सप्तशतीचा पाठ

देवी सप्तशतीचा पाठ वैदिक ब्राह्मणांकडुनच का करवुन घ्यायचा असतो? काही वर्षांपुर्वी मी गणेशपुरीच्या नित्यानंद स्वामी ( म्हसकर गुरुजी ) यांना माझी जन्मपत्रिका दाखवायला गेले होते. त्यावेळी मी नुकतीच वैद्य झाले होते. व्यावहारिक जगात हात,पाय मारणे चालु होते. बरीचशी त्रस्तच होते. स्वामींनी माझी पत्रिका बघितली आणि माझ्याकडे रोखुन म्हटले, ' वर्षाचे १२ चंडीपाठ करुन घेणार का? ' तेव्हा मला अध्यात्माची सुतराम ओळख नव्हती. ज्योतिषही शिकलेले नव्हते. मी विचार केला,असेल काहीतरी स्तोत्र वगैरे! धडकुन म्हटले,'हो,करेन की!' त्यांनी म्हटले,जास्त शहाणपणा करु नकोस. चंडीपाठ फक्त वेदग्रंथी ब्राह्मण करतात. ते करतील.तु फक्त त्यांना शिधा आणि दक्षिणा दे.' मला हायसंच वाटलं. चला,तेवढंच तर करायचं आहे ना! आपल्याला तर काही मेहनत नाही. करुन टाकु. मी त्यांना 'हो ' म्हणुन घरी आले. त्यानंतर 'घी देखा लेकिन बडगा नहीं देखा।' अशी माझी अवस्था झाली. २ महिने तर मला असे ब्राह्मणच कुठे सापडेना. तोपर्यंत वेदग्रंथी ब्राह्मण हा ही एक प्रकार असतो,हे मला तेव्हा कळले. सुदैवाने मला असे ब्राह्मण सापडले. आत्ता माझीही उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. काय असतं काय या ब्राह्मणांत?,असा प्रश्न माझ्या मनात उमटला होताच. असो,नमनालाच घडाभर तेल टाकलेय. वर्षाचे माझे १२ चंडीपाठ झाले आणि माझी समस्याही सुटली. वेदग्रंथी ब्राह्मण हे गुरुकूल पद्धतीने शिकतात. त्यांना परान्न वर्ज्य असते. कोणाकडे गेले तर दुध,केळी असा आहार घेतील. त्याव्यतिरिक्त काहीही नाही. ह्यांची वाणी खणखणीत असते. सतत ऋचा म्हणुन जिभेला धार आलेली असते. सगळी स्तोत्रे ह्यांना तोंडपाठ असतात. दुस-यांकडे गेले की हे सोवळ्यातच रहाणार. त्यांचे आसनही ते घेवुन येतात.( माझ्या गुरुंजींनी त्यांचे आसन आणले होते.) त्र्यंबकेश्वरला वेदग्रंथी ब्राह्मण पाहीले.काशी,बनारस,गया इथेही असे ब्राह्मण आहेत.

माझी अध्यात्माशी ओळख याच चंडीपाठाने झाली. तोपर्यंत एकाही धार्मिक ग्रंथाचे पारायणही मी कधी केले नव्हते. असं काय आहे,या चंडीपाठात,की जे मी म्हणु शकत नाही? हा प्रश्न मनात ठेवुन मी नंतर बरेच वाचन केले. सुदैवाने ब-याच प्रश्नांची उत्तरे सापडत गेली.

देवी सप्तशती हा वैदिक ग्रंथ आहे. यात देवी कवच,अर्गला स्तोत्र,कुंजिका स्तोत्र यांबरोबरच देवी स्तुतीचे ७०० श्लोक आहेत. संपुर्ण संस्कृत भाषेतील हा ग्रंथ वाचण्यासाठी काही नियम आहेत. हे नियम बरेच कडक आहेत. ते वाचुन तुम्हीच ठरवा,आपण सप्तशती पाठ करु शकतो की नाही!

  • भाषाशास्राची उत्तम जाण हवी.यातले श्लोक स्पष्ट शब्दोच्चारांसह खणखणीत आवाजात म्हटले पाहिजेत. कुठेही चुक होता कामा नये. उदा. म् हा उच्चार ब-याच वेळा औष्ठ्य असतो,तर तालव्यही असतो. कुठला उच्चार कुठे उच्चारायचा,याची माहिती तुम्हाला हवी. काही श्लोक संधीविग्रह करुन म्हटले तर समजतात,पण ते तसेच फोड न करता म्हणायचे असतात. ते जमलं पाहिजे.
  • संपुर्ण ग्रंथवाचनाला दोन तास लागतात. एकदा वाचनाला बसल्यावर मध्ये उठता येत नाही. तशी तयारी करुनच बसावे लागते.
  • दर्भासन,कुशासन असे आसन लागते. दर्भ,कुश हे गवत प्रकारातील वनस्पती आहे. ग्रंथवाचनाने जी ऊष्णता निर्माण होते,तिचा निचरा ह्या आसनाने होतो. मला ही आसने परत कुठे बघायलाही मिळाली नाहीत. लोक लाकडी पाट वापरतात,पण ती दुधाची तहान ताकावर,याप्रमाणे असते.
  • आचरण सत्वशील असावे. शारीरिक काय,मानसिक ब्रह्मचर्यही पाळावे. यासाठी आहारही खुप सत्वशील ठेवावा लागतो. परान्न घेता येत नाही. यात हाॅटेलचे जेवण तर आलेच,शेजा-यांनी दिलेलेही चालत नाही.
  • वाणी सुस्वर,खणखणीत होण्यासाठी ठराविक स्तोत्रे,ऋचा या कायम पठणात ठेवाव्या लागतात.
  • उगीचच चिडचिड करणे,लाचखोरी,दुस-यालाही काम होण्यासाठी आमिषाची गळ घालणे हे प्रकार टाळावेत.

ग्रंथवाचन करताना न शिवलेले वस्र घालावे. पुरुष धोतर तर बायका साडी वापरु शकतात. नव्हे,तेच वापरावे. याव्यतिरिक्त कपडे नकोत. हे नियम देवी सप्तशती पाठालाच नाहीत,तर कोणत्याही धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी आवश्यक आहेत. हे नियम पाळल्यानंतरच ग्रंथ वाचनाचे पुर्ण लाभ मिळतात.

  • वैद्य.वर्षा लाड.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top