी मारलेय त्यामूळे पेढे वगैरे वाटून, कौतुक करण्यासारखे विशेष काहि नाहि अशी कुजकट बोलणी करणारेही काहि महाभाग आहेत.

अशावेळी ज्यांनी करोनाच्या या महासंकटात, अत्यंत विपरीत परिस्थितीत, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातील एका महत्त्वाच्या परिक्षेचा अगदि जीव तोडून अभ्यास केला आहे त्या प्रामाणिक कोवळ्या मनांवर अशाप्रकारे खिल्ली उडवून आघात करणे योग्य नाहि याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.


करोनाच्या या महाभयंकर संकटाला आपला देश आणि सर्व जग पहिल्यांदाच सामोरे जात आहे. कित्येक गोष्टी या test and trial basis वर केल्या जात आहेत कारण या अशा विपरीत परिस्थितीत नेमक्या काय योजना आखाव्यात, कशा प्रकारचे नियोजन करावे याचा पुर्वानुभव कोणालाच नव्हता त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सरकारने हा जो काहि निर्णय शालांत परिक्षेच्या बाबतीत घेतला आहे तो योग्यच म्हणायला हवाय. दुसरा काहि पर्यायच नव्हता. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अगदि योग्यच आहे.

न भुतो न भविष्यती


इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती सर्वांचीच होती. दहावी – बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात करोनाचे महासंकट उभे राहिले होते. घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले होते. शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्या होत्या. परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जातील याची काहिच पुर्वकल्पना विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसेच शिक्षकांनासुद्धा नव्हती. सर्वच गोंधळाचे वातावरण होते. online अभ्यासात अनंत अडचणी होत्या. शेवटि प्रत्यक्ष वर्गात बसून, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी मित्रांच्या सहवासात केलेला अभ्यास आणि घराच्या एका कोपऱ्यात बसून मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर यापूर्वी कधिही न अनुभवलेला असा अभ्यास यामध्ये खूपच फरक आहे. या अभ्यासाला सरावण्यासाठीच मुलांना काहि काळ लागला.

या महत्वपूर्ण परिक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे दडपण मुलांवर असतेच त्यात हि अशी विपरीत परिस्थिती…. अशावेळी मुलांची मानसिक स्थिती काय असावी याचा अंदाज न केलेलाच बरा. शहरातील मुलांना तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध असतात पण गाव खेड्यातील मुलांच्या अभ्यासाची तर पार दैना उडाली आहे पण दोष तरी कोणाला द्यायचा ? काहि अपवाद वगळले तर बरेचसे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करत होते. शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यात अडचणी असल्याने यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या काही शैक्षणिक सुविधांचा पर्याय शोधला जात होता. जमेल त्याप्रकारे विषय समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते कारण कुठल्याही स्वरूपात परीक्षा होणारच हिच धारणा होती. त्यासाठी जीव तोडून अभ्यास केला जात होता.

हे नसे फुकाचे, प्रयत्न असे अनेकांचे

शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या विविध अंतर्गत चाचण्यांना प्रामाणिकपणे सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मुलांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना, मेहनतीला दाद द्यावीच लागेल. परीक्षा घेतल्या जाणार नाहित हा निर्णय अगदि शेवटी घेतला गेला होता त्यामुळे मुलांनी आता मिळवलेले गुण हे फुकटचे आहेत असे कोणीहि म्हणू नये.

या वर्षातील त्यांची मानसिक स्थितीसुद्धा लक्षात घ्यावी. काहि दुर्दैवी मुलांनी तर जॉब घालवून घरात बसलेले बाबा, कोविड सेंटरमध्ये १५ दिवस विलगीकरणात गेलेले पालक, जवळचे गमावलेले नातेवाईक असे आघातसुद्धा सहन केले होते.

कौतुकाची थाप हवीच


अशा एकूण परिस्थितीत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केलेच पाहिजे. नेहमीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापन कदाचित झाले नसेलहि परंतु या मिळवलेल्या गुणांचे महत्व त्यामुळे कमी होत नाहि. काहींना अपेक्षेहून जास्त तर काहि प्रामाणिक कष्ट केलेल्या मुलांवर अन्यायसुद्धा झाला असेल पण प्राप्त परिस्थितीत दूसरा कोणता ईलाजहि नाहि हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. या कोवळ्या मनांना उभारी देण्याचे काम आपणच करायला हवे.

त्यांच्या मनात कोणताहि प्रकारचा न्यूनगंड निर्माण होणार नाहि याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कौतूकाचा पेढा त्यांच्या तोंडात भरवलाच पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कुठेही कमी पडणार नाहि याची काळजी सुद्धा घ्यायलाच पाहिजे.

👍💐

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top