Category: कविता

  • गृहिणी

    या कवितेचे कवी कोण आहेत माहित नाही परंतु फारच छान कविता आहे
    👌👌👇
    गृहिणी आहे हे सांगतांना
    अजिबात लाजायचं नाही
    ” घर सांभाळणं ” हे काम
    वाटतं तेवढं सोप्पं नाही

    ती घर सांभाळते म्हणून
    बाकीचे relax असतात
    आपापल्या क्षेत्रामध्ये
    उत्कृष्ट काम करू शकतात

    घराघरातली प्रसन्न गृहिणी
    पायाचा दगड असते
    घराण्याची सुंदर इमारत
    तिच्यामुळेच उभी असते

    घर सांभाळणाऱ्या गृहिणीला
    कधीही कमी लेखू नये
    नौकरी करत नाही म्हणून
    कोणीच तिला टोकू नये

    तिच्या कष्टाचं मोल लावल्यास
    पगार देऊ शकणार का ?
    इतके काबाड कष्ट आपण
    कधी करू शकणार का ?

    नौकरी करणाऱ्या स्त्रियांचं
    निश्चितच कौतुक आहे
    पण समजू नका गृहिणी मध्ये
    काहीतरी कमी आहे

    खरं सांगा गृहिणी सारखी
    कोणती व्यक्ती उदार असते
    घरातल्या सर्वांसाठी
    जी फुकटात राबत असते

    दर महिण्याला पगार मिळतो
    म्हणून आपण नौकरी करतो
    चोवीस तास राबणाऱ्या
    गृहिणीला काय देतो ?

    गृहिणीला पॅकेज देण्याची
    तुमची माझी श्रीमंती नाही
    डॉक्टर , इंजिनियर , बँकर पेक्षा
    तिचा हुद्दा कमी नाही

    मानधन नाही , सुट्टी नाही
    तरीही हसमुख असते ” ती “
    घराचं घरपण टिकून असतं
    जोपर्यंत असते ” ती “

    गृहिणी आहे हे सांगतांना
    मान खाली घालू नका
    बाकीच्यांनी तिच्या समोर
    मुळीच चरचर बोलू नका

    म्हणून म्हणतो गृहिणीचा
    आदर आपण केला पाहिजे
    अन्नपूर्णा , लक्ष्मीला
    पहिला मान दिला पाहिजे

  • पाऊस आला

    गंध मातीचा ओला
    संग पाऊस आला
    माझ्या अंगणी गं बाई
    आज मोगरा फुलला
    छुळुक वार्याची गं शांत
    धुंद झाला आसमंत
    सखा आहे हा पाऊस
    सखीनदी विसरे भ्रांत
    किती आसुसले होते
    सख्या तुझ्या येण्यासाठी
    धणधाण्य सुख संपत्ती
    घेऊनि ये माझ्या साठी
    तुझ्या येण्यानिच होते
    माझ्या घराचे गोकुळ
    तुझ्या साठी सर्जा राजा
    शेतकरी ही आतुर
    सांग सावळ्या मुरारी
    कशी आहे याची रीत
    ऊन सावली सारखी
    दाखवतो न्यारी प्रित.
    सौ.कादंबरी कमलाकरराव कादी. शिवना.

  • देऊ नको देवा कधी मला गर्व

    देऊ नको देवा
    कधी मला गर्व
    तुझ्या पायी अर्पण
    देवा माझे सर्व
    सुख दुःख
    तुच दिली साथ
    दरीमध्ये कोसळतांना
    घट्ट धरला हाथ
    आलं आता जीवनात
    आनंदाचे पर्व
    कधी नको देऊ
    देवा मला गर्व
    तुच माझा प्राण
    तुच माझा श्वास
    तुच माझ्या ह्रदयाची
    जगण्याची आस
    तुझ्या पायी अर्पण
    तण,मन,धन सर्व
    कधी नको देऊ
    देवा मला गर्व


    सौ.कादंबरी कमलाकरराव कादी.शिवना. ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.

  • नाते अनामिक पण जवळचे

    रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
    तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते.

    साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
    थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
    एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.

    एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, “बाळ, नाव काय तुझं…?”
    मी नाव बोललो
    कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
    मी पुन्हा बोललो
    त्या हसत हसत बोलल्या “अच्छा . छान आहे नाव”
    त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं?

    नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, “डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?” मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, “नाही ओ आजी”. का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, “काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा”
    हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते.

    कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.

    घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, “आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील”

    मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
    दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली

    एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
    संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
    मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या.

    मी विचारलं, “आजी काय करताय हे ?”
    त्या हसल्या आणि बोलल्या…बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.

    कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
    त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
    कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
    जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या “आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे.

    माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला.

    पण कोण कुठला तू… मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो….साहेब होशील मोठा तू “
    मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो.

    तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.

    पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
    मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.

    मी जवळच्या टपरीवर गेलो
    आणि विचारलं, “इथल्या आजी कुठे आहेत ?” त्याने मला पाहिलं आणि बोलला, “अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
    मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून.

    चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
    अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!

    आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन……….

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    कदाचित पोस्ट रिपीट होईल पण अशा विचारांचे संस्करण पून्हा पुन्हा झाल्यास विचार आचारामध्ये परावर्तित होतात!
    💐💐💐💐💐💐💐💐💐(लेखक अज्ञात आहे)💐

  • कविता जिवाभावाची

    कुणाशी बोलावे नि
    कुणाला टाळावे
    जिवाभावाचे सोडून सारे
    एकटे कसे जगावे……

    तोंडाला मुस्के आणि
    खिशात बाटली(sanitizer)
    दूर-दूर राहून
    माया सारी आटली…..

    प्रत्येकाच्या मनाला
    कोरोनाचा डसे साप
    नुस्ती कनकन आली तरी
    चालताना लागे धाप……

    किती आले हसू तरी
    हसताही येत नाही
    हात केला पुढे तरी
    टाळी कोणी देत नाही……

    थोडा घसा दुखला तरी
    अंग गरम होते
    पोटभर जेऊनही
    तोंड कडू पडते….

    किती-किती जपायचे
    कुठे-कुठे लपायचे
    दाटून आला ठसका तर
    कुठे जाऊन खोकायचे……

    कधी-कधी जखम
    झाली असते मांडीला
    रिपोर्टवर रिपोर्ट सांगे
    मलम चोळा शेंडीला……

    रोगापेक्षा इलाजच
    झाला खूप अवघड
    डोसावर डोस म्हणजे
    नाकापेक्षा मोती जड…

    उपचाराच्या धास्तीनेच
    धष्टपुष्ट खचले
    निसर्गाचे काढे पिऊन
    काही विश्वासाने वाचले…..

    पैसा आडका उभा केला
    तरी खाट मिळेना
    कुठून आली महामारी
    स्मशानही पुरेना…….

    काय खरे; काय खोटे
    हेच कळत नाही
    जिथे पाऊल ठेवला तिथे
    फाटू लागते भुई…….

    अंत नका पाहू दाता
    आता माफ करा
    तुम्हीच आता मायबाप
    बोट आमचे धरा….

    🙏🙏🌹🙏🙏

  • तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल

    तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल

    क्रांती चौकात थाटात शिवजयंती साजरी करणार,
    राजांना आपल्या नवीन रुपात मुजरा करणार.
    भीमजयंती सुद्धा जोरात गाजनार,
    जल्लोष साऱ्या आसमंतात दुमदुमनार.

    करू साजरी गुलमंडीवर धुळवड.,
    सध्या तरी घरी राहणे हीच योग्य निवड.
    सण सर्व साजरे होतीलच हो,
    जरा या कोरोनातुन मिळू द्या सवड.

    पुन्हा खाऊया आवडीने श्री चे पोहे,
    बरकत चा चहा, उस्मान भाईचे भजे.
    उत्तमची मिठाई आणि गायत्री ची चाट,
    फक्त योग्य दिवसाची सध्या पाहूया वाट.

