Author: admin

  • ‘भक्ती’ काय चीज असते… !!

    सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता.
    सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.
    सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.
    आज फक्त ३७ अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.
    त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.’

    तर, हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकर्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं.सगळे भोजनाने खूश झाले. पण मनोमन दु:खी होते कारण त्या वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती.
    तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की,आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला.

    सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की, “यांना धान्य वाटून सगळंच संपेल. मग आपण वर्षभर काय खायचं.?”
    तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले.
    तो म्हणाला, ” हे बघ, जर निर्जिव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का ? “

    सर्वांना आनंदाने धान्य वाटणा-या या दांपत्याला हसायला सारा गाव आला होता. नको नको ते बोलत होते. कुटाळक्या , चेष्टा, टोमणेगीरी. पण हे आपले शांत होते.
    सारं धान्य वाटून संपलं. दुस-या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरवात केली सावत्याने. पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागू गेला तरी कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की, “हे कडू भोपळे सकाळ, संध्याकाळ भाजी बनवुन वर्षभर रोज खायला तुला पुरतील.”
    सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरवात केली. सारा गाव हसत होता. कारण कडु भोपळा तर गुरं पण खात नाहीत !

    त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस बसेल एवढे मोठे मोठे कडु भोपळे लागले वेलींना. सा-यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का.? मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करीत असत रोजच. कडु भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत. भजन करीत पांडुरंगाचं. थोडी कुठे मोल मजुरी करून दुस-यांच्या शेतावर, मग घरी येत असे.

    होता होता लोक विचारू लागले की,” तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार.?” एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपो-या दाण्यांनी भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर. सावताचे डोळे पाणावले. ” किती रे देवा तुला काळजी माझी..!”

    मग दुस-या दिवशी पण भोपळ्यातुन गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वा-यासारखी पसरली. सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले. कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे.
    ही बातमी त्यावेळेसच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत: आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहीवरला व नमस्कार करून म्हणाला, “धन्य तुमची भक्ती! “
    यानंतर सावता अधिकच विरक्त झाला..

    “आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरीतार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी.”

    आपण सगळे कडू भोपळेच असतो. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा ना.. नामाचा महिमा आहे.

