समृद्ध इतिहासाचे अडगळीत संग्रहालय गुरु पादुका संस्थान शिवना

संग्राहक लेखक : विजय पगारे 📲 9860124501

Balkrushna Maharaj
Article About Old and ignored History

धर्मपिठाच्या अडगळीत पडलेल्या दुर्मिळ संग्रहाविषयी

भारत देशात प्राचीन काळापासूनच गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. ती आधुनिकतेच्या अवडंबरात कधीचीच नाहीशी झाली. मात्र भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास येथूनच सुरु होतो, ही त्यातली एक समाधानकारक बाब.
भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरु झाले आणि ही शिक्षण पद्धती हळू-हळू संपुष्टात आली. मात्र काही धर्मपीठात ती अव्याहत सुरु राहिली. महाराष्ट्रातील काही मोजक्या जागीच ही धर्मपीठे धर्म वाढीसाठी मुलांना व्याकरण,योगशास्त्र, हस्तकौशल्य, वैद्यकशास्त्र, न्यायशास्त्र आणि अध्यात्म या सारख्या विषयाचे शिक्षण देत होती.


ही धर्मपीठे त्यावेळी धर्म वाढीचा मुख्य पाया होती. या धर्म पिठात मोठ्या प्रमाणात दुर्मिळ ग्रंथ संपदा, हस्तलिखिते होती.काळाच्या ओघात त्या ग्रंथ संपदा नष्ट झाल्या, तर काही अभ्यासकांच्या हाती लागल्या, ज्या नंतर संग्रहालयात जतन करण्यात आल्या. मात्र काही अशाच अडगळीत पडून राहिल्या अभ्यासकांच्या शोधात……

 

शेवटच्या घटका मोजीत…!
अशाच एका ऐतिहासिक धर्मपिठाच्या अडगळीत पडलेल्या दुर्मिळ संग्रहाविषयीचा हा लेख……!

 

 

गुरु पिठाचा विस्मृत इतिहास

महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन गेले, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला. आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळेच आध्यात्मिक समता घडली. संत तुकाराम महाराजानंतरही संत परंपरा महाराष्ट्रात अखंडपणे सुरु राहिली. या महान संतानंतर ही महाराष्ट्रात अनेक संतांनी जन्म घेतला.

बाळकृष्ण महाराज ​

ई.स.वी.सन 1750 दरम्यान मराठवाड्यावर निजामी राजवट राज्य करीत होती. या काळामध्ये हिंदू धर्म वाढवण्याचे व टिकवण्याचे कार्य शिवना. ता. सिल्लोड येथील बाळकृष्ण महाराज यांनी व त्यांच्या पुढील पिढ्यांनी केले. सदगुरु बाळकृष्ण महाराज या संताचा ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला. त्यांनी आपले आयुष्य ईश्वर सेवेत वाहून घेतले. भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह करीत व उर्वरित वेळ ईश्वर साधनेत घालवत.वर्षातील अनेक महिने ते तिर्थाटनासाठी भारत भर भ्रमंती करीत. वेद शास्त्राचे धडे घेत. वेद शास्त्रात ते पारंगत झाल्या नंतर शंकराचार्यांनी त्यांची परिक्षा घेत त्यांना “वेद शास्त्र संपन्न विभूती” हा बहुमान बहाल केला. ते बेरार सुभ्यातील एकमेव वेद शास्त्र संपन्न विभूती होते. ते भगवान शंकराचे निस्सीम उपासक होते. काही वर्षाच्या साधनेनंतर त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकराच्या उपासनेसाठी ते सूक्ष्म रूपाने काशीला जात. आपल्या शिष्यांना आपण काशी विश्वेश्वराचे दर्शन घडवून देऊ शकत नाही, ही खंत त्यांच्या मनाला नेहमी बोचत असे. ह्या उद्विग्नेतून त्यांनी काशीला जाऊन तेथून स्वताच्या डोक्यावर हजारो की .मी. पायी प्रवास करीत अवजड असे शिवलिंग शिवण्यात घेऊन आले. आज तेच शिवलिंग संस्थानातील बाळकृष्ण महाराजांच्या मूर्ती जवळ स्थापित आहे. बाळकृष्ण महाराज यांचे संपूर्ण आयुष्य आध्यात्म, योगसाधना व शिष्य घडवणुकीत व्यतीत होऊन त्यांनी इ.स.वी.सन 1834 साली काशी येथे गंगेत जल समाधी घेतली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तेथे स्थानिकांनी गंगा तटावर घाट बांधित, त्यास *“बाला घाट”* हे नाव दिले. आज काशीला एकूण *88* घाट अस्तित्वात आहे.

