मंत्राचा परिणाम
मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह ज्याच्या पुनरुच्चारणाने भौतिक,आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्य दैवताला स्मरून केलेला विशिष्ट मंत्रांचा जप म्हणजेच नामस्मरण. ‘मननात् त्रायते इति मंत्र:। ’ म्हणजेच मंत्र ह्या शब्दाची फोड केली तर “मं” हे मानवी मनाचे प्रतिक आहे जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे आणि “त्र” ह्या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण म्हणजेच बाह्य विचारांपासून मनाचे संरक्षण करण्याची ताकद मंत्रांमध्ये आहे.आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थानआहे. ह्या मंत्रांच्या उच्चारणाने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात. आणि ह्याच ऊर्जा स्पंदनांमुळे आपल्याला आत्मिक सुखाची अनुभूती होते. प्रत्येक मंत्राचा विशिष्ट कलावधी असतो. मंत्रांची ठराविक आवर्तने असतात. सनातन धर्मात प्रत्येक एका विशिष्ठ देवतेच्या उपासनेसाठी विशिष्ठ मंत्राची रचना वेदांमध्ये आहे.वारंवार एका मंत्राच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते. आणि साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाचे योग्य ते फळ मिळते. योग्य मंत्र साधना जितकी काटेकोर आणि पवित्र असेल तेवढीच उत्तम फळे साधकाला मिळतात परंतु चुकीचे मंत्र उच्चारण, मंत्र साधकाला अनिष्ठ फळे देतात, त्यामुळे कोणताही मंत्र स्वतःच्या मनाने कधीच म्हणू नये. गुरुनी देलेला मंत्र आत्मसाद करून त्याचाच यथायोग जाप करावा.
मंत्र आणि नामातील फरक
नाम
१) नाम म्हणजे भगवंताचे नाव. आपण आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही भगवंताचे नाम घेऊन त्याचे पुन्हा पुन्हा उच्चारण करू शकतो
२) नाम कोणत्याही वेळी घेता येते. भगवंताचे स्मरण आपण कोणत्याही क्षणी करू शकतो ह्याला वेळेचे बंधन नाही.
३) नाम जपातून केवळ आपली आध्यात्मिक ओढ जागृत होऊन त्या परमेश्वराशी आपण एकरूप होतो. आत्मिक सुखाचा कंद नामस्मरणात आहे.
४) नाम घेताना उच्चाराचे काहीही नियम नाहीत. नाम हे अतिशय सहज- सरळ आहे जे कोणताही व्यक्ती सहज घेऊ शकतो.
५) नाम भगवंताला अतिशय प्रिय आहे. ज्याच्या मुखात परमेश्वराचे नाम असते त्याच्या हृदयात ईश्वराचा वास असतो.
मंत्र
१) मंत्र म्हणजे काही विशिष्ठ अक्षरांची, शब्दांची वैदिक जुळवणी करून थोर ऋषीमुनींच्या कृपेने मिळालेलेएक वरदान आहे
२) मंत्राचे काही विशिष्ठ प्रकार आहेत. वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र ह्याशिवाय काही बीजमंत्र असतात, काही मूळमंत्र असतात, काही शांतीमंत्र असतात, काही गुरुमंत्र असतात. प्रत्येक विशिष्ठ एक फलप्राप्तीसाठी विशिष्ठ एका मंत्राची उत्पत्ती झाली आहे. .
३) मंत्राच्या जपाने मनुष्याला भौतिक, अध्यात्मिक, आत्मिक तसेच अन्य अनेक फायदे होतात.
४) मंत्र म्हणण्याचे काही विशिष्ठ नियम असतात, म्हणजेच मंत्र कसा म्हणावा, मंत्राची जपसंख्या किती असावी, मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमाळेचा उपयोग करावा, कोणत्या मंत्राची कोणत्या विशिष्ठ वेळेस किंवा कोणत्या विशिष्ठ कालखंडात उपासना करावी इत्यादी.
५) विशिष्ठ एका देवतेसाठी तसेच योग्य फलप्राप्तीसाठी विशिष्ठ एका मंत्राचे उच्चारण करणे अनिवार्य असते.
मंत्र साधनेचे फायदे
१) मनाची चंचलता कमी करून स्थिरता प्राप्त होते.
२) एकाग्र चित्त आपल्या आद्य देवतेशी एकरूप होण्यास मददकरते.
३) मंत्राच्या फलश्रुतीप्रमाणे साधनेचे फळ प्राप्त होते.
४) भौतिक सुखाच्या मार्गातून साधक हळूहळू आध्यात्मिक आणि नंतर आत्मिक सुखाकडे वाटचाल करतो.मंत्र कसे तयार होतात?मंत्राणां पल्लवो वासो । मंत्राणां प्रणव: शिर: । शिर: पल्लव संयुक्तो । कामधुक् भवेत् ।
सर्व मंत्रांची सुरुवात हि ॐ ने होते आणि नंतर प्रत्येक मंत्र विभागला जातो.
बीजमंत्र
प्रत्येक एका देवतेचा एक विशिष्ठ बीजमंत्रअसतो. बीज म्हणजे बी, म्हणजेच त्या बीजात त्या विशिष्ठदैविक शक्तीला आकर्षित करून घेण्याची ताकद असते. उदा. गणपती बीज मंत्र : गं.
देवतेचे नाव
साधक ज्या देवतेची कुठल्याही फलितासाठी उपासना करत असेल त्या देवतेचे नाव उदा. गणपतये.
पल्लव
आणि शेवटी पल्लव म्हणजेच नमस्कार उदा. नमः.मंत्राच्या शेवटी जे पल्लव असतात त्याचेही विविध प्रकार आहेत, जसे भुवः, स्वहः, फट्, हुं आणि मंत्रोच्चारात त्यांचा अर्थ भिन्न होतो.मंत्रांची अक्षरे निर्धारित असतात. काही मंत्र एक अक्षरी असतात, उदा. ॐ हा स्वयंभू मंत्र आहे.काही मंत्र पाच अक्षरांच्या जुळणीतून तयार होतात, उदा. नमः शिवाय हा शिव मंत्र पाच अक्षरी असून न मः शि वा य हि पाच अक्षरे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या वैश्विक तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. ह्यालाच पंचाक्षरी मंत्र म्हणतात .