    🙏🙏🙏🙏

  • मनातलं कानात सांगण्याची हिम्मत झाली नाही

    त्यांची मैत्री काहीअगदी जुनी नव्हती पण अगदी दह्यासारखी घट्ट होती त्याचे कारण ही तसेच कारण ती होतीच तशी कुणालाही भूरळ पडावी अशी, सुरेल आवाज, घायाळ करणारे घारे डोळे ज्यांना कधीच काजळाची गरज पडली नाही, ओठ जणू रसाळ गुलाबी पाकळ्या, ती कपाळावर येणारी नाजूक बट, गालावर पडणारी खळी आणि वर्णन करायला शब्द पुरणार नाही असे अप्रतिम सौंदर्य.
    त्याचा श्वास,ध्यास पण आभास होती ती. ती नेहमी त्याच्याकडे आपले मन मोकळे करायची, तिचा आवाज ऐकताना तो तल्लीन होऊन जायचा आणि नुसतं ऐकत रहायचा तिने त्यांना लळा लावला होता. दिवस मजेत चालले होते, दोघे छान बेस्ट फ्रेंड म्हणून वावरत होते एकमेकांशिवाय त्यांना कधीच करमत नसे. खूप मस्त केमिस्ट्री जुळून आली होती, तशी त्यांच्यात घट्ट मैत्री होती पण तो मात्र खूप प्रेम करायचा तिच्यावर तेही अगदी मनापासून व ते फक्त त्याच्या मनात होते तिला सांगण्याची हिम्मत तो शेवट पर्यंत करू शकला नाही.
    अचानक एक दिवस उजाडला ज्या दिवशी त्याला तिच्या लग्नाची वार्ता कळाली, तो क्षणभर फक्त स्तब्ध झाला त्याला कळेनासं ना की आता काय करावे त्याचे पुढे काय होईल कसा जगू शकेल तो तिच्याविना. तो तिच्या शिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हता, क्षणार्धात त्याच्या प्रेमाचा सुरू होण्याआधी अंत झाला होता. पण हे फक्त एक क्षणच, पुढच्याच क्षणी त्याने स्वतः ला सावरलं आणि तिचं मनापासून अभिनंदन केलं, तिने त्याला गळ्याशी धरलं ते शेवटचच, कारण ही त्यांची शेवटची भेट ठरू शकणार होती.
    मग त्यांचे भेटणे कमी होत गेले ती आता संसाराच्या स्वप्नात रमायला लागली होती, यथावकाश तिने त्याला लग्नाची पत्रिकासुद्धा पाठवली पण जसजसा तिच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता याच्या मनातील घालमेल वाढत होती. त्याला तिच्या शिवाय राहवत नव्हतं तिच्याशी साधे बोलणेसुद्धा आता कमी झालं होतं, आणि मग त्याने तिला विसरायचं आणि नव्याने आयुष्य जगण्याची तयारी सुरू केलं पण शेवटी प्रेमात आपल्या हातात काही राहत या उक्ती प्रमाणे तो तिला विसरू शकत नव्हता,डोळे बंद केले तरी त्याला तिचेच डोळे दिसायचे तिचा तो मोहक गंध त्याला अजूनही जाणवत होता, तिचा नाजूक आणि सुरेल आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता.
    त्यांच्या पक्क्या मैत्री मुळे तो तिच्या लग्नाला गेला, लग्नात ती सुद्धा त्याला पाहून गहीवरली, त्याने तिला प्रेमाने आणलेला गुलाबाचा पुष्कगुच्छ दिला अगदी लाल-भडक गुलाबांचा, तो देतांना त्याच्या डोळ्यात प्रेम, विरह, त्याग आणि अनामिक भिती दिसून होती. भीती होती ती तिच्या शिवाय आयुष्य जगण्याची, भीती होती ती स्वतः वर संयम ठेवून घेतलेला निर्णय चुकण्याची पण तरी त्याने तिला तो पुष्पगुच्छ दिला आणि भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
    पण तरीही शेवटी मनातलं कानात सांगायचच राहून गेलं….

  • नाते अनामिक पण जवळचे

    रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
    तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते.

    साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
    थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
    एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.

    एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, “बाळ, नाव काय तुझं…?”
    मी नाव बोललो
    कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
    मी पुन्हा बोललो
    त्या हसत हसत बोलल्या “अच्छा . छान आहे नाव”
    त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं?

    नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, “डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?” मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, “नाही ओ आजी”. का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, “काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा”
    हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते.

    कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.

    घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, “आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील”

    मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
    दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली

    एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
    संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
    मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या.

    मी विचारलं, “आजी काय करताय हे ?”
    त्या हसल्या आणि बोलल्या…बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.

    कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
    त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
    कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
    जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या “आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे.

    माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला.

    पण कोण कुठला तू… मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो….साहेब होशील मोठा तू “
    मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो.

    तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.

    पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
    मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.

    मी जवळच्या टपरीवर गेलो
    आणि विचारलं, “इथल्या आजी कुठे आहेत ?” त्याने मला पाहिलं आणि बोलला, “अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
    मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून.

    चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
    अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!

    आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन……….

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    कदाचित पोस्ट रिपीट होईल पण अशा विचारांचे संस्करण पून्हा पुन्हा झाल्यास विचार आचारामध्ये परावर्तित होतात!
    💐💐💐💐💐💐💐💐💐(लेखक अज्ञात आहे)💐

  • Time Less : Missing Moments

    टाईमलेस!


