पाच शिवलिंगांचे दुर्मिळ स्थळ

श्री क्षेत्र दोधेश्वर

दोधेश्वरचे सर्वात पुरातन आणि मुळ शिवलिंग मंदिर दक्षिणेकडिल टेकडीवरच्या दोन मंदिरांपैकी पश्चिमेकडील मुळेश्वर मंदिर आहे.या मुळाला पुर्वेस वेल आली ते टेकडीवरचे दुसरे मंदिर वेलेश्वर, वेलीला फुल आले ते स्नानकुंडाच्या पश्चिमेचे गुप्त फुलेश्वर हे तिसरे, फुल गुप्त होवून म्हणजे त्याचे रुपांतर फळात होवून चौथे मंदीर स्नानकुंडाच्या पुर्वेचे ते फळेश्वर, आणि फळाचा दुग्धरस ते दुग्धेश्वर तथा दोधेश्वर हे पाचवे मंदिर. या नैसर्गिक रचनेच्या ५ शिवलिंगांचे हे दुर्मिळ तिर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील व सटाणा शहरापासुन उत्तरेस अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावरील निसर्गरम्य अशा दोधेश्वरच्या देव भुमीतील.

पायापासुन कळसापर्यंत फक्त आठ अखंड दगडांमध्ये बांधलेले सर्वात पुरातन छोटेशे मुळेश्वर मंदीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील असल्याचे मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी मिळालेल्या तांम्रपट आणि मंदिराच्या भग्नावस्थेवरुन लक्षात आले. मुळेश्वर शिवलिंग मंदिराच्या जिर्णोद्धाराचीही अतिशय रोचक आख्यायिका आहे.

सटाणा नगरपरीषदेचे सेवक स्वर्गिय दत्तात्रेय उखाजी कापडणीस ज्यांना सर्वजन प्रेमाने मामा म्हणायचे. या शिवभक्तास सन १९७९ च्या महाशिवरात्रीला दोधेश्वर जकात नाक्यावर रात्रपाळीस कार्यरत असतांना काम संपल्यावर त्यांनी खुर्चीतच बसून ॐ नमःशिवायचा जप सुरु केला आणि ते ध्यानस्त झाले या ध्यानातच त्यांना शुभ्र पांढऱ्या रंगाच्या गाईने दृष्टांत देतांना डोंगरावरील जिर्ण मंदिराजवळ नेले व ढासळलेल्या या मंदिरास पाहुन गाय रडु लागली .. आणि ध्यान भंगले… दत्तु मामांनी जकात नाक्यावर रात्रपाळीस सोबत असलेले त्यांचे सवंगडी स्वर्गिय दादाजी राघो सोनवणे यांना हे सर्व सांगितले आणि या दोघांनी ठरविले की, सकाळी दोधेश्वर गाठायचे. गरिबीच्या परिस्थितीमुळे हे दोघेही एकाच सायकलीवर दोधेश्वरला पोहचले आणि डोंगर माथ्यावर जावुन पहातात तर काय आश्चर्य त्या डोंगरावर ते ढासळलेले मंदिर या जिर्ण मंदिरा भोवती काटेरी झुडपे, वारुळ आलेले आणि मंदिराबाहेर मुंडके तुटलेला नंदी आणि या मंदिराजवळ खरेच ध्यानात दृष्टांत देणारी शुभ्र पांढऱ्या रंगाची गाय उभी आणि तिच्या डोळ्यातुन अश्रु पडत होते. हे दोघेही आश्चर्य चकित झाले त्यांनी या जिर्ण मंदिरास व त्या गाईस नमस्कार केला आणि भारावलेल्या अवस्थेत डोंगर उतरुन ही गाय कोणाची आहे म्हणुन याला त्याला विचारु लागले, त्या वेळी तेथे डोंगर पायथ्याशी फक्त आधिवासींची वस्ती होती. बरीच विचारपुस करूनही पाढऱ्या रंगाची गाय माझी आहे. असे म्हणणार कोणीही भेटले नाही. त्यामुळे हे दोघेही पुन्हा डोंगर चढुन वरती आले तर ती शुभ्र पांढरी गाय तेथे नव्हती. यांनी भरपुर शोध घेतला परंतु ती गाय पुन्हा भेटली नाही. त्यामुळे हे पुन्हा वस्तीत आले पुन्हा शोधा शोध केली परंतु या गायीबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. मात्र या चर्चेत एका म्हाताऱ्या आजीबाईने यांना सांगितले कि हे फार जागृत देवस्थान असुन माझी आजीसासु रोज सांयकाळी या डोंगरावरील पडलेल्या मुळेश्वर मंदिरात दिवा लावण्यासाठी जात होती आणि तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिने हि जबाबदारी मला दिली आहे. त्यामुळे मी सुद्धा रोज या पडलेल्या मंदिरात दिवा लावायला जाते, परंतु एक दिवशी मला थोडा जास्तच उशीर झाला होता, त्या दिवशी मी दिवा लावायला मंदिराजवळ गेली असता, आपल्या पायाच्या पोटरीपेक्षाही जाड आणि खूप लांब अशा नागोबाने शिवलिंगाभोवती विळखा घालून त्याचा फना शिवलिंगावरती धरलेल्या अवस्थेत पाहिल्यामुळे मी खूप घाबरले आणि कसाबसा नमस्कार करुन तेथून पळुन आले. तेव्हा पासुन दिवस मावळण्याआधीच तेथे दिवा लावुन येते आजीबाईची ही माहिती व ध्यानातील दृष्टांत आणि प्रत्यक्ष घडलेला गाईचा प्रसंग यावरुन दतुमामांची खात्री झाली की हा दैवी संकेत आहे आणि त्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करायचा निश्चय केला. परंतु परीस्थिती अतिशय गरीबीची होती. यावर मार्ग काढण्यासाठी दत्तुमामांचे सवंगडी स्वर्गिय दादाजी राघो सोनवणे, स्वर्गिय मोहन परदेशी, मिस्त्री स्वर्गिय नरहर नामदेव मोरे, पेंटर स्वर्गिय शांताराम बापु वाघ, श्री. प्रताप फकीरा सोनवणे आणि त्यावेळेच्या सटाणा नगरपरीषदेच्या सर्व सेवकांच्या श्रमदानातुन आणि वर्गणी गोळा करुन मंदिर जिर्णोद्धार करण्याचे निश्चित केले.