रामचंद्र कृष्ण महाराज

पुढे हाच अध्यात्माचा वारसा बाळकृष्ण महाराज यांचे पुत्र *रामचंद्र कृष्ण महाराज* यांनी चालवला त्यांनी आपले गुरु व वडील बाळकृष्ण महाराज यांच्या नावाने शिवन्यात *1835* साली *“गुरु पादुका संस्थान”* ची उभारणी केली. या संस्थान मार्फत त्यांनी गुरु-शिष्य परंपरेला वाहून घेतले. अनेक वर्षानंतरही त्यांना संतती सुख लाभले नाही. शिवना गावचे ग्राम दैवत *शिवाबाई* च्या आराधनेत स्वत:ला झोकून दिले. त्यांनी तब्बल 12 वर्षे *गायत्री पुरश्चरण व्रत* अंगिकारले. या कठीण अशा व्रतात ते शिवना गावातील मोजक्या दोन-चार घरातून कोरडी शिधा भिक्षेत घेऊन शिवाबाई मंदिर परिसरातील गो-मातेला देत. गोमातेच्या विष्ठेतुन निघणाऱ्या धान्यापासून ते भाकरी करीत, त्याचा नैवेद्य देवीला देऊन उरलेले अन्न व दूध ते स्वत; ग्रहण करीत. त्यांची सतत *12* वर्षाची निश्चल भक्ती बघून शिवाबाई देवी त्यांना प्रसन्न झाली. त्यांनी देवीस संतती सुख मागितले. देवीने त्यांना त्यांच्या अतिउच्च आराधने पायी तुला *“सूर्यासारखा तेजस्वी पुत्र”* होईल व “तो तुझ्या कुळाचा उदधार करेल” असा वर दिला. कालांतराने रामचंद्र कृष्ण महाराज यांच्या पत्नीस सूर्यासारखा तेजस्वी पुत्र झाला.त्याचे नामकरण *“सुर्यनारायण”* करण्यात आले. दीक्षा घेऊन सूर्यनारायण हे वेद शास्त्रात पारंगत झाले. अल्पावधीतच त्यांची कीर्ती महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरली. अशातच रामचंद्र महाराज यांचे *आपेगाव* येथे निधन झाले.भक्तांनी त्यांची समाधी तेथेच उभारली. एका निस्सीम शिवाबाई भक्ताचे वैकुंठगमन झाले.