    पालथ्या तळव्याला थोडसं चाटून “टॅम्प्लीज” केलंय का कधी? 🤛🏻 लपाछुपीत “धप्पाsss” म्हणून बोंबलायला मिळालंय का? 😹 “नॉटॅठोम” म्हणताना उकळ्या फुटलेल्या आठवतात का? “कटाsssप” म्हणून एखाद्याला डावातून हाकललंय का कधी? गटारीत गेलेला बॉल बाऱ्या लावून काढलाय का कधी? 🎾

    हे सगळं वाचताना जर दिल गार्डन गार्डन होत असेल, तर बिंगो! 💐 तुमचं बालपण कमाssल भारी होतं! परवा घरी अशीच एक मैफल रंगली आणि नुसत्या जुन्या आठवणींनीच्या रानात फेरफटका मारून यायला झालं. 😇

    आपल्या लहानपणीचे खेळ म्हणजे कसे लाइव्ह असायचे ना! उन्हाळी सुट्टी म्हटलं की तर आमचा नुसता धांगडधिंगा असायचा. 🪄नुसता ‘बझ’ असायचा सगळ्या वातावरणात..! भूक, तहान, झोप आणि घरदार विसरून दिवसभर नुसता खेळ, खेळ आणि खेळच मांडलेला असायचा.

    रम्य त्या बालपणी, म्हणजे जेव्हा ‘खेळा’ चा ‘स्पोर्ट्स’ झाला नव्हता तेव्हा आम्ही “डब्बा एक्सप्रेस” (ॲक्चुअली ऐसपैस) हा अतरंगी खेळ खेळायचो. रस्त्यावर खडूने एक गोल आखून, त्या गोलात उभं राहुन जितक्या लांब फेकता येईल तितक्या लांब तो डब्बा फेकायचा. ज्यावर राज्य आहे त्याने पळत जाऊन तो डब्बा आणून पुन्हा गोलात ठेवायचा. तो आणेपर्यंत बाकीचे गडी लपायचे. मग एकेकाला हुडकून (होय.. शोधायचो नाही.. हुडकायचो… :)) त्याच्या नावाने डब्यावर पाय ठेवून “अमक्याचा डबा-ऐसपैस” असं ओरडायचं. या लपंडावात धप्पा देणे म्हणजे गोलातला डब्बा लाथ मारून उडवणे. जाम राडा घालायचो यार गल्लीत! 💃🏻

    ऑल टाईम टॉप “लपंडाव” खेळताना लपणारे देखील हुशार! एकमेकांचे शर्ट आणि टी-शर्ट बदलून लपायचे. बिचाऱ्या गड्यानं चुकीचं नाव घेतलं की मग अंडं. नाहीतर सगळे मिळून त्याला धप्पा द्यायला टपलेलेच असायचे. फार वेळ एखादं बेनं सापडलं नाही तर शेवटी शेवटी त्याला शोधायचा डाव घरातल्या लोकांवर यायचा! 🙆🏻‍♀️

    आणि एक रेट्रो फन म्हणजे “आबाधबी उर्फ धपाधपी”! लै म्हन्जे..लै भारी गेम… त्यात आम्ही प्लस्टिक चा बॉल वापरायचो…जी पाठ शेकुन निघायची..:) चिक्कीबॉल आणि आबाधबी हे तर लईच डोंगर व्हर्जन होतं. चिक्कीच्या वाळक्या शेंगा गोळा करायच्या आणि त्याची चेचुन चेचुन तेल लावून पेस्ट बनवायची. त्या पेस्टचा टणक गोळा बनवायचा. मग त्याच्यावर चिंध्या गुंडाळायच्या आणि वर एक चांगले कापड गुंडाळून वाकळेच्या जाड दोर्‍याने शिवायचो. त्याने धबाधबी खेळायची. खतरोंके खिलाडीच आम्ही जणू! पण धबाधबी खेळण्यापेक्षाही चिक्कीबॉल बनवणे माझे आवडते काम आणि माझी स्पेशालिटी! 🎾

