श्री दत्त महाराज व क्षमाशीलता
एके ठिकाणी बसलो होतो, समोरच्या बाकावर एक माता आपल्या लहानग्या समवेत बसली होती. मातेचे फोनवर काही बोलणे सुरु होते मात्र हे संभाषण तिच्या मनाला नक्कीच न रुचणारे असावे, संभाषण संपले. ती काही काळ स्तब्ध होती. इतक्यात त्या लहानग्याच्या हातून काही चूक घडली. तात्काळ त्या मातेचा हात उचलला गेला आणि एक सणसणीत चापटी त्या लेकराला बसली. लेकरू कळवळून रडावयास लागले. त्याकडे पाहत तोंडावर बोट ठेवत पुन्हा ती माता रागे भरत म्हणाली रडलास तर पुन्हा मार देईन. गप्प अगदी गप्प… आधीच भेदरलेले ते लेकरू पुन्हा रडत रडत काकुळतीने आईकडे पाहत मारू नको म्हणत होते. अनेकदा हा ताडन प्रकार सर्वत्र पाहावयास मिळतो. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांचा राग आपल्या लेकरांवर काढणे हे केवळ चूकच नाही तर एका प्रकारे पाप देखील आहे.
दत्त महाराजांना माता आणि तात या भावनेने नित्य पाहतो, आपल्या चुका त्यांनी उदार अंतःकरणाने माफ कराव्यात आणि सर्व झाल्या अपराधांची क्षमा करावी असे नित्य वाटत असते पण तोच न्याय इतरांना आपण देत नाही. आपल्या गंभीरातील गंभीर अपराधाची क्षमा दत्त महाराज करत असताना इतरांसमवेत असे वर्तन कधीही करू नका.
गुरुचरित्रात अगदी लहान बालकाला दत्त महाराजांनी उचलून कौतुक केल्याचा उल्लेख आहे. गंगा ही विप्र स्त्री पुत्रवती झाली तेव्हा काही दिवसांनी महाराजांच्या दर्शनाला ती आपल्या लहान मुलीला घेऊन आली. कडिये घेतले प्रीतीसी ll अगदी प्रेमाने महाराजांनी त्या लेकराला उचलून घेतले. त्या मुलीचा भविष्यकाळ सांगितला. अतिशय प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण अशा स्वभावाचे दत्त महाराज आहेत. दत्त महाराजांच्या करुणा त्रिपदीत त्यांच्या कनवाळू मनाचा अंदाज येतो. चोरांनी वल्लभेशाला मारताच त्यांचे मन कळवळले आहे, पोटशुळाने व्दिजाला वेदना होताच त्यांचे मन कळवळले आहे, व्दिज सुताचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे मन कळवळले आहे. माहूरच्या सतीचा पती मृत्यू पावताच त्यांचे मन कळवळले आहे.
लहान निष्पाप लेकरांना मारहाण करणे योग्य नाही. दत्त महाराजांना ते आवडणार नाही. सर्व घडणाऱ्या घटनांचे साक्षी ते असताना ताडनाचे असे प्रसंग आपल्या हातून झाल्यास कोणत्या तोंडाने क्षमस्वापराधम् — म्हणाल सांगा.
ll श्रीगुरुदेव दत्त ll
✍🏻 © – अभय आचार्य