सूर्य नारायण महाराज

सुर्यनारायण महाराज रोज शिवाबाईस दुपारी बारा वाजेला नैवेद्य घेऊन जात.त्यांच्या या कार्यात कधीही खंड पडला नाही.एके दिवशी हाच नित्याचा क्रम बघून निजामी रझाकारांनी (सैनिकांनी) त्यांना हटकले व *“रोज ये पत्थर की मुरत को क्या ले जाता है?”* असे म्हणत हिणवले. सूर्य नारायण महाराजांनी “हा नैवेद्य आहे, मी देवीला नेत असतो” असे उत्तर दिले. त्यावर रझाकार म्हणाला *“जरा हमे भी दिखावो,पत्थर की मुरत कैसे खाती और पिती है”* महाराजांनी दोन्ही रझाकारांना शिवाबाई मंदिरात नेले व त्यांच्या समोर शिवाबाई देवीस तांब्यातील दुध पाजले. मूर्तीला दूध पितांना पाहून रझाकारांच्या पाचावर धारण बसली. ते सैरावरा पळू लागले. काहीतरी अकल्पनिय त्यांनी बघितले होते.पाहता-पाहता ही बातमी स्थानिक जहागिरदारापर्यंत पोहचली. तत्कालीन शिवन्याच्या जहागीरदाराला *“सूर्य नारायण महाराज”* हे कुणी साधारण व्यक्ती नसून हिंदू धर्मातील एक प्रकांड पंडित असल्याचे जाणवले.त्यांनी शिवन्याला सेवकांचा येणारा ओढा आणि महाराजांची कीर्ती बघून त्यांना जहागीरीतील *246* एक्कर जमीन *गुरु पादुका संस्थान* च्या व्यवस्थापनासाठी *इनामी* म्हणून दान दिली. या जमिनीच्या वार्षिक मावेज्यावर महाराजांनी शिवना येथे *धर्म संस्कार वर्ग* सुरु केले. महाराष्ट्राच्या कान्या-कोपऱ्यातून येथे विद्यार्थी वेद शास्त्र पठणासाठी येऊ लागले.विद्यार्थ्याचा व सेवकांचा धर्म पिठाकडील ओढा बघता सूर्य नारायण महाराज यांनी प्रशस्त *वाडा* बांधण्याचे ठरविले.ते एकदा भ्रमंतीला असतांना सायंकाळी *पद्मावती* च्या जंगलाजवळ पोहचले.स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना या जंगलात पिशाच्च राहत असल्याचे सांगून रात्रीचा प्रवास टाळावा असे सांगितले. मात्र सूर्य नारायण महाराज यांनी वेद शस्त्रासह *तांत्रिक विद्येतही* प्राविण्य मि ळवले होते.त्यांनी आपल्या तंत्र विद्येने त्या पिशाच्च दहशतीपासून गावकऱ्यांची सुटका केली. त्यावर गावकऱ्यांनी त्यांना त्यांची इच्छा विचारली असता, त्यांनी याच पद्मावती जंगलातील जांभूळाची विस्तीर्ण मोठी झाडे तोडून शिवन्याला आणायचे सांगितले. गावकऱ्यांनी ती तोडून आणून दिली. याच जांभळाच्या लाकडापासून त्यांनी *1850* साली शिवण्यात *150 x 300*फुटाचा टोलेजंग वाडा बांधला. या वाड्यातच पुढील अनेक वर्ष हे गुरु पीठ अव्याहत सुरु राहिले. वाड्यातच विद्यार्थ्यासह सेवकांना व शिष्यांना राहण्याची व्यवस्था होती. त्यांचे हे धर्म कार्य व वेद शास्त्र संपन्नता बघून *शृंगेरी शारदा पिठाचे (दक्षिण पीठ कर्नाटक) शंकराचार्य* यांनी शिवना येथे येऊन सूर्य नारायण महाराज यांना *तापी नदीचा उत्तर काठ (भुसावळ) ते गोदावरी नदीचा दक्षिण काठ (कायगाव टोका)* यांच्या मधील क्षेत्राचे धार्मिक,जातीविषयक वाद,न्याय निवाडे, धार्मिक व्यवस्थापकीय वाद,धर्मांतरे या प्रकारचे निवाडे करण्यासाठी सनद देऊन गौरान्वित केले. तसेच शृंगेरी मठाचे *उपपीठ* म्हणून गुरु पादुका संस्थानला मान्यता दिली. त्यानंतर अनेक धर्मांतराची प्रकरणे, धार्मिक वाद, गादी वाद, मंदिराचे व्यवस्थापकीय वाद यांचे निवाडे शिवना गुरु पिठात व्हायला लागले.शिवन्याचे गुरुपीठ त्याकाळी *धर्म न्यायालय* झाले होते. या ठिकाणी सूर्य नारायण महाराज मोठ्या कौशल्याने हे वाद हाताळीत. असेच एकदा देश भ्रमंतीला असतांना ते मध्य प्रदेशातील इंदोरला पोहचले तेथे त्यांनी एका मंदिरात मुक्काम केला. एक वेद शास्त्राचा प्रकांड पंडित शहरात आल्याची वार्ता स्थानिक पंडितांकडे पोहचली. त्यांनी परीक्षा घेण्याच्या हेतूने सायंकाळच्या वेळेला ते महाराजांकडे आले.त्यावेळी सूर्य नारायण महाराज हे सूर्यास अर्ध्य देत होते, हे पाहून स्थानिक पंडित भडकले त्यांनी *“हा कसला वेद शास्त्र संपन्न पंडित आला,जो सूर्य मावळल्यावर अर्ध्य देतोय”* म्हणून त्यांची हेटाळणी केली.मात्र काही पंडितांनी बाहेर जाऊन पाहिले असता पश्चिमेकडे सूर्य अजून मावळलेला नव्हता. या प्रकाराने त्यांची महती शहरभर पसरली.अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले.त्यांनी तेथे *द्वैत व अद्वैत वादावर* भाष्य करून धर्म पंडितांची मने जिंकली. तत्कालीन संस्थानिकांनी त्यांची वेद संपन्नता बघून योग्य मान सन्मानासह त्यांची इंदोर शहरातून *हत्तीवरून मिरवणूक* काढली. सूर्य नारायण महाराज धोत्र्याच्या *सिद्धेश्वर महाराजांना* समकालीन होते. त्यांनीच धोत्र्याच्या या अवलीयास *सिद्ध पुरुष* संबोधून *“सिद्धेश्वर”* हे नाव दिले असे वर्णन *“श्री सिद्धेश्वर लीलामृत”* या पोथीमधील *5 व्या अध्यायात* येते.तर बालाजी महाराज देऊळगाव राजा यांच्या पोथीतही संस्थानचा उल्लेख आढळतो. अशा वेद शास्त्र संपन्न,प्रकांड पंडिताचे *ई.स.वी.सन 1870* साली शिवना येथे निधन झाले. त्यांच्या अकल्पित निधनाने शिवना पंचक्रोशी व भक्त परिवार दुख आवेगात बुडाला. त्यांच्या चितेवर *सती* जाऊन त्यांच्या पत्नी *गंगाबाई* यांनी सुख दुखात पतीसोबत राहण्याचे वचन पूर्ण केले. याच गंगाबाईचे *सतीआई मंदिर* (घुमटी) आज शिवना येथील तळ्याच्या परिसरात उभारले आहे.

आम्ही चालवू हा पुढे वारसा

सूर्य नारायण महाराजा नंतर ही, हा धर्म वारसा *वेदशास्त्र संपन्न त्रंबक शास्त्री महाराज, वेद शास्त्र संपन्न मंगलमुर्ती महाराज, वेदशास्त्र संपन्न विनायक महाराज, व आजमितीला वेदशास्त्र संपन्न चंद्रकांत झाल्टे महाराज, वेदशास्त्र संपन