    आणि “आडमिट किडा” आठवतोय का? राज्य असलेला (तेच ते आजकालचं ‘डेन’ असलेला) गडी एखादं मुक्काम पोस्ट सांगायचा. ते ठिकाण लोखंडाच्या वस्तूंना शिवत शिवत गाठायचं. ⛳प्रकरणात जर एखादा पाण्याचा पाइप वगैरे हाताशी आला की मग निवांत. त्यात मुद्दाम आम्ही खिशात खिळे वैगेरे लपवुन ठेवायचो..आणि वस्तु नसली कि मुद्दाम रस्त्यात फेकायचो. लोखंडच शिवलंय याचं प्रूफ दाखवायला मी तर खिशात मॅग्नेट (लवचुंबक ?🧲🤣) सुद्धा बाळगायचे.

    मग त्याचाच सावत्र भाऊ “टीपी टीपी टॉप टॉप”, व्हॉट कलर यू वाँट”? यायचा. काहीतरी भारी रंग सांगायचा शिवायला, सोनेरी, चंदेरी वगैरे. हा खेळ ठरला कि पोरं घरी जाऊन मल्टीकलर्ड कपडे घालून यायची म्हणजे जास्त लांब पळायला नको. 🪂

    क्रिकेट खेळायला तर १० बाय १२ ची बोळ वजा जागा पण पुरायची. 🏏 धुणं धुवायचं धुपाटणं घेऊन, सतराशे साठ नियम करून खेळायचो. एक टप्पा आऊट, कंपाऊंड बाहेर मारला कि आऊट, काचेला / गाडीला कसापण लागला कि आऊट, व्हरांड्यात २डी, भिंतीला बाऊंड्री आणि डायरेक्ट कंपौंडला सिक्सर! लई झांगडगुत्ता असायचा लेको! 🤯

    आणखी एक लो बजेट खेळ असायचा – “दही भात द्या, पुढंsss जावा..!” घरातल्याच ४ कोपर्‍यात उभे राहयचे नी ज्याच्यावर डाव असेल त्याने हाताचा पसा करत मागायला यायचे. यावर कोपर्‍यातल्याने “त्या घरी जा” म्हणून लांब पाठवायचे नी मग २ कोपर्‍यातल्यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात जागा बदलायची… बदलताना पकडले तर आऊट! कायच्या काय खेळ, पण मजा यायची. 😻

    ऑलंपिक लेव्हलचं नेमबाजीचं स्कील लागणारा आणि एक खेळ होता! तुम्हाला “वश्टर” 🪃 आठवतोय का? आधी कचायचे. मातीत एक रिंगण आखायचे रिंगणापासून पाच-सहा फुटांवर एक खच्च्या (रेघ) काढायची. प्रत्येकाने ठरलेली रक्कम किंवा एक / दोन अशा ठरलेल्या कोया / काचा डावावर लावायच्या.आणि एकेकाने त्या खच्च्यावरून ते त्या रिंगणात टाकायचे. एकही कोय् /नाणं / काच रिंगणाच्या बाहेर गेले की आऊट! आपण खच्च्यावरून ठराविक नेम धरून एकाच प्रयत्नात तिला रिंगणाबाहेर काढायचे. ती रिंगणाबाहेर निघाली तर सगळ्या कोया / पैसे / काचा आपल्या. फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करायला कुठल्या कुठल्या उकिरड्यांजवळ फिरायचो. आता आठवलं तरी अंगावर काटा येतो. ईईईई….. तेव्हा सगळं कमाल वाटायचं.

