Ramkrishna Kathar

प्राध्यापक, विचारवंत, लेखक, उद्योजक

रामकृष्ण काथार

जीवन प्रगती महाविद्यालय, श्री साई कॉम्प्युटर वाळूज चे सर्वे सर्वा, वाचनाची आणि लेखनाची प्रचंड आवड असणारे श्री काथार सरांचे स्व-लिखित आणि काही संपादित / संकलित लेख आपल्याला या पेजवर वाचायला मिळेल. 

आम्हाला आशा आहे की आपणास हे लेख नक्की आवडतील. 

आपण लेखकाच्या नावासह पोस्ट शेयर करू शकता. 

मो. नं. : 9763762088 

कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको

कहाणी अनोख्या रिझल्टची

यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत. परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला आहे त्यामुळे या निकालाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.


परिक्षा न घेताच निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहिसे थट्टेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोविड बॅच, लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास अशी शेरेबाजी सुरू झाली आहे.

Whatsapp वर अशा अनेक मीम्स, वात्रट विनोद यांचा भडीमार होत आहे. या शर्यतीत लंगड्या घोड्यांनीही बाजी मारलेय त्यामूळे पेढे वगैरे वाटून, कौतुक करण्यासारखे विशेष काहि नाहि अशी कुजकट बोलणी करणारेही काहि महाभाग आहेत.

अशावेळी ज्यांनी करोनाच्या या महासंकटात, अत्यंत विपरीत परिस्थितीत, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातील एका महत्त्वाच्या परिक्षेचा अगदि जीव तोडून अभ्यास केला आहे त्या प्रामाणिक कोवळ्या मनांवर अशाप्रकारे खिल्ली उडवून आघात करणे योग्य नाहि याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.


करोनाच्या या महाभयंकर संकटाला आपला देश आणि सर्व जग पहिल्यांदाच सामोरे जात आहे. कित्येक गोष्टी या test and trial basis वर केल्या जात आहेत कारण या अशा विपरीत परिस्थितीत नेमक्या काय योजना आखाव्यात, कशा प्रकारचे नियोजन करावे याचा पुर्वानुभव कोणालाच नव्हता त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सरकारने हा जो काहि निर्णय शालांत परिक्षेच्या बाबतीत घेतला आहे तो योग्यच म्हणायला हवाय. दुसरा काहि पर्यायच नव्हता. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अगदि योग्यच आहे.

न भुतो न भविष्यती


इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती सर्वांचीच होती. दहावी – बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात करोनाचे महासंकट उभे राहिले होते. घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले होते. शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्या होत्या. परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जातील याची काहिच पुर्वकल्पना विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसेच शिक्षकांनासुद्धा नव्हती. सर्वच गोंधळाचे वातावरण होते. online अभ्यासात अनंत अडचणी होत्या. शेवटि प्रत्यक्ष वर्गात बसून, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी मित्रांच्या सहवासात केलेला अभ्यास आणि घराच्या एका कोपऱ्यात बसून मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर यापूर्वी कधिही न अनुभवलेला असा अभ्यास यामध्ये खूपच फरक आहे. या अभ्यासाला सरावण्यासाठीच मुलांना काहि काळ लागला.

या महत्वपूर्ण परिक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे दडपण मुलांवर असतेच त्यात हि अशी विपरीत परिस्थिती…. अशावेळी मुलांची मानसिक स्थिती काय असावी याचा अंदाज न केलेलाच बरा. शहरातील मुलांना तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध असतात पण गाव खेड्यातील मुलांच्या अभ्यासाची तर पार दैना उडाली आहे पण दोष तरी कोणाला द्यायचा ? काहि अपवाद वगळले तर बरेचसे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करत होते. शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यात अडचणी असल्याने यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या काही शैक्षणिक सुविधांचा पर्याय शोधला जात होता. जमेल त्याप्रकारे विषय समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते कारण कुठल्याही स्वरूपात परीक्षा होणारच हिच धारणा होती. त्यासाठी जीव तोडून अभ्यास केला जात होता.

हे नसे फुकाचे, प्रयत्न असे अनेकांचे

शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या विविध अंतर्गत चाचण्यांना प्रामाणिकपणे सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मुलांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना, मेहनतीला दाद द्यावीच लागेल. परीक्षा घेतल्या जाणार नाहित हा निर्णय अगदि शेवटी घेतला गेला होता त्यामुळे मुलांनी आता मिळवलेले गुण हे फुकटचे आहेत असे कोणीहि म्हणू नये.

