कुणाशी बोलावे नि
कुणाला टाळावे
जिवाभावाचे सोडून सारे
एकटे कसे जगावे……
तोंडाला मुस्के आणि
खिशात बाटली(sanitizer)
दूर-दूर राहून
माया सारी आटली…..
प्रत्येकाच्या मनाला
कोरोनाचा डसे साप
नुस्ती कनकन आली तरी
चालताना लागे धाप……
किती आले हसू तरी
हसताही येत नाही
हात केला पुढे तरी
टाळी कोणी देत नाही……
थोडा घसा दुखला तरी
अंग गरम होते
पोटभर जेऊनही
तोंड कडू पडते….
किती-किती जपायचे
कुठे-कुठे लपायचे
दाटून आला ठसका तर
कुठे जाऊन खोकायचे……
कधी-कधी जखम
झाली असते मांडीला
रिपोर्टवर रिपोर्ट सांगे
मलम चोळा शेंडीला……
रोगापेक्षा इलाजच
झाला खूप अवघड
डोसावर डोस म्हणजे
नाकापेक्षा मोती जड…
उपचाराच्या धास्तीनेच
धष्टपुष्ट खचले
निसर्गाचे काढे पिऊन
काही विश्वासाने वाचले…..
पैसा आडका उभा केला
तरी खाट मिळेना
कुठून आली महामारी
स्मशानही पुरेना…….
काय खरे; काय खोटे
हेच कळत नाही
जिथे पाऊल ठेवला तिथे
फाटू लागते भुई…….
अंत नका पाहू दाता
आता माफ करा
तुम्हीच आता मायबाप
बोट आमचे धरा….
🙏🙏🌹🙏🙏