ढासळलेल्या मंदिराचे एक एक अवशेष काढुन बाजुला ठेवतांना लक्षात आले की दगडी शिवलिंगावर कसलातरी प्रहार झालेला होता प्रथमदर्शनी मंदिराचाच दगड पडुन हा प्रहार झाल्याचे वाटले परंतु मंदिराबाहेर असलेल्या दगडी नंदीचेही मुंडके तुटलेले होते तसेच मंदिराच्या मागे थोड्या अंतरावर गणपतीच्या दगडी मुर्तीचा तुटलेला एक भाग आणि मंदिराचा समोरच्या भागात मोकळ्या जागेवर दुसरा भाग आढळला या कृतीचा अर्थ लावतांना सर्वानांच असे वाटले की, या मंदिरावर पुर्वी कधीतरी आक्रमण करुन मंदिर उध्दवस्त करण्याचा प्रयत्न झालेला असावा.

उत्तखणनाच्या शेवटच्या टप्प्यात शिवलिंगाच्या खाली तळहातापेक्षाही लहान आकाराच्या ताम्रपटावर मोडी भाषेत मुळेश्वर शिवलिंग मंदिर – साल १६५७ असा उल्लेख कोरलेला आढळल्याने हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखिल असावे हे पक्के झाले. कारण मुर्तीभग्न कृती महाराजांना त्रास देण्याच्या हेतुने त्यावेळेच्या इतर सत्ताधिशांनी केल्याचा इतिहास आपणा सर्वांना माहित आहेच. तसेच या शिवलिंगात आणि शाळूंका यामध्ये सन १८०५ असा उल्लेख असलेले चांदीचे नाणे अडकले होते, हे नाणे त्या वेळी कोणीतरी शिवलिंगास अर्पण केलेले असावे.

श्रमदानातुन जिर्णोध्दाराचे कार्य सुरु झाले, डोक्यावर हंडा घेवून डोंगर पायथ्यापासुन पाणी डोंगरावर घेवून जाणे, सर्व बांधकाम साहित्य देखिल डोक्यावरुनच वरती घेणे, अशा कष्टातुन जिर्णोध्दाराचे काम सुरु राहीले. या सर्वांचे कष्ट पाहून त्यावेळेचे दोधेश्वरचे महंत लोटयाबाबा स्वत: पिण्याच्या पाण्याची बादली भरुन रोज डोंगरावर घेऊन येत आणि या जिर्णोध्दाराच्या कार्यास प्रोत्साहन देत होते.