    आणि एक जबराट प्रकरण होतं टायर्स फिरवणे 🚲. जुने टायर्स घेऊन ते पळवत त्याची शर्यत लावायची! खूप धमाल यायची टायर्स पळवायला! ते टायर घेऊन मनमुरादपणे रस्त्याच्या, गटारीच्या कडेला, मोकळ्या मैदानात, गल्ली-बोळातून टायरवर काठीच्या टकटकाटात गोंधळ घालायचो. कधी चुकुन गटारीत वगैरे गेले तर हापशा बोरिंगवर निरमा लावून धुवायचो. त्याचे इतके वेड लागलेले असायचे त्याचे कि, घरातल्यांनी दुकानातुन सामान आणायला सांगीतल्यावरही टायर फिरवत फिरवत दुकानला जायचो! 🏂

    जिबली / ठिक्कर पाणी – फरशीचा / खापराचा तुकडा घेउन त्याला थुंकी लावुन या रकान्यात फेकायचा आणि एका बाजुने लंगडी खेळत जाउन तो पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायचा…रेषेवर पडला तर आउट! 🤸🏻

    बाकी लगोरी, लंगडी, कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, पकडा-पकडी, सोनसाखळी, सुरपाटी, खाम्ब खाम्ब खाम्बोळी, शिवाजी म्हणतो, विषामृत, लंडन लंडन स्टॉप, दगड का माती, दोरीवरच्या उड्या.. 🤼‍♂️कितीतरी खेळ. आणि रुमालपाणी राहिलंच की!

    यापैकी कुठल्याही खेळाला अमूक एक जागा किंवा तमूक एक सेट अप अशा कुठल्याच नख-यांची गरज नव्हती.

    बैठ्या खेळांची तर बातच अलग! काचा कवड्या – हे ‘लूडो’चं देसी व्हर्जन! पाटाच्या उलट्या बाजुने खडुने किंवा कोळ्श्याने आखुन चिंचोक्याचे दोन भाग करुन खेळायचो.. 🎲

    पत्ते.. पत्त्यांमधले बरेच खेळ – झब्बु, बदाम सात, पेनल्टी, लॅडिज.. वक्कखई.. ते लाडू कळ्या.. अजुन कित्ती तरी… चॅलेंज! चॅलेंज – उचलेंज खेळताना तर काय वाट्टेल ती चोरगिरी करायचे दादा-ताई लोक. 😎

    नाव-गाव-फळ-फूल या यादीत आम्ही हळु हळु प्राणी, पक्षी, वस्तु, रंग, मेनू, नाटक / सिनेमा असं वाट्टेल ते जोडलं होतं. वह्याच्या वह्या भरल्या होत्या. आणि अजूनही भरतात बरं का! 📘🖊️

    नवा व्यापाराची सुरुवात तर त्याच्या पातळ नोटांना नुकत्याच संपलेल्या शाळेच्या वह्यांचे पुठ्ठे चिकटवून व्हायची. ⚖️मुंबई बघून माहित नव्हती तेंव्हा, पण सगळ्या भागांची नावे मात्र तोंडपाठ! दररोज एकेकाच्या घरी दुपारचे जेवण आटोपुन बसायचो ते थेट संध्याकाळ पर्यंत. खूप मजा यायची. त्यातील चिराबाजार, गेट वे ऑफ इंडिया, वाळकेश्वर, चौपाटी… अहाहा! बहार!

    राजा – राणी – चोर – शिपाई, फुली – गोळा, बिट्ट्या (ते वर टाकून काही काही म्हणून झेलायचा खेळ), पेनच्या रिकाम्या रिफीलनी साबणाच्या पाण्याचे फुगे, हिंगाच्या डब्याच्या झाकणांचे तराजु, नारळाच्या करंटीचे सुतळी ओवून केलेले फोन? क्रिएटिव्हिटीची कमाल! 🥇

    घर घर …. ह्या खेळाशिवाय लहानपण पुर्ण होउच शकत नाही.. घर बनवण्यासाठी चटइ, साडी, छत्र्यांचा वापर .. शेंगदाणा उघडुन त्यात गुळ घालून चिकटवलेले लाडू! ⛱️⛺

    आणि “डॉक्टर-डॉक्टर” 🧑🏻‍⚕️! म्हन्जे क्वॉय..! या लिजन्डरी खेळाबद्दल काय सांगू! भा. पो. करून घ्या!!😜

    दिवेलागणी झाली की जिन्यामधे बसून भुताच्या गोष्टी 🧞‍♀️🧟‍♂️🧟‍♀️आणि एकेक ऐकीव किस्से! रात्री लाईट गेल्यावर अंताक्षरी!🎼 नॉस्टॅल्जिया!

