श्री बालाजी मंदिर उंडणगांव
श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते.
या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच कदाचित याला देवाचा वाडा अर्थात देवाडा म्हणत असावेत.
गाभाऱ्यात श्री लक्ष्मी वेंकटेश आणि पद्मावती देवीची तांब्याची मूर्ती असून सोबत इतर देवतांच्या पितळी मूर्ती आहेत.
साधारण देवघरा सारखी घडण आहे.
आणखी विशेष म्हणजे उंडणगांव मध्ये या देवाला बालाजी सोबत बालासाहेब संबोधले जाते आणि म्हणूनच “लक्ष्मी रमण गोविंदा, बालासाहेब की जय” हा इथला जयघोष इतर कुठे ही बघायला मिळत नाही. यातून देवा सोबतची आपुलकी प्रामुख्याने दिसुन येते.
काल परत्वे या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यात काही बदल करण्यात आले असले तरी अजूनही गाभारा आणि धाब्याची काही चिन्हे आपल्याला या वाड्याची भव्यता लक्षात आणून देतात.
देवाड्यात माजी स्वातंत्र्य सैनिक कै. श्री सदाशिव मोदी( मोदी बाबा) पुजारी म्हणून सेवा करत असे आता त्यांचे चिरंजीव श्री वैभव मोदी सेवा करतात.
देवड्यात अनेक सण-उत्सव प्रेमाने साजरे केले जातात ज्यात वैशाख महिन्यातील बाळाजी उत्सव मुख्य मानल्या जातो
या उत्सवात खालील गोष्टींचा समावेश होतो
“देव भक्तांच्या भेटीला”
वैशाख वद्य नवमीला या उत्सवाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण आणि मंडप टाकून होते, या ध्वजा साठी लागणारी दोरी, झेंडा, गोंडा इत्यादी साहित्याचा विशेष मान असणारे मानकरी हे वंश परंपरेनुसार ठरवलेले आहेत रात्री पालखी सोहळा होतो आणि गावातील प्रत्येक घरासमोर औक्षण करून देवाचे स्वागत केले जाते, सडा- रांगोळी करून सर्व मुली आणि स्त्रिया आपली कला कुसर देवाला दाखवतात. देवाला कानगी(देणगी) करून प्रसाद स्वरूपी नारळ दिल्या जाते.
“ओढ भक्तांच्या भेटीची”
या काळात देवाला भक्तांची भेटीची एवढी घाई असते की गाभाऱ्यात गर्दी होऊन भक्तांच्या भेटीत कसलीही अडचन येऊ नये आणि बिनधास्त दर्शन घेता यावे म्हणून 15 दिवस देवाला गाभाऱ्याच्या दरवाजात विराजमान केल्या जाते.
या काळात दररोज विष्णू सहस्त्र नाम पठण, लघुरुद्र अभिषेक, पुराण, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. पूर्वीच्या काळी नाटक, नाट्यसंगीत आदी कार्यक्रमातून मोठ्या मोठया कलाकारांना तयार करण्याचे काम ही या देवड्याने केले आहे.(कमलाकर सोनटक्के, ज्ञानेश्वर सोनवणे) असे अनेक नावे सांगता येतील.
15 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज अन्नदान केल्या जाते त्यासाठी पुढील 30 वर्षाची बुकिंग झालेली आहे यातून भक्तांची ओढ आणि भक्ती दिसुन येते.
या उत्सवाचे आणखी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात कोणी पुरुष मंडळी दाढी कटिंग करत नाही, महिला मंडळी माहेरी आलेल्या सुद्धा 15 दिवस वेस ओलांडून बाहेरगावी जात नाही,नवीन वस्तू,कपडे घेत नाही, लोणचे, पापड, वाळवण करत नाही, घरात तळण केले जात नाही, कोठेही लग्न किंवा इतर शुभ कार्य होत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व धर्मीय बांधव हे नियम कठोरपणे पाळतात.
शेवटच्या दिवशी घरोघरी पाहुणे मंडळी बोलवून आमरस,पुरणपोळी चे जेवन केले जाते आणि लळीत करून आनंदोत्सव साजरा केला जातो.
वर्षाच्या इतर काळात सुद्धा
आषाढ महिनाभर रोज लघुरुद्र अभिषेक
हरिनाम सप्ताह
भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव त्यात सुद्धा व्याख्यान माला विशेष, आणि त्यात माहेरचा आहेर नावाचा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो आणि या गणेशोत्सव साठी लागणारी गणेशाची गोड मूर्ती गावातील प्रसिद्ध डॉ. सतीश खुल्लोडकर स्वतः तयार करतात.
पूर्वी वेदमूर्ती डॉ. श्री प्रभाकर शास्त्री (झाल्टे) यांच्या रसाळ वाणीतून श्री मदभागवत कथेचे आयोजन केले जायचे त्यातील गोवर्धन सोहळा, कंस वध असे कार्यक्रम आणि त्याचे वर्णन तर ग्रेटच.
अश्विन महिन्यात नवरात्रात वेंकटेश पुराण व सप्तशती वाचन आणि रोज फुलोरा असतो.
अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा रोज भल्या पहाटे काकड आरती होते.
श्री बालाजी च्या मूर्ती या गावातील पाटील समाजाने त्याकाळी घोड्यावर तिरुपती हुन आणलेल्या असून त्यासाठी सोने चांदीचे दागिने तयार केलेले आहेत त्यातील मुख्य बालाजी मूर्तीच्या गळ्यात घालण्यासाठी हिरे माणिक असलेला हार आहे हे सर्व दागिने उत्सव काळात श्रीना दररोज चढवले जातात आणि त्या काळात गावातील उपाध्ये म्हणजे व्यवहारे कुटुंब त्याचे संरक्षण करते.
या श्री बालाजी मंदिर (देवाड्या बद्दल) मी सांगू तेवढे कमीच आहे पुढील भागात अजून माहिती सांगेल…
आमचे भाग्य, पूर्व संचित की आम्ही उंडणगांव मध्ये जन्माला आलो, या गावात आणि देवाड्यात आमचे बालपण सुखात गेले त्या आठवणी शब्दात गुंफने केवळ अशक्य आहे.
शेवटी एवढेच येते मनात
नतमस्तक व्हावे श्री च्या चरणात…
निलेश दिलीपराव(बाळूशास्त्री) झाल्टे, उंडणगांवकर,
ह.मु. छत्रपती संभाजीनगर