मेवाड हॉटेल – औरंगाबाद स्पेशल !
औरंगाबाद मधील गुलमंडी वरील मेवाड हॉटेल कुणाला माहिती नसेल असा जुन्या पिढीतला किंवा अलीकडच्या पिढीतला माणूस विरळच. …
अजीब दास्ताॅं है ये कहां शुरु कहां खतम….
असं या मेवाड हॉटेलच्या इतिहासाबाबत किंवा माहितीबाबत म्हणता येईल ! आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या दोन व्यक्तींचा उल्लेख मेवाड हॉटेलच्या माहितीबद्दल किंवा इतिहासा बद्दल येथे मांडण्याचा प्रयत्न आहे. मला असलेल्या माहितीत भर टाकताना अनेक गोष्टींची शहानिशा व आमचे मित्र, मेवाड लॉजचे मालक शंकर परमानंदसेठ जोशी तसेच सोमण शास्त्री यांचे नातेवाईक सुभाष आपटे ( माजी व्यवस्थापक – देवगिरी ना.सह. बॅंक) यांच्या कडूनही झाली आहे.
मध्यप्रदेशातील इंदोरच्या होळकरांकडे भांडारकर नावाचे गृहस्थ मोठ्या पदावर होते. या भांडारकरांकडे एक हिंदी भाषिक जोशी व्यक्ती रसोईची म्हणजे स्वयंपाकाची व्यवस्था पाहत होते. या जोशींचा मुलगा म्हणजे परमानंद जोशी. परमानंद जोशीं वडिलांबरोबर भांडारकरांच्या घरातील एक लहान सदस्यच झाला होता. ह्या मुलाला तेथे राहण्याचा आणि काम करण्याचा कंटाळा आला म्हणून इंदूर सोडून आला तो औरंगाबादला !
रेल्वे स्टेशन वरील सूर्यप्रकाश नावाच्या एका हॉटेलमध्ये त्यांला काम मिळालं. याच हॉटेलमध्ये मोतीवाला हुंडेकऱ्याच काम पाहत होते. गुलमंडीवर एक पोलिस इन्स्पेक्टर हॉटेल चालवत होता. ओळखी ओळखीतून त्यांच्या हॉटेलमध्ये परमानंद जोशी कामाला लागले. या तरूण मुलामधील चमक आणि प्रामाणिकपणा पाहून हॉटेल मालकाने त्याला बीन भांडवली २५ टक्क्यावर working partner करून घेतले. प्रामाणिकपणा, सचोटी आणि व्यवसायिक हुशारीच्या बळावर परमानंद जोशींनी ही भागीदारी ५० टक्क्यांपर्यंत नेली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे वारे जोरात वाहत होते. गुलमंडीचे ठिकाण औरंगाबादच्या केंद्रस्थानी असल्यामुळे येथे अनेक सभा, चळवळी व्हायच्या. हा भाग तेव्हा जवळपास अशांतच असायचा. अशा मध्ये १९४७ साली या हॉटेल जवळ कृष्णा नावाच्या एका तरुणाचा निजामाच्या रोहिल्यांनी खून केला. या कृष्णाच्या अंत्ययात्रेला औरंगाबाद मधील दहा हजार लोक त्यावेळेस हजर होते असे म्हणतात. गुलमंडीवरचं वातावरण तंग असायचं. अशात हॉटेल दोन तीन महिने बंद राहिलं. परमानंद सेठनी मोठ्या हिमतीने आपल्या एका मित्राच्या भागीदारीत हे हॉटेल पूर्णपणे चालवायला घेतले. हे भागीदार होते जगन सेठ. तरी पण हॉटेल काही केल्या चालेना.
पूर्वी मुंबईमध्ये ट्राम सिटीबस सारख्या चालायच्या. मुंबईच्या या ट्राम मध्ये सोमण शास्त्री नावाचे गृहस्थ कंडक्टर म्हणून काम करत होते. काम करता करता त्यांच्या मनात विरक्तीची भावना आली. निवृत्ती स्वीकारली. आपल्या जवळ असलेलं सगळं दान करून काही अल्प-स्वल्प किमतीत विकून या गृहस्थांनी भारत भ्रमण सुरू केलं. भारतभर फिरून ते औरंगाबादला विसावले. संपूर्ण भारत पालथा घातल्यामुळे सोमण शास्त्रीं कुठल्याही गावाची, तेथील स्थळाची माहिती, त्या गावचे वैशिष्ट्य अतिशय व्यवस्थितपणे सांगायचे. आपल्या या संतांच्या भूमीचा, मातीचा गुणच असा काही आहे की एखाद्या माणसांमध्ये असलेले सद्गुण, दैवी भावना येथे आल्यावर अधिक दृढ होत जातात, उपकारक होत जातात असा इतिहास आहे.
केसरसिंग पुऱ्यातील (जिल्हा न्यायालया मागे) महादेव मंदिरात या सोमण शास्त्रींनी आश्रय घेतला. पूजा, अर्चा ध्यान आणि प्रबोधन असं कार्य सुरू झालं.