या वर्षातील त्यांची मानसिक स्थितीसुद्धा लक्षात घ्यावी. काहि दुर्दैवी मुलांनी तर जॉब घालवून घरात बसलेले बाबा, कोविड सेंटरमध्ये १५ दिवस विलगीकरणात गेलेले पालक, जवळचे गमावलेले नातेवाईक असे आघातसुद्धा सहन केले होते.

कौतुकाची थाप हवीच


अशा एकूण परिस्थितीत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केलेच पाहिजे. नेहमीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापन कदाचित झाले नसेलहि परंतु या मिळवलेल्या गुणांचे महत्व त्यामुळे कमी होत नाहि. काहींना अपेक्षेहून जास्त तर काहि प्रामाणिक कष्ट केलेल्या मुलांवर अन्यायसुद्धा झाला असेल पण प्राप्त परिस्थितीत दूसरा कोणता ईलाजहि नाहि हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. या कोवळ्या मनांना उभारी देण्याचे काम आपणच करायला हवे.

त्यांच्या मनात कोणताहि प्रकारचा न्यूनगंड निर्माण होणार नाहि याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कौतूकाचा पेढा त्यांच्या तोंडात भरवलाच पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कुठेही कमी पडणार नाहि याची काळजी सुद्धा घ्यायलाच पाहिजे.

👍💐

जयशंकर व मेवाड हॉटेल – आश्चर्यकारक संबंध !


मेवाड हॉटेल – औरंगाबाद स्पेशल !

औरंगाबाद मधील गुलमंडी वरील मेवाड हॉटेल कुणाला माहिती नसेल असा जुन्या पिढीतला किंवा अलीकडच्या पिढीतला माणूस विरळच. …


अजीब दास्ताॅं है ये कहां शुरु कहां खतम….
असं या मेवाड हॉटेलच्या इतिहासाबाबत किंवा माहितीबाबत म्हणता येईल ! आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या दोन व्यक्तींचा उल्लेख मेवाड हॉटेलच्या माहितीबद्दल किंवा इतिहासा बद्दल येथे मांडण्याचा प्रयत्न आहे. मला असलेल्या माहितीत भर टाकताना अनेक गोष्टींची शहानिशा व‌ आमचे मित्र, मेवाड लॉजचे मालक शंकर परमानंदसेठ जोशी तसेच सोमण शास्त्री यांचे नातेवाईक सुभाष आपटे ( माजी व्यवस्थापक – देवगिरी ना.सह. बॅंक) यांच्या कडूनही झाली आहे.

मध्यप्रदेशातील इंदोरच्या होळकरांकडे भांडारकर नावाचे गृहस्थ मोठ्या पदावर होते. या भांडारकरांकडे एक हिंदी भाषिक जोशी व्यक्ती रसोईची म्हणजे स्वयंपाकाची व्यवस्था पाहत होते. या जोशींचा मुलगा म्हणजे परमानंद जोशी. परमानंद जोशीं वडिलांबरोबर भांडारकरांच्या घरातील एक लहान सदस्यच झाला होता. ह्या मुलाला तेथे राहण्याचा आणि काम करण्याचा कंटाळा आला म्हणून इंदूर सोडून आला तो औरंगाबादला !
रेल्वे स्टेशन वरील सूर्यप्रकाश नावाच्या एका हॉटेलमध्ये त्यांला काम मिळालं. याच हॉटेलमध्ये मोतीवाला हुंडेकऱ्याच काम पाहत होते. गुलमंडीवर एक पोलिस इन्स्पेक्टर हॉटेल चालवत होता. ओळखी ओळखीतून त्यांच्या हॉटेलमध्ये परमानंद जोशी कामाला लागले. या तरूण मुलामधील चमक आणि प्रामाणिकपणा पाहून हॉटेल मालकाने त्याला बीन भांडवली २५ टक्क्यावर working partner करून घेतले. प्रामाणिकपणा, सचोटी आणि व्यवसायिक हुशारीच्या बळावर परमानंद जोशींनी ही भागीदारी ५० टक्क्यांपर्यंत नेली.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे वारे जोरात वाहत होते. गुलमंडीचे ठिकाण औरंगाबादच्या केंद्रस्थानी असल्यामुळे येथे अनेक सभा, चळवळी व्हायच्या. हा भाग तेव्हा जवळपास अशांतच असायचा. अशा मध्ये १९४७ साली या हॉटेल जवळ कृष्णा नावाच्या एका तरुणाचा निजामाच्या रोहिल्यांनी खून केला. या कृष्णाच्या अंत्ययात्रेला औरंगाबाद मधील दहा हजार लोक त्यावेळेस हजर होते असे म्हणतात. गुलमंडीवरचं वातावरण तंग असायचं. अशात हॉटेल दोन तीन महिने बंद राहिलं. परमानंद सेठनी मोठ्या हिमतीने आपल्या एका मित्राच्या भागीदारीत हे हॉटेल पूर्णपणे चालवायला घेतले. हे भागीदार होते जगन सेठ. तरी पण हॉटेल काही केल्या चालेना.