    तेव्हाचे खेळच असे असायचे की व्यायामाची गरज नव्हती पडत. “अयंऽऽ आपडे (प्रिया – याप्रि – आपडी… नावाच्या अपभ्रंषाचा अडनिडा प्रवास!), तुला मम्मीनं बोलवलंय”,🗣️ जोपर्यंत असा निरोप येत नसे, तोवर आमचं गावभर हुंदडनं चालूच असायचं.

    आंब्याच्या वाळवलेल्या कोया, चिंचोके, गोट्या, बिट्टया, कवड्या, काडेपेटीची चपटी करून साठवलेली पाकिटं, सॉफ्टड्रिन्कच्या बाटलीची चपटी केलेली झाकणं, रंगीबेरंगी बांगड्यांच्या काचा हाच लहानपणीच्या बँकबॅलन्स 💰 असायचा.

    ते ‘टॅम्प्लीज’ time please असतंय, ‘कटाप’ म्हणजे cut off असतंय, तर ‘नॉटॅठोम’ म्हणजे Not at Home असतंय, हे फार उशीराने समजलं.. समजेपर्यंत या क्रांतीतले सगळे भिडू कुठे तरी हरवून गेले. असलं बरंच काय काय आठवायला लागलं की स्क्रीन धूसर का होतो कळत नाही. 😭

    हे खेळ बनवण्यार्‍यांना आणि खिलाडूपणा शिकवण्यार्‍या सलाम! आणि ह्या सर्व खेळांनी बहरलेल्या लहानपणाला सलाम! 🙏🏻

    आजकालची पोट्टी, त्या बकवास व्हीडीओ गेमची बटने दाबत… नुसती घरी बसलेली दिसली कि डोक्याचा जयकांत शिक्रे 😡 होतो! आपणही आपल्या मुलांसाठी उरफोड करतोच ना? पण मग कुठे तरी सगळं ‘आउटफोकस’ का बरं होतंय?

    आजही मुलं हे खेळ खेळू शकतात. पण कदाचित आपणच त्यांना त्या खेळांपर्यंत न्यायला कमी पडतोय कि काय.. रिऍलिटी चेक व्हायलाच हवा! सुदैवानं खूप उशीर झालेला नाहीये. आताच हालचाल केलीतर ‘आम्ही बि घडलो तुम्ही बी घडाना’ म्हणता येईलच! 👍

    यातूनच आपले बालपण समृद्ध झाले होते. मग आता हा टाईमलेस 🔮 वारसा पुढच्या पिढीकडं पोहोचवायलाच हवा, नाही का? नुसतीच भौतिक सुखं पुरवण्यापेक्षा, हा सोनेरी ठेवा हस्तांतरित करूया! अल्ला मंतर… कोल्ला मंतर…म्हणत बिनपैशांचा तो आनंद घेऊया आणि देऊया सुद्धा! तीच खरी श्रीमंती! 💫

  • अथर्वशीर्ष म्हणजे काय…?

    अथर्वशीर्ष

    थर्व म्हणजे हलणारे आणि
    अथर्व म्हणजे ‘ न हलणारे
    शीर्षम् ‘ !!

    सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे
    अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी
    असलेलं मस्तक…!!

    अथर्वशीर्षाचं पठण केलं, की
    बुद्धी आणि मन स्थिर होतं.

    स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं.
    आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो.
    अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं.
    आपल्या मनाची ताकद वाढविणं,हे आपल्याच हातात असतं.
    माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे.
    शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण
    संकटांवर मात करू शकतो.

    तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे कां ? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही.
    तुम्ही श्रद्धाळू असाल, तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल,आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल,तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल.
    कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश
    म्हणजे या विश्वातील निसर्ग…!!
    पृथ्वी, आप, तेज, वायू आणि
    आकाश या पंचमहाशक्तीच
    आहे, असे म्हटले आहे.

    हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे
    म्हणणं तुमच्या वैज्ञानिक
    दृष्टीकोनाला नक्कीच पटेल.
    या निसर्गाला आपण जपलेच
    पाहिजे.
    तरच निसर्ग आपणांस जपेल असेही म्हणतां येईल.

    अथर्वशीर्षाचा अर्थ

    मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष
    संस्कृतमध्ये आहे.
    आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहू या.

    ‘हे देवहो, आम्हांला
    कानांनी
    शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी
    चांगलं पाहावयास मिळो.

    सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी
    देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनांत व्यतीत होवो.

    सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो.
    ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण
    करतो.
    संकटांचा नाश करणारा गरूड आमचं कल्याण करतो.
    बृहस्पती आमचं कल्याण करतो.
    सर्वत्र शांती नांदो…!!

    ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो.
    तूच ब्रह्मतत्त्व आहेस.
    तूच सकलांचा कर्ता(निर्माता)
    आहेस. तूच सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस.
    तूच सृष्टीचा संहार करणाराही
    आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप
    खरोखर तूच आहेस.
    तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस.

    मी योग्य तेच बोलतो, मी खरं
    तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.
    तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं,
    तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण
    करणाऱ्या माझं तू रक्षण कर.
    दान देणाऱ्या अशा माझं तू
    रक्षण कर. उत्पादक अशा,
    माझं तू रक्षण कर.
    तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर.

    माझं पश्चिमेकडून रक्षण कर.
    माझं पूर्वेकडून रक्षण कर.
    माझं उत्तरेकडून रक्षण कर.
    माझं दक्षिणेकडून रक्षण कर.
    माझं वरून रक्षण कर.
    माझे खालून रक्षण कर.
    सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू
    माझं रक्षण कर.

    तू वेदादी वाड॒.मय आहेस.
    तू चैतन्यस्वरूप आहेस.
    तू ब्रह्ममय आहेस.
    तू सत् , चित् , आनंदस्वरूप,
    अद्वितीय आहेस.
    तू साक्षात ब्रह्म आहेस.
    तू ज्ञानविज्ञानमय आहेस.

    हे सर्व जग तुझ्यापासूनच
    निर्माण होतं. हे सर्व जग
    तुझ्या आधारशक्तीनेच
    स्थिर राहातं.
    हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,
    हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं.
    पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.
    तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा
    आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस.

    तू सत्त्व, रज आणि तम या
    तीन गुणांपलीकडचा आहेस.
    तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद
    या तीन देहांपलीकडचा आहेस.

    तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचाआहेस.
    तू सृष्टीचा मूल आधार
    म्हणून स्थिर आहेस.

    तू उत्पत्ती, स्थिती आणि लय
    या तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस.
    योगी लोक नेहमी तुझं
    ध्यान करतात.

    तूच ब्रह्मा,तूच विष्णू, तूच रुद्र,
    तूच इंद्र, तूच भूलोक,
    तूच भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि
    ॐ हे सर्व तूच आहेस.

    गण शब्दातील आदि ‘ ग् ‘
    प्रथम उच्चारून नंतर ‘अ ‘चा
    उच्चार करावा.
    त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा.
    तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा.
    तो तारक मंत्रानं ॐ कारानं
    युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र
    ‘ॐगं ‘ असा होतो.

    हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे.
    ‘ग्’ हे मंत्राचे पूर्व रूप आहे.
    ‘ अ’ हा मंत्राचा मध्य आहे.
    अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.
    अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे.
    या गकारादी चारांपासून एक नादतयार होतो. हा नादही एकरूप होतो.
    ती ही गणेशविद्या होय.

    या मंत्राचे ऋषी ‘ गणक ‘ हे होत.
    ‘निचृद् गायत्री ‘ हा या मंत्राचा छंद होय.
    गणपती ही देवता आहे.