    सिटीत जाऊन मनसोक्त खरेदी करू,
    आपली आवडती घासाघीस, तीही परत होईलच सुरू.
    पुन्हा सिद्धार्थ गार्डन ला जाऊन एकत्रित फिरू,
    सगळं ठीक आहे, फक्त आता घाई नका करू.

    गणरायाचा जल्लोष विचारू नका,
    डोक्यावर घ्यायला त्याला विसरू नका.
    मिरवणुकीत गणरायाच्या पुन्हा करू गर्दी,
    फक्त आता त्याची प्रार्थना तेवढी सोडू नका.

    कर्णपुरा जत्रा पुन्हा गर्दीचा रेकॉर्ड मोडेल,
    सगळी निगेटिव्हीटी जनता देवी जवळ सोडेल.
    पुन्हा आनंदाचा फवारा नक्की उडेल,
    सध्या मात्र आपल्याला संयमाची गरज पडेल.

    दसऱ्याला प्रत्येक घरी यंदा मुद्दाम जाऊ,
    पुन्हा आशीर्वाद घेऊ, गळाभेटही घेऊ.
    दिवाळीला फटाके फोडू, गोड – धोड खाऊ,
    हा कोरोना जाईलच, तोवर मात्र घरातच राहू.

    मनातले आपले सर्व संकल्प नक्की पूर्ण होतील,
    सध्याचे क्षण सुद्धा काही आठवणी देऊन जातील.
    जातील आताचे वाईट दिवस जातील,
    तेही आनंदाचे दिवस लवकरच येतील….

    निलेश दिलीपराव झाल्टे.

    माझ्या नावा सहित पोस्ट शेर करू शकता…👍

  • ऋनांची रुतुराई

    आसवांच्या हिंडोळ्यात
    ऋनांची रुतुराई
    रुणाणुबंधाची
    वेल जाई जुई


    स्वप्नांचे ते तारे
    चंद्र जनु मन
    सुंदर श्रावण
    अवघे जीवन


    आयुष्याच गाठोडं
    स्वप्नांची शिदोरी
    सर्व काही लिहून ही
    तरी पाटी कोरी


    रोज नव मन
    रोज नवा छंद
    आयुष्याचं मोल
    सांगतो म्रुदुंग


    शाश्वत या जगी
    फक्त एक सत्य
    सत्याचेच यश
    जीवनाच तध्य.

  • भारतीय नारी

    पुरुषांच्या खांद्याला
    खांदा लावून चालतांना
    काचासारखच जपते ती
    स्वतः च चारित्र्य.

    नाही तिच्या हातात
    ग्लास चुकुन मद्याचा
    आधुनिक भारतीय स्री ला
    भान आहे सध्याचा

    रुढी परंपरा जपतही
    जपली तिने संस्कृती
    सत्य व चैतन्य फुलवत
    तोडली अंधश्रद्धेची आकृती

  • कर्म

    …संकटांना सामोरं जाणं
    हा तुझा धर्म
    नितळ मनाने करत जा तु
    फक्त तुझे कर्म

    ….आयुष्य म्हणजे नसतोच कधी
    फक्त दुःखांचा खेळ
    सुखाचीही आपल्या आयुष्यात
    ठरलेली असते वेळ

    …संकटातील सहनुभूतीही
    जागृत करते मन
    अनुभव रुपी गुरुंची शाळा
    म्हणजेच आपल जीवन.

  • आजचा क्षण

    एकीकडे वाढत असतांना
    बिल्डिंग च जंगल
    बांधायचय घर मला
    माणसांच्या मनात

    पेरायचय मनात इथल्या
    माणुसकीच बीज
    भरून काढायचीय मला
    माणुसकीची झीज

    माणसा – माणसातली
    मीटवायचीय दरी
    द्यायचाय मला हात
    फसलेल्या एकाला तरी

    खूप मोठ्या आकांक्षा माझ्या
    आयुष्याच माहीत नाही
    आजचा मीळालेला क्षण मात्र
    सगळ्यांसाठी देईन मी.