त्यांची मैत्री काहीअगदी जुनी नव्हती पण अगदी दह्यासारखी घट्ट होती त्याचे कारण ही तसेच कारण ती होतीच तशी कुणालाही भूरळ पडावी अशी, सुरेल आवाज, घायाळ करणारे घारे डोळे ज्यांना कधीच काजळाची गरज पडली नाही, ओठ जणू रसाळ गुलाबी पाकळ्या, ती कपाळावर येणारी नाजूक बट, गालावर पडणारी खळी आणि वर्णन करायला शब्द पुरणार नाही असे अप्रतिम सौंदर्य.
त्याचा श्वास,ध्यास पण आभास होती ती. ती नेहमी त्याच्याकडे आपले मन मोकळे करायची, तिचा आवाज ऐकताना तो तल्लीन होऊन जायचा आणि नुसतं ऐकत रहायचा तिने त्यांना लळा लावला होता. दिवस मजेत चालले होते, दोघे छान बेस्ट फ्रेंड म्हणून वावरत होते एकमेकांशिवाय त्यांना कधीच करमत नसे. खूप मस्त केमिस्ट्री जुळून आली होती, तशी त्यांच्यात घट्ट मैत्री होती पण तो मात्र खूप प्रेम करायचा तिच्यावर तेही अगदी मनापासून व ते फक्त त्याच्या मनात होते तिला सांगण्याची हिम्मत तो शेवट पर्यंत करू शकला नाही.
अचानक एक दिवस उजाडला ज्या दिवशी त्याला तिच्या लग्नाची वार्ता कळाली, तो क्षणभर फक्त स्तब्ध झाला त्याला कळेनासं ना की आता काय करावे त्याचे पुढे काय होईल कसा जगू शकेल तो तिच्याविना. तो तिच्या शिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हता, क्षणार्धात त्याच्या प्रेमाचा सुरू होण्याआधी अंत झाला होता. पण हे फक्त एक क्षणच, पुढच्याच क्षणी त्याने स्वतः ला सावरलं आणि तिचं मनापासून अभिनंदन केलं, तिने त्याला गळ्याशी धरलं ते शेवटचच, कारण ही त्यांची शेवटची भेट ठरू शकणार होती.
मग त्यांचे भेटणे कमी होत गेले ती आता संसाराच्या स्वप्नात रमायला लागली होती, यथावकाश तिने त्याला लग्नाची पत्रिकासुद्धा पाठवली पण जसजसा तिच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता याच्या मनातील घालमेल वाढत होती. त्याला तिच्या शिवाय राहवत नव्हतं तिच्याशी साधे बोलणेसुद्धा आता कमी झालं होतं, आणि मग त्याने तिला विसरायचं आणि नव्याने आयुष्य जगण्याची तयारी सुरू केलं पण शेवटी प्रेमात आपल्या हातात काही राहत या उक्ती प्रमाणे तो तिला विसरू शकत नव्हता,डोळे बंद केले तरी त्याला तिचेच डोळे दिसायचे तिचा तो मोहक गंध त्याला अजूनही जाणवत होता, तिचा नाजूक आणि सुरेल आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता.
त्यांच्या पक्क्या मैत्री मुळे तो तिच्या लग्नाला गेला, लग्नात ती सुद्धा त्याला पाहून गहीवरली, त्याने तिला प्रेमाने आणलेला गुलाबाचा पुष्कगुच्छ दिला अगदी लाल-भडक गुलाबांचा, तो देतांना त्याच्या डोळ्यात प्रेम, विरह, त्याग आणि अनामिक भिती दिसून होती. भीती होती ती तिच्या शिवाय आयुष्य जगण्याची, भीती होती ती स्वतः वर संयम ठेवून घेतलेला निर्णय चुकण्याची पण तरी त्याने तिला तो पुष्पगुच्छ दिला आणि भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
पण तरीही शेवटी मनातलं कानात सांगायचच राहून गेलं….