पूर्वी मुंबईमध्ये ट्राम सिटीबस सारख्या चालायच्या. मुंबईच्या या ट्राम मध्ये सोमण शास्त्री नावाचे गृहस्थ कंडक्टर म्हणून काम करत होते. काम करता करता त्यांच्या मनात विरक्तीची भावना आली. निवृत्ती स्वीकारली. आपल्या जवळ असलेलं सगळं दान करून काही अल्प-स्वल्प किमतीत विकून या गृहस्थांनी भारत भ्रमण सुरू केलं. भारतभर फिरून ते औरंगाबादला विसावले. संपूर्ण भारत पालथा घातल्यामुळे सोमण शास्त्रीं कुठल्याही गावाची, तेथील स्थळाची माहिती, त्या गावचे वैशिष्ट्य अतिशय व्यवस्थितपणे सांगायचे. आपल्या या संतांच्या भूमीचा, मातीचा गुणच असा काही आहे की एखाद्या माणसांमध्ये असलेले सद्गुण, दैवी भावना येथे आल्यावर अधिक दृढ होत जातात, उपकारक होत जातात असा इतिहास आहे.
केसरसिंग पुऱ्यातील (जिल्हा न्यायालया मागे) महादेव मंदिरात या सोमण शास्त्रींनी आश्रय घेतला. पूजा, अर्चा ध्यान आणि प्रबोधन असं कार्य सुरू झालं.

मेवाड हॉटेल पाहिजे तसं चालत नव्हतं यासाठी काय करावं या विवंचनेत परमानंद सेठ असताना कुणा एका व्यक्तीने त्यांना सोमण शास्त्रींंना भेटण्याचा सल्ला दिला. आणि सांगितलं की या व्यक्तीने जर तुम्हाला राम राम केला तर तुमचा ऊद्धार ठरलेला आहे. परमानंद सेठ सोमण शास्त्रींकडे गेले. त्यांच्यासमोर हात जोडण्याच्या आधीच सोमण शास्त्रींनी त्यांना राम राम केला. परमानंद सेठनीं त्यांना त्यांच्या हॉटेलवर येण्यासाठी आग्रह केला. सकाळी चार वाजता जेव्हा हॉटेल उघडाल तेव्हा मी तेथे येऊन बसतो असे ते म्हणाले.

दिव्यत्वाची प्रचीती

दिव्यत्वाची प्रचिती आल्या प्रमाणे परमानंद सेठनी सकाळीच चार वाजता हॉटेल उघडले ‌ आणि समोर गुडघ्यापर्यंत नाडीची विजार घातलेले (आजच्या बरमोडा सारखी), खांद्यावर एक शुभ्र पांढरा पंचा असलेले सोमण शास्त्री दत्त म्हणून तेथे आधीच हजर होते. परमानंद सेठनी त्यांना थेट गल्ल्यावरच बसवले. गल्ल्यावर बसल्या बसल्या गुलमंडी भागातील एक गृहस्थ, खांडरे हे चहा प्यायला हॉटेलमध्ये आले. त्यांना चहा दिल्यावर ते बिल द्यायला काउंटरवर गेले तर सोमण शास्त्रींनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं रोज सकाळी येऊन आपण चहा प्यायचा आणि बिल द्यायचं नाही.
परमानंद सेठ मागच्या बाकावर बसून कुठल्याशा नवीन दिव्यत्वाचा साक्षात्कार घेत होते. साधारण साडेसात आठ वाजेपर्यंत सोमण शास्त्री ‘जय शंकर, जय शंकर’ म्हणत गल्ल्यावर बसले होते. काम करणाऱ्यांची धावपळ चालू होती कारण गिर्‍हाईकांची वर्दळ वाढली होती. सोमण शास्त्रींनी गल्ल्यावरून हात फिरवला आणि जय शंकर म्हणत ते तडक निघून गेले. जाताना रात्री येतो म्हणून सांगून गेले.


