सप्तशती भाग2

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आदिशक्ती महामाया जगन्माता असूनही, आदिशक्तीच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती व नाशाला कारण आहे. तिचे स्वरूप, सामर्थ्य, पराक्रम आणि भक्त वत्सलता स्पष्ट करणारी अनेक कथानके आहेत जी आपल्या वेदशास्त्र पुराण  ग्रंथात आलेली आहेत त्या आधी शक्ती चरित्राचे पाठ, श्रवण, कीर्तन, पूजन, जपानुष्ठान, अर्चन, अनुष्ठान चंडिला प्रसन्न करणारे आहे, असे भगवतीने स्वतः स्पष्ट केले आहे.

आदिशक्ती जगदंबा महामायेचे हे अपूर्व चरित्र जसं उपनिषदात आणि पुराणातून प्रकटलेल आहे तसेच ते सप्तशती ग्रंथातूनही स्पष्ट झालेले आहे. श्रीमार्कंडेय ऋषींनी जे मार्कंडेयपुराण लिहिलं त्यात हे देवी महात्म्य आलेल असून मार्कंडेय पुराणात श्री सप्तशती ग्रंथाचा आधार आहे..! सप्त म्हणजे सात आणि शती म्हणजे शंभर म्हणजेच सातशे श्लोकांनी युक्त असा ग्रंथ म्हणजेच सप्तशती या सप्तशती महामंत्राचा उपासनेने असंख्याची अनेक वैयक्तिक सामाजीक आणि राष्ट्रीय कार्य सुद्धा सिद्धी ला गेलेली आहेत.

त्याचे प्रत्यंतर भारतात अनेक शक्ती उपासकांना प्रत्यक्षपणे दिसून आलेले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की भोग विकार  साधकाला वारंवार साधनेपासून परावृत्त किंवा पदच्युत करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. म्हणून साधकाने प्राणशक्ती किंवा ज्ञान शक्तीला शरण गेलं पाहिजे ही प्राणशक्ती वा ज्ञानशक्ती म्हणजेच श्रीभगवती आदिशक्ती आदिमाया राजराजेश्वरी परांबा जगदंबा आई अंबाबाई ..!

श्री सप्तशती म्हणजेच शक्ती पुराण आहे असं मला वाटतं ..! समस्त चराचर विश्‍वात शक्‍ती म्हणजे चैतन्य व्यापून राहिलेली आहेच तीच्या शिवाय कुठलेही कार्य केवळ असंभव आहे. अगदी बोलण्यासाठी सुद्धा वाचाशक्ती असावी लागते प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ही शक्ती कार्यरत असते म्हणून …

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!

धर्मशास्त्रात अध्यात्मात जेवढ्या देवी-देवता आहेत त्या सर्व या आदि शक्तीच्याच आधीन आहेत असं म्हटल्या जातं कारण त्या आदि शक्तीनेच सर्वांची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच या विराट शक्ती शिवाय त्या सर्व देवी-देवतांचे व सर्वसामान्य जीवांची प्राणिमात्रांची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून या विराट शक्ती शिवाय या सर्व देवी देवतांचे  अस्तित्व शून्य आहे..! अर्थात याकामी शक्तीला शिवाच सहकार्य लाभलेला आहे म्हणूनच ती शिवशक्ती स्वरूपिणी म्हणजेच अर्धनारीनटेश्वर आहे. त्यामुळे प्रत्येक पुरुषात स्त्रीत्व आणि प्रत्येक स्त्रि मध्ये पुरुषत्वअथवा  गुण वैशिष्ट्य असतात यावर आपण थोडासा विचार करु या..

मुख्य देवतांच बघा लक्ष्मीसह नारायण, शिवा सहित पार्वती, रिद्धी सिद्धी सहित महागणपती, सीतेसह श्रीराम, रुक्मिणी सहित श्रीकृष्ण, मल्हारी मार्तंडा सहीत म्हाळसा, बानू अशीही चराचराला व्यापून असलेली शक्ती पत्नीसह पती रूपाने प्रत्येकाच्या ठाई स्थित आहे.

दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्यात या प्रत्यक्ष शक्तीचा उपयोग व अनुभव आपण घेतच असतो आणि म्हणून शक्ती सहीत तत्त्वांची आराधना पूजा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या संकटाचा प्रतिकार करण्याची शक्ती बल जर आपल्यात असेल तर तेच आपले स्वास्थ्य व आरोग्य असते. अनेक प्रकारे या शक्तीचा अनुभव आपण घेत असतो उदाहरणार्थ शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती, धनशक्ती, राज्यशक्ती, धर्मशक्ती, गुंडाशक्ती, साधू सज्जनांची शक्ती, श्रवण, गंध, वाणी, रुप, गुण यांची शक्ती वगैरे वगैरे या सर्व शक्ती मध्ये तेजतत्त्व विद्यमान असत. ज्याला कांती ही म्हणतात. म्हणून जी अनेक तत्त्व आणि तेज आहेत त्यात सप्तशती ग्रंथात नमन केलेले आहे.

या देवी सर्वभूतेषु कांती रुपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!

म्हणून ज्यावेळी आणि जेव्हा हे तेज निघून जातं त्यावेळी ती शक्ती निस्तेज होऊन निकामी होते त्यासाठी हे तेज  टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची आवश्यकता असते..!

क्रमशः

श्री गुरुमहाराज समर्थ…!

जय जगदंब

वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

9422211334

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top