शक्य आहे तिथे नदी नांगरा

● शक्य आहे तिथे नदी नांगरा !

● सध्या उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. नदीतील वालुका , दगड-गोटे दिसत असतात. भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जात असतो व त्यामुळे ती खोल खोल होत असते व तिचे ऊंच किनारे तयार होतात. अनेक मोठया नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वहात असतात. नदीच्या या पात्रात अनेक पावसाळ्यातील गाळ साचल्यामुळे पात्र जलाभेद्य होते व पावसाळ्यातील नदीत वाहणारे पाणी जेवढे भूगर्भात जायला हवे तेवढे जात नाही. त्यासाठी सामुदायिक ट्रॅक्टर चा उपयोग करून नदीची शक्य आहे तेवढी नांगरणी आवश्यक आहे ! हे समजून घेण्यासाठी ही खालील घटना वाचा …

● नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर….शहादा तालुख्यातील घटना !

● दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.
शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
*२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.
तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. *जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.*
डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना ” वॉटर मॅन ऑफ शहादा ” असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , ” दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले ‘फाईन पार्टीकल’ वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. “
खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.

..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top