रात्री दहा साडेदहा वाजता आल्यावर त्यांच्या हातात एक लोह चुंबक होते. त्या लोहचुंबकाने त्या काळी असलेली नाणी (खुर्दा – सुटे पैसे) वेगळे करत रात्री अकरा वाजता त्यांनी ती पूर्ण रक्कम ‘जय शंकर, जय शंकर’ म्हणत समोर मोजून मांडून ठेवली. परमानंद सेठ आणि जगन सेठचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. डोळ्यात तरळलेल्या अश्रूंसह त्यांनी सोमण शास्त्रींना नमस्कार केला.

शंकर महाराज

सोमण शास्त्री जय शंकर जय शंकर म्हणत टांग्याबिंग्याची वाट न पहाता किंवा अपेक्षाही न करता पायी निघून गेले. आता सोमण शास्त्रींना सगळे जयशंकर महाराज म्हणू लागले होते.
हॉटेलमधील गिऱ्हाईकी वाढली. रोज सकाळी खांडरे येऊन चहा पिऊन जायचे. जय शंकर महाराजांना नमस्कार करायचे आणि त्यांचाही नमस्कार स्वीकारायचे.
हा शिरस्ता खूप दिवस चालू होता. खाण्यापिण्याची कुठलीही इच्छा जयशंकरजींनी कधी व्यक्त केली नाही.
एक दिवस हॉटेलमध्ये जिलेबी तयार झाली. महाराज जिलेबी खाणार का? असं विचारल्यावर त्यांनी ताज्या जिलेबीची थाळी समोर ठेवायला सांगितलीआणि त्यांनी ती सगळी जिलेबी संपवून टाकली. कोणी काही बोललं नाही. महाराज हसत म्हणाले अरे आता गिऱ्हाईकासाठी जिलेबी संपली ! दोघं मालक म्हणाले महाराज आपण दुधाने अंघोळ केली तरी आम्ही काही म्हणणार नाही!!

एखाद्या सद्-गृहस्थाची कृपा, सद्भावना म्हणा किंवा त्यांच्यातील निर्मळ दिव्यत्व असो, ते कुणाच्या तरी प्रगती, समृद्धीचा दुवा असते, फळ ठरते! फक्त असावी लागते ती तुमची निष्ठा, आदर अन् विश्वास !!
गुलमंडी वरील मेवाडचा कारभार, व्यवसाय ऊभारी घेऊ लागला होता. सत्तर-ऐंशी लोक काम करू लागले होते. हॉटेलचे व्यवस्थापन उत्तम जमले होते. तसेच कामगारांमध्ये शिस्त रुजवली गेली होती. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची कल्पना होती. मला आठवतं विठ्ठलराव सपकाळ नावाचे सडपातळ पण कडक स्वभावाचे गृहस्थ सगळीकडे लक्ष ठेवून सारखे हॉटेलभर फिरत असत. काम करणाऱ्या मुलांना गिऱ्हाईकाला काय हवं काय नको पासून साफसफाई व बारीक सारीक गोष्टींची जाणीव करून देण्यात ते तत्पर होते. सुपरवायझरच म्हणा ना ! अजून एक गृहस्थ कधी प्रवेशद्वारा जवळ कधी मागच्या बाजूला निघणाऱ्या दाराजवळ शांतपणे लक्ष ठेवून उभे असायचे. त्यांचं नाव होतं खेडला. परमानंदसेठ पासून त्यांचे चिरंजीव शंकरसेठनी व्यवसाय पाही पर्यंत ते नेहमी बरोबर असतं. नागेश्वर वाडीत मेवाड लॉज शेजारच खेडलानी स्वतःचं मोठ घर आहे. तसेच मुलांनी छान दुकान थाटली आहेत.
वरील विवेचवा वरून मेवाड हॉटेलची व्यवस्था अतिशय अनुकरण करण्यासारखी होती हे लक्षात आलंच असेल. खरोखर हे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी, बरेच जण, मॅनेजमेंट तज्ञ या हॉटेलच्या मालकांना भेटायचे. व्यवस्थापना बद्दल विचारायचे. या व्यवस्थापन परंपरेतून किंवा या हॉटेल मधिल व्यवस्थापनाचे तंत्र अवगत झालेल्या बऱ्याच जणांनी, काम करणाऱ्यांनी औरंगाबाद मध्ये व आसपासच्या गावांमध्ये स्वतंत्र हॉटेल्स टाकले.
मालकांना कामगारांबद्दल आत्मीयता तर होतीच तसाच त्यांच्यावर वचक पण होता. या हॉटेलमध्ये कधी संप झाल्याचे मी ऐकले नाही.
श्रावणातील एका सोमवारी मेवाड हॉटेलमध्ये सत्यनारायणाची पूजा, तिर्थ-प्रसाद असायचा. शंकर जोशींनी नागेश्वर वाडीत मेवाड लॉज सुरू केल्यावर श्रावणातील पूजा आणि ओळखीच्या मित्र-मंडळीसाठी भोजन सुरू केले.