या मंदिराचा यापुढे जेव्हा केव्हा जिर्णोध्दार होईल त्यावेळी याचा इतिहास सर्वांना कळावा या सदहेतुने या जिर्णोध्दाराचा थोडक्यात इतिहास आणि या कष्टकऱ्यांची नावे एका नवीन ताम्रपटावर कोरुन उत्तखननात मिळालेले छोटेशे ताम्रपट्ट आणि चांदीचे नाणे व नवीन ताम्रपट्टासह शिवलिंगाच्या खाली खोल खड्ड्यात ठेऊन, त्यानंतर शिवलिंगाची विधीवत पुजा करुन, अन्नदान करुन दृष्टांत झाल्यापासुन बरोबर एक वर्षांने हा जिर्णोध्दार दिनांक १४ फेब्रुवारी १९८० रोजी महाशिवरात्रीला स्वर्गिय दत्तुमामा आणि त्या वेळेच्या सटाणा नगर परीषदेच्या सेवकांनी पुर्ण केला… त्याच शिवरात्रीला रात्रभर मंदिरात ॐ नमः शिवाय मंत्रजप करण्यासाठी स्वर्गिय दत्तात्रेय उखाजी कापडणीस, स्वर्गिय दादाजी राघो सोनवणे, स्वर्गिय नरहर नामदेव मोरे, श्री. प्रताप फकीरा सोनवणे या चारही शिवभक्तांनी मंदिराच्या गाभाऱ्यात चारही कोपऱ्यांना बसुन जप सुरु केला मध्यरात्री दिव्याच्या उजेडात त्या म्हाताऱ्या आजीबाईने वर्णन केलेला नागदेवता मंदिराच्या दारात येऊन फना काढुन बसलेला आढळला. मंदिराला छोट्या दरवाजा व्यतिरीक्त दुसरा कोणताही मार्ग नसल्याने स्वर्गिय दत्तूमामांनी हात जोडून नागदेवतास नमस्कार करुन बम.. बम.. भोलेनाथ असा जोरात गजर केल्याने हा नागदेवता मंदिराच्या आत येण्याऐवजी आल्या मार्गाने निघून गेला.

या जिर्णोध्दार केलेल्या मंदिरात रोज सायंकाळी दिवा लावण्यासाठी त्या म्हातार्‍या आजीबाई आपल्या नातसुनेसह जात असे आणि जमेल तसे स्वर्गिय दतुमामा देखिल मंदिरात दिवा लावण्यासाठी जात असत.

स्वर्गिय दत्तूमामा जिवंतपणीच त्यांच्या सवंगड्यांना व कुटुंबियांना शेवटची इच्छा सांगायचे की, त्यांच्या मृत्युनंतर त्यांची रक्षा मुळेश्वर मंदिराच्या डोंगर परीसरात विसर्जित करावी. वयाच्या ८१ व्या वर्षी स्वर्गिय दतुमामा शेवटचे ५८ दिवस अन्नपाण्यावाचुन जिवंत होते, कधीही कोणालाही त्रास न देता आयुष्यभर देवदेव करणारे घरातुन निघतांना एका हातात किड्यामुंग्यांकरीता साखर दुसर्‍या हातात चिमण्या पाखरांकरीता धान्य घेवून रस्त्याच्या कडेला टाकत जाणारे, घरी येतांना विकतचा चारा घेऊन रस्त्यावरील गाईगुरांना टाकत येणारे, भिकाऱ्यास घरात बसवुन जेवू घालणारे, अंगातील सदरा गरजुला देऊन कोपरीवर घरी येणारे, असे हे दतुमामा तरीही मुक्तीचा मार्ग इतका खडतर कसा ? कुटुंबियांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच जणूकाही दारात आलेल्या ऋषींना विचारणा केली असता, त्यांचा जिव भक्तीत अडकला असल्याचे ऋषींनी सांगितल्यावर मूळेश्वर शिवलिंग मंदिराचा जिर्णोध्दार त्यांनी केल्याचे ऋषींना सांगितले असता त्या ऋषींनी सांगितले की ज्या शिवलिंग मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे त्या मंदिरात त्यांना आता जाता येणे शक्य नसले तरीही त्यांच्या वतीने त्यांच्या मुलांनी दिवा लावून त्यांची भक्ती शिवचरणी अर्पण करावी असे सांगितले. त्याप्रमाणे मुळेश्वर शिवलिंग मंदिरात ज्या वेळेस त्यांच्या मुलाने दिवा लावला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बरोबर त्याच वेळेस स्वर्गिय दत्तुमामांची अमर आत्मज्योत देहत्यागून स्वर्गात शिवचरणी समर्पित झाली.

मनोभावे व्यक्त केलेली इच्छा पुर्ण करणार्‍या, मनःशांती देणाऱ्या, जागृत शिवलिंगाचा परीसर आणि एकाच वेळी अनेक विवाहविधी पार पडू शकतात असे सभामंडप, धर्मशाळा, अतिथी गृह बांधण्यात आलेले असल्याने येथे वर्षभर भक्तांची ये जा सुरु असते .परंतु महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार या दिवशी विशेष गर्दी असते त्यामुळे तेथे जाण्यासाठी सटाणा येथुन एस.टी बसेस आणि खाजगी वाहनांची देखिल सोय आहे.

एकाच ठिकाणी असलेल्या
मुळेश्वर…वेलेश्वर…फुलेश्वर…फळेश्वर…दोधेश्वर…
या पाचही शिवलिंगांच्या दोधेश्वर या देवभुमीस
त्रिवार वंदन ….! 🚩

संकलन आणि शब्दांकन

हिरालाल दत्तात्रेय कापडणीस,
जनसंपर्क अधिकारी,
सटाणा नगरपरीषद, सटाणा.
दुरभाष- ९९२१५९ ३०२०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top