    ‘ॐ गंं ‘ ह्या मंत्ररूपानं दर्शविल्याजाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो.
    आम्ही त्या एकदंताला जाणतो.
    त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो.
    म्हणून तो गणेश आम्हाला
    स्फूर्ती देवो.
    ज्याला एक दात असून पाश,
    अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी चौथाहात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल
    असून पोट मोठे आहे, कान
    सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत,
    अंगाला लाल चंदन लावले आहे,
    ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,अशा गणेशाचे जो ध्यान करतो,तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.

    व्रतधारिणांच्या प्रमुखांना,
    व्रातपतीस नमस्कार असो.
    देवसमुदायांच्या अधिपतीला
    नमस्कार असो,
    शंकरगणसमुदायाच्या
    अधिपतीला प्रमथपति
    नमस्कार असो,
    लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी,
    शिवपुत्र, वरदमूर्ती अशा
    गणपतीला माझा नमस्कार
    असो.

    हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या
    गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला, तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्यालाही
    नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणानं, आदरानं जोडले जातात…!!

         🙏🏻🌹🙏🏻
  • कविता जिवाभावाची

    कुणाशी बोलावे नि
    कुणाला टाळावे
    जिवाभावाचे सोडून सारे
    एकटे कसे जगावे……

    तोंडाला मुस्के आणि
    खिशात बाटली(sanitizer)
    दूर-दूर राहून
    माया सारी आटली…..

    प्रत्येकाच्या मनाला
    कोरोनाचा डसे साप
    नुस्ती कनकन आली तरी
    चालताना लागे धाप……

    किती आले हसू तरी
    हसताही येत नाही
    हात केला पुढे तरी
    टाळी कोणी देत नाही……

    थोडा घसा दुखला तरी
    अंग गरम होते
    पोटभर जेऊनही
    तोंड कडू पडते….

    किती-किती जपायचे
    कुठे-कुठे लपायचे
    दाटून आला ठसका तर
    कुठे जाऊन खोकायचे……

    कधी-कधी जखम
    झाली असते मांडीला
    रिपोर्टवर रिपोर्ट सांगे
    मलम चोळा शेंडीला……

    रोगापेक्षा इलाजच
    झाला खूप अवघड
    डोसावर डोस म्हणजे
    नाकापेक्षा मोती जड…

    उपचाराच्या धास्तीनेच
    धष्टपुष्ट खचले
    निसर्गाचे काढे पिऊन
    काही विश्वासाने वाचले…..

    पैसा आडका उभा केला
    तरी खाट मिळेना
    कुठून आली महामारी
    स्मशानही पुरेना…….

    काय खरे; काय खोटे
    हेच कळत नाही
    जिथे पाऊल ठेवला तिथे
    फाटू लागते भुई…….

    अंत नका पाहू दाता
    आता माफ करा
    तुम्हीच आता मायबाप
    बोट आमचे धरा….

    🙏🙏🌹🙏🙏

  • मनस्वास्थ्य सुधारण्याचा तीन क्लृप्ती

    Toddy we all are in tension of Covid-19 virus and we have only news regarding covid-19 virus

    we have to think over our mental health which is currently getting damaged due to this pandemic situation.

    आजच्या या कोरोंना महामारीच्या काळात टीव्ही वा इतर बातम्यामध्ये सर्वत्र फक्त कोरोंना बद्दल चर्चा सुरू आहे.

    आपण आता आपल्या मानसिक आरोग्या विषयी काळजी घेणे घेणे खूप गरजेचे आहे म्हणून हा विडिओ

  • अंबा भवानी स्वारी उंडणगांव

    उंडणगांव येथील समर्थ गणेश मंदिराच्या 300 वर्षाची परंपरा असलेल्या अंबा भवानी देवी च्या स्वारीतील काही सुवर्णक्षण

    स्टेट्स उद्या दिनांक 4 मे ला नक्की

  • फूड रेसिपी

    आता फूड रेसिपी आपल्यासाठी उपलब्ध खालील लिंकवर