परलोक गमन


सोमण शास्त्री-जयशंकरजींच्या परिचयातील औरंगाबाद मधिल रामभाऊ दातार, आपटे खानावळ, कुंभार वाडा, रामभाऊ जोशी, अभ्यंकर. इत्यादी कुटुंबातील सदस्यांनाही त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद व त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. शेवटी रामभाऊ जोशी, स.भु. कॉलनी, यांच्या घरीच १९७८-७९ (अंदाजे) सोमण शास्त्रींनी देह ठेवला. त्यांचे अजून एक निकटवर्तीय दत्तात्रय खांबेटे यांनी अन्य सर्व संस्कार केले.
एका अज्ञात देवमाणसाने औरंगाबाद मध्ये येऊन निरपेक्ष वृत्तीने जमेल तशा प्रकारे आपली दिव्य शक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची भावना, धारणा असणाऱ्यांचे बस्तान बसवण्यासाठी वापरावी हे आश्चर्यकारक व अप्रुपच वाटत नाही का?

दिव्यत्वावरची श्रद्धा आणि श्रद्धेचं फळ म्हणजे मेवाड हॉटेल!

आपण सर्वांनी या अमृततुल्य हॉटेलमध्ये घेतलेल्या चहा पासून दाक्षिणात्य व अन्य पदार्थांचा, जेवणाचा घेतलेला आस्वाद काही औरच होता!
पुढे या भागिदारांनी शहागंज भागातही मेवाड हॉटेल सुरू केले. ‘मेवाड’ हा शब्द जणू खाण्यापिण्याचं एक विश्वसनीय प्रतिक ठरलं होतं. स्वादिष्ट – चवदार पदार्थ, स्वच्छता-नीटनेटकेपणा व माणुसकीचे ठिकाण ही ठरलं! नागेश्वर वाडीतील मेवाड लॉज हे परमानंद सेठचे अजून एक नंतरचे प्रतिष्ठान. पुढच्या पिढीने, दोन्ही भागीदारांच्या नात्यातील व्यक्तींनी ‘मेवाड’ हा शब्द अंतर्भूत धरून नवनवीन हॉटेल्स वेगवेगळ्या भागात सुरू केली. या व्यवसायाने दोघा भागीदारांच्या पिढ्यांना समृद्ध केलं. आज गुलमंडीवरचे मेवाड नसले तरी मेवाड हॉटेल मधील पदार्थांची चव आणि आठवणी मनात कायम आहेत.



या बद्दल अधिक माहिती असणारांनी जरूर टाकावी. कमेंटमध्ये

औरंगाबाद आणि पुरे

अनोखा वारसा पुरांचा -औरंगाबाद

औरंगाबाद शहराला फार मोठा ऐतीहसिक वारसा लाभलेला आहे. तो आज जरी दुर्लक्षित असला तरीही त्यांची मुळे आजूनही शहरात घट्ट रोवलेली दिसतात.
औरंगजेब याने खडकी नामक या शहराला औरंगाबाद असे नाव दिले.

औरंगाबाद आणि पुरे - Aurangabad

एकूण ५२ दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ह्या शहरात असलेले ५४ पेक्षा अधिक “पुरे”.
औरंगजेब याच्या सरदारांच्या छावण्या ज्या ठिकाणी पडत गेल्या त्या त्या भागांना “ पुरा “ असे संबोधल्या गेले.


