वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे.
मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो
मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे
पूर्वी बैलगाडीमध्ये हे सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा याच बैलगाडीत धडधड आदळत आपटत मस्त सफर करत शेताला जायचा. आता मात्र सवडीप्रमाणे मोटारसायकल, ऑटोचा वापर केला जातो.
काहीजण डोक्यावर डालगे (मोठे टोपले) घेऊन शेतात जातात. या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेगावी असणारी माणसे वेळामावस्याला मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा करतात.
शेतात आल्यानंतर एका झाडाखाली पाच पांडव मांडतात. त्यांना चुन्याने रंगवतात. त्यावर कडब्याच्या पाच पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप (कोप) करतात. लाल शालीने ते बांधतातही. डालग्यातून साहित्य काढतात.
पांडवासमोर हिरवे कापड ठेऊन लक्ष्मीची पूजाही मांडतात. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवाची पूजा करतात.
शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवतात, हा नैवेद्य एका माठात भरतात.
Kup chan mahite ahe