मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा…

स्वतःची सही सुद्धा मराठीत नसणाऱ्या,
पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा..

A B C D सहज म्हणू शकणाऱ्या,
पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा..

मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा …

आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा..

व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ ‘कंटाळा येतो म्हणून’ विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा..

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी (‘काळजी घे’ चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा…

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय ?..त्यांनाही आज शुभेच्छा..

सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा ईतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, ‘मराठीचा किमान एका संधीसाठीही’ वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा…

वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा..

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा…

मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top