मेवाड हॉटेल पाहिजे तसं चालत नव्हतं यासाठी काय करावं या विवंचनेत परमानंद सेठ असताना कुणा एका व्यक्तीने त्यांना सोमण शास्त्रींंना भेटण्याचा सल्ला दिला. आणि सांगितलं की या व्यक्तीने जर तुम्हाला राम राम केला तर तुमचा ऊद्धार ठरलेला आहे. परमानंद सेठ सोमण शास्त्रींकडे गेले. त्यांच्यासमोर हात जोडण्याच्या आधीच सोमण शास्त्रींनी त्यांना राम राम केला. परमानंद सेठनीं त्यांना त्यांच्या हॉटेलवर येण्यासाठी आग्रह केला. सकाळी चार वाजता जेव्हा हॉटेल उघडाल तेव्हा मी तेथे येऊन बसतो असे ते म्हणाले.
दिव्यत्वाची प्रचीती
दिव्यत्वाची प्रचिती आल्या प्रमाणे परमानंद सेठनी सकाळीच चार वाजता हॉटेल उघडले आणि समोर गुडघ्यापर्यंत नाडीची विजार घातलेले (आजच्या बरमोडा सारखी), खांद्यावर एक शुभ्र पांढरा पंचा असलेले सोमण शास्त्री दत्त म्हणून तेथे आधीच हजर होते. परमानंद सेठनी त्यांना थेट गल्ल्यावरच बसवले. गल्ल्यावर बसल्या बसल्या गुलमंडी भागातील एक गृहस्थ, खांडरे हे चहा प्यायला हॉटेलमध्ये आले. त्यांना चहा दिल्यावर ते बिल द्यायला काउंटरवर गेले तर सोमण शास्त्रींनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं रोज सकाळी येऊन आपण चहा प्यायचा आणि बिल द्यायचं नाही.
परमानंद सेठ मागच्या बाकावर बसून कुठल्याशा नवीन दिव्यत्वाचा साक्षात्कार घेत होते. साधारण साडेसात आठ वाजेपर्यंत सोमण शास्त्री ‘जय शंकर, जय शंकर’ म्हणत गल्ल्यावर बसले होते. काम करणाऱ्यांची धावपळ चालू होती कारण गिर्हाईकांची वर्दळ वाढली होती. सोमण शास्त्रींनी गल्ल्यावरून हात फिरवला आणि जय शंकर म्हणत ते तडक निघून गेले. जाताना रात्री येतो म्हणून सांगून गेले.
रात्री दहा साडेदहा वाजता आल्यावर त्यांच्या हातात एक लोह चुंबक होते. त्या लोहचुंबकाने त्या काळी असलेली नाणी (खुर्दा – सुटे पैसे) वेगळे करत रात्री अकरा वाजता त्यांनी ती पूर्ण रक्कम ‘जय शंकर, जय शंकर’ म्हणत समोर मोजून मांडून ठेवली. परमानंद सेठ आणि जगन सेठचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. डोळ्यात तरळलेल्या अश्रूंसह त्यांनी सोमण शास्त्रींना नमस्कार केला.
शंकर महाराज
सोमण शास्त्री जय शंकर जय शंकर म्हणत टांग्याबिंग्याची वाट न पहाता किंवा अपेक्षाही न करता पायी निघून गेले. आता सोमण शास्त्रींना सगळे जयशंकर महाराज म्हणू लागले होते.
हॉटेलमधील गिऱ्हाईकी वाढली. रोज सकाळी खांडरे येऊन चहा पिऊन जायचे. जय शंकर महाराजांना नमस्कार करायचे आणि त्यांचाही नमस्कार स्वीकारायचे.
हा शिरस्ता खूप दिवस चालू होता. खाण्यापिण्याची कुठलीही इच्छा जयशंकरजींनी कधी व्यक्त केली नाही.
एक दिवस हॉटेलमध्ये जिलेबी तयार झाली. महाराज जिलेबी खाणार का? असं विचारल्यावर त्यांनी ताज्या जिलेबीची थाळी समोर ठेवायला सांगितलीआणि त्यांनी ती सगळी जिलेबी संपवून टाकली. कोणी काही बोललं नाही. महाराज हसत म्हणाले अरे आता गिऱ्हाईकासाठी जिलेबी संपली ! दोघं मालक म्हणाले महाराज आपण दुधाने अंघोळ केली तरी आम्ही काही म्हणणार नाही!!
एखाद्या सद्-गृहस्थाची कृपा, सद्भावना म्हणा किंवा त्यांच्यातील निर्मळ दिव्यत्व असो, ते कुणाच्या तरी प्रगती, समृद्धीचा दुवा असते, फळ ठरते! फक्त असावी लागते ती तुमची निष्ठा, आदर अन् विश्वास !!