औरंगाबाद बस स्थानकापासून रेल्वे स्थानकाकडे जात असतांना त्यापैकी कर्णपुरा आणि पदमपुरा हे दोन पुरे लागतात. बिकानेर येथील राजा करणसिंह याची वस्ती कर्णपुरा भागात, तर त्याचा पुत्र पदमसिंह याची वस्ती पदमपुरा येथे होती.


करणसिंह ह्याचा दुसरा मुलगा केशरसिंह याची वस्ती ज्या भागात होती त्यास केशरसिंहपुरा असे म्हणत. आजहि बाबा पेट्रोल पंपावरून क्रांती चौकाकडे जात असतांना केशरसिंहपुऱ्याचे अस्तित्व आपल्याला जाणविते.
त्याच प्रमाणे जयसिंगपुरा हा जोधपुरच्या मिर्झाराजे जयसिंग यांचा जयसिंगपुरा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासामोरील भाग.


राजा अमरसिंगाचा मुलगा रावराजसिंग यांची वस्ती म्हणजे रावसपुरा.
बुन्देलखंडातील ओरछाचा राजा पहाडसिंग यांच्या वस्तीला पहाडसिंगपुरा म्हंटले जाते, पहाडसिंगपुरा म्हणजे बेगमपुरा आणि औरंगाबाद लेण्यांच्या मधला परिसर.
पहाडसिंग यानेच विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल बांधला. त्याचेच नातेवाईक रणमस्तखानचा रणमस्तपुरा तर कुतुबुद्दीनचा कुतुबपुरा यांचे अस्तित्व आजही औरंगाबाद शहरात जाणवते.


शहाजीराजे यांचे चुलत भाऊ मालोजी आणि परसोजी यांच्या नावावरून मालोजीपुरा आणि परासोजीपुरा या दोन वस्त्या निर्माण झाल्या.
अशा प्रकारे निर्माण झालेल्या वस्त्या म्हणजे आजचे औरंगाबाद शहरातील ” पुरे “.


इतिहासातील दास्तऐवजानुसार व माहितीतले असे एकूण ५६ पुऱ्यांची नावे मला सापडली.

ते पुरे खालील प्रमाणे. यातील बरिच ठिकाणे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत, तर काही वसाहती नामशेष झालेल्या आहेत.

(१) बेगमपुरा (२) औरंगपुरा (३) मुकामपुरा (४) फाजलपुरा (५) अहिरपुरा (६) दावद्पुरा (७) नवाबपुरा (८) बायजीपुरा (९) दरवेशपुरा (१०) नक्षपुरा (११) कुतुबपुरा (१२) जसुपुरा (१३) सुलतानपुरा (१४) कर्णपुरा (१५) चेलीपुरा (१६) सबकर्णपुरा (१७) इस्माइलपुरा (१८) तानाजीपुरा (१९) पदमपुरा (२०) लासगोपालपुरा (२१) मंजुरपुरा (२२) हैसिंगपुरा (२३) परतबपुरा (२४) पहाडसिंगपुरा (२५) जमालपुरा (२६) मानसिंगपुरा (२७) जयसिंगपुरा (२८) जसवंतसिंगपुरा (२९) भावसिंगपुरा (३०) जयचंदपुरा (३१) जासुद्पुरा (३२) रणमस्तपुरा (३३) पैदापुरा (३४) हमीलपुरा (३५) धोतीपुरा (३६) कलहालपुरा (३७) परासोजीपुरा (३८) तबीबपुरा (३९) रावसपुरा (४०) चाकरपुरा (४१) कोतवालपुरा (४२) लालवंतपुरा (४३) असदपुरा (४४) रामपुरा (४५) रेंगटीपुरा (४६) केशरसिंगपुरा (४७) बलोचपुरा (४८) राम्बापुरा (४९) खोकडपुरा (५०) मालोजीपुरा (५१) उस्मानपुरा (५२) कागजीपुरा (५३) काबाडीपुरा (५४) किराडपुरा (५५) महमूदपुरा आणि (५६) रशीद्पुरा

आणखी आपल्या माहितीत असेल तर कमेंटमध्ये कळवा

1 thought on “Ramkrishna Kathar”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top