अनोखा वारसा पुरांचा -औरंगाबाद
औरंगाबाद शहराला फार मोठा ऐतीहसिक वारसा लाभलेला आहे. तो आज जरी दुर्लक्षित असला तरीही त्यांची मुळे आजूनही शहरात घट्ट रोवलेली दिसतात.
औरंगजेब याने खडकी नामक या शहराला औरंगाबाद असे नाव दिले.
एकूण ५२ दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ह्या शहरात असलेले ५४ पेक्षा अधिक “पुरे”.
औरंगजेब याच्या सरदारांच्या छावण्या ज्या ठिकाणी पडत गेल्या त्या त्या भागांना “ पुरा “ असे संबोधल्या गेले.
औरंगाबाद बस स्थानकापासून रेल्वे स्थानकाकडे जात असतांना त्यापैकी कर्णपुरा आणि पदमपुरा हे दोन पुरे लागतात. बिकानेर येथील राजा करणसिंह याची वस्ती कर्णपुरा भागात, तर त्याचा पुत्र पदमसिंह याची वस्ती पदमपुरा येथे होती.
करणसिंह ह्याचा दुसरा मुलगा केशरसिंह याची वस्ती ज्या भागात होती त्यास केशरसिंहपुरा असे म्हणत. आजहि बाबा पेट्रोल पंपावरून क्रांती चौकाकडे जात असतांना केशरसिंहपुऱ्याचे अस्तित्व आपल्याला जाणविते.
त्याच प्रमाणे जयसिंगपुरा हा जोधपुरच्या मिर्झाराजे जयसिंग यांचा जयसिंगपुरा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासामोरील भाग.
राजा अमरसिंगाचा मुलगा रावराजसिंग यांची वस्ती म्हणजे रावसपुरा.
बुन्देलखंडातील ओरछाचा राजा पहाडसिंग यांच्या वस्तीला पहाडसिंगपुरा म्हंटले जाते, पहाडसिंगपुरा म्हणजे बेगमपुरा आणि औरंगाबाद लेण्यांच्या मधला परिसर.
पहाडसिंग यानेच विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल बांधला. त्याचेच नातेवाईक रणमस्तखानचा रणमस्तपुरा तर कुतुबुद्दीनचा कुतुबपुरा यांचे अस्तित्व आजही औरंगाबाद शहरात जाणवते.
शहाजीराजे यांचे चुलत भाऊ मालोजी आणि परसोजी यांच्या नावावरून मालोजीपुरा आणि परासोजीपुरा या दोन वस्त्या निर्माण झाल्या.
अशा प्रकारे निर्माण झालेल्या वस्त्या म्हणजे आजचे औरंगाबाद शहरातील ” पुरे “.
इतिहासातील दास्तऐवजानुसार व माहितीतले असे एकूण ५६ पुऱ्यांची नावे मला सापडली.
ते पुरे खालील प्रमाणे. यातील बरिच ठिकाणे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत, तर काही वसाहती नामशेष झालेल्या आहेत.
(१) बेगमपुरा (२) औरंगपुरा (३) मुकामपुरा (४) फाजलपुरा (५) अहिरपुरा (६) दावद्पुरा (७) नवाबपुरा (८) बायजीपुरा (९) दरवेशपुरा (१०) नक्षपुरा (११) कुतुबपुरा (१२) जसुपुरा (१३) सुलतानपुरा (१४) कर्णपुरा (१५) चेलीपुरा (१६) सबकर्णपुरा (१७) इस्माइलपुरा (१८) तानाजीपुरा (१९) पदमपुरा (२०) लासगोपालपुरा (२१) मंजुरपुरा (२२) हैसिंगपुरा (२३) परतबपुरा (२४) पहाडसिंगपुरा (२५) जमालपुरा (२६) मानसिंगपुरा (२७) जयसिंगपुरा (२८) जसवंतसिंगपुरा (२९) भावसिंगपुरा (३०) जयचंदपुरा (३१) जासुद्पुरा (३२) रणमस्तपुरा (३३) पैदापुरा (३४) हमीलपुरा (३५) धोतीपुरा (३६) कलहालपुरा (३७) परासोजीपुरा (३८) तबीबपुरा (३९) रावसपुरा (४०) चाकरपुरा (४१) कोतवालपुरा (४२) लालवंतपुरा (४३) असदपुरा (४४) रामपुरा (४५) रेंगटीपुरा (४६) केशरसिंगपुरा (४७) बलोचपुरा (४८) राम्बापुरा (४९) खोकडपुरा (५०) मालोजीपुरा (५१) उस्मानपुरा (५२) कागजीपुरा (५३) काबाडीपुरा (५४) किराडपुरा (५५) महमूदपुरा आणि (५६) रशीद्पुरा
आणखी आपल्या माहितीत असेल तर कमेंटमध्ये कळवा