परमेश्वराचा नामजप कसा करावा ?
१) सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते. हात पवित्र होतात. (संत एकनाथ महाराज-एकनाथी भागवत)
२) कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा. ( ओरिजिनल, डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल,ती स्वतः दाखवेल मी सिद्ध झालीय -माझा अनुभव ) – श्री गुरुचरित्र. वैष्णव असाल तर तुळसी माळा घ्या. अन्य माळांच्या नादी लागू नका कारण तुम्हाला मोक्ष हवाय सिद्धी नाही.
३) जप करायचाय हे निश्चित करा. वेळ एकच ठेवा. आसन उणी घ्या (लोकर). थोडे उंच असूद्यात. जमिनीपासून, विना आसन करू नका. समोर श्री महाराजांचा फोटो राहुद्यात. कारण तेच श्री गुरु आहेत जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा.
४) प्रथम फुले वाहून, अगरबत्ती लावून ओवाळून सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा. मग सज्ज व्हा.
५) भान ठेवा समोर श्री जगतचालक , मोक्षदायक , सर्वशक्तिमान ,सर्व देव त्यांच्या ठायी आहेत असे श्रीमहाराज विराजमान आहेत. आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत. सांसारिक ताप विसरा, ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत असा दृढ भाव ठेवा.
६) प्रार्थना करा, स्तुति गा, शास्त्र नियम आहे प्रथम देवी देवता स्तुती किंवा श्री गुरूंना गुरुवंदना करावी ( श्री रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात – गुरुचरित्र ) , म्हणजेच स्तुती गा, जयजयकार करा म्हणजे होईल श्री गुरुमूर्ती प्रसन्न आपल्यावर.
७) दृष्टी समोर त्यांच्या श्री चरणाकडे………. डोळ्यात नको……… आपण दास आहोत त्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी . आपण शरण आहोत , दीन, आहोत , तृणाप्रमाणे विनम्रता असावी.
८) माळ कापडाच्या गोमुखींत ठेवा (पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराबाहेर, तीर्थक्षेत्र ठिकाणी) कारण पितर , अदृश्य शक्ती आपल्या जपाचे फळ, तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्व मुक्ती साठी वापरतात. (अनुभवावरून) म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात ..नंतर याचा उपद्रव होत नाही.
९) तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे. शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास चालेल कोठेही, पण जपमात्र करा.
१०) उजवा हात त्यामधील अंगठयापासून २ नंबरचे बोट (तर्जनी) गोमुखींच्या बाहेर बाजूला काढा म्हणजे माळेला स्पर्श करू देऊ नका.