गुलमंडी वरील मेवाडचा कारभार, व्यवसाय ऊभारी घेऊ लागला होता. सत्तर-ऐंशी लोक काम करू लागले होते. हॉटेलचे व्यवस्थापन उत्तम जमले होते. तसेच कामगारांमध्ये शिस्त रुजवली गेली होती. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची कल्पना होती. मला आठवतं विठ्ठलराव सपकाळ नावाचे सडपातळ पण कडक स्वभावाचे गृहस्थ सगळीकडे लक्ष ठेवून सारखे हॉटेलभर फिरत असत. काम करणाऱ्या मुलांना गिऱ्हाईकाला काय हवं काय नको पासून साफसफाई व बारीक सारीक गोष्टींची जाणीव करून देण्यात ते तत्पर होते. सुपरवायझरच म्हणा ना ! अजून एक गृहस्थ कधी प्रवेशद्वारा जवळ कधी मागच्या बाजूला निघणाऱ्या दाराजवळ शांतपणे लक्ष ठेवून उभे असायचे. त्यांचं नाव होतं खेडला. परमानंदसेठ पासून त्यांचे चिरंजीव शंकरसेठनी व्यवसाय पाही पर्यंत ते नेहमी बरोबर असतं. नागेश्वर वाडीत मेवाड लॉज शेजारच खेडलानी स्वतःचं मोठ घर आहे. तसेच मुलांनी छान दुकान थाटली आहेत.
वरील विवेचवा वरून मेवाड हॉटेलची व्यवस्था अतिशय अनुकरण करण्यासारखी होती हे लक्षात आलंच असेल. खरोखर हे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी, बरेच जण, मॅनेजमेंट तज्ञ या हॉटेलच्या मालकांना भेटायचे. व्यवस्थापना बद्दल विचारायचे. या व्यवस्थापन परंपरेतून किंवा या हॉटेल मधिल व्यवस्थापनाचे तंत्र अवगत झालेल्या बऱ्याच जणांनी, काम करणाऱ्यांनी औरंगाबाद मध्ये व आसपासच्या गावांमध्ये स्वतंत्र हॉटेल्स टाकले.
मालकांना कामगारांबद्दल आत्मीयता तर होतीच तसाच त्यांच्यावर वचक पण होता. या हॉटेलमध्ये कधी संप झाल्याचे मी ऐकले नाही.
श्रावणातील एका सोमवारी मेवाड हॉटेलमध्ये सत्यनारायणाची पूजा, तिर्थ-प्रसाद असायचा. शंकर जोशींनी नागेश्वर वाडीत मेवाड लॉज सुरू केल्यावर श्रावणातील पूजा आणि ओळखीच्या मित्र-मंडळीसाठी भोजन सुरू केले.
परलोक गमन
सोमण शास्त्री-जयशंकरजींच्या परिचयातील औरंगाबाद मधिल रामभाऊ दातार, आपटे खानावळ, कुंभार वाडा, रामभाऊ जोशी, अभ्यंकर. इत्यादी कुटुंबातील सदस्यांनाही त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद व त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. शेवटी रामभाऊ जोशी, स.भु. कॉलनी, यांच्या घरीच १९७८-७९ (अंदाजे) सोमण शास्त्रींनी देह ठेवला. त्यांचे अजून एक निकटवर्तीय दत्तात्रय खांबेटे यांनी अन्य सर्व संस्कार केले.
एका अज्ञात देवमाणसाने औरंगाबाद मध्ये येऊन निरपेक्ष वृत्तीने जमेल तशा प्रकारे आपली दिव्य शक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची भावना, धारणा असणाऱ्यांचे बस्तान बसवण्यासाठी वापरावी हे आश्चर्यकारक व अप्रुपच वाटत नाही का?
दिव्यत्वावरची श्रद्धा आणि श्रद्धेचं फळ म्हणजे मेवाड हॉटेल!
आपण सर्वांनी या अमृततुल्य हॉटेलमध्ये घेतलेल्या चहा पासून दाक्षिणात्य व अन्य पदार्थांचा, जेवणाचा घेतलेला आस्वाद काही औरच होता!
पुढे या भागिदारांनी शहागंज भागातही मेवाड हॉटेल सुरू केले. ‘मेवाड’ हा शब्द जणू खाण्यापिण्याचं एक विश्वसनीय प्रतिक ठरलं होतं. स्वादिष्ट – चवदार पदार्थ, स्वच्छता-नीटनेटकेपणा व माणुसकीचे ठिकाण ही ठरलं! नागेश्वर वाडीतील मेवाड लॉज हे परमानंद सेठचे अजून एक नंतरचे प्रतिष्ठान. पुढच्या पिढीने, दोन्ही भागीदारांच्या नात्यातील व्यक्तींनी ‘मेवाड’ हा शब्द अंतर्भूत धरून नवनवीन हॉटेल्स वेगवेगळ्या भागात सुरू केली. या व्यवसायाने दोघा भागीदारांच्या पिढ्यांना समृद्ध केलं. आज गुलमंडीवरचे मेवाड नसले तरी मेवाड हॉटेल मधील पदार्थांची चव आणि आठवणी मनात कायम आहेत.
या बद्दल अधिक माहिती असणारांनी जरूर टाकावी. कमेंटमध्ये