श्री महादेव रूद्र अभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती ( Abhishek )
रुद्र अभिषेक : कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदेवाला अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पुर्ण वास्तु मध्ये शिपडावे.
महाशिवरात्री ला विशेष महत्व
महाशिवरात्री ला रुद्राभिषेकाचे विशेष महत्व आहे, हा रुद्र अभिषेक महादेवाला अतिशय प्रिय आहे. या अभिषेकाने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि सर्व दुखांचा नाश करतात म्हणून महाशिवरात्रीला निशा समयी म्हणजे मध्यरात्री १२ ते १ मध्ये हा अभिषेक शिव लिंगावर नक्की करावा. या दिवशी ऊसाच्या रसाने अभिषेक करण्याचा सुद्धा प्रघात आहे ज्याने प्रभू शिवजी लकवर प्रसन्न होतात.
रुद्राभिषेकाचे महत्व
रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.
रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:
१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः” असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.
२] अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.
याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात.
एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.
यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]
तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]
सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]
त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.
आता भक्त या अभिषेक मध्ये ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.
तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.
रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.
हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे म्हणजे अभिषेकाचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.
या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
अभिषेक :
अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.
श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक.
रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने.
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने.
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने.
अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१ आवर्तने.
ॐ नम: शिवाय