Letter to Monsoon

…..प्रिय पर्जन्य राजा…..

वेशीपर्यंत आलायस… आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस… पटकन माप ओलांड आणि आत ये… कंजूसपणा करू नको…. दिल खोलके बरस… येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये… येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव… तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल… एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील… ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल, पण तरी पण तिथे थांब… कारण तिचा धनी गेल्यावर पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा तिलाच ओढायचाय… म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा… आणि तिथल्या मातीत रुजून राहा… मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड… नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड… हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस… धन-धान्यासाठी ये, छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये… पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव… आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव… सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे, फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे… वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमा-गरम भज्यांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये… तर्राट होऊन ये….

सैराट होऊन ये… आणि सगऴीकडे झिंग झिगं झिंगाट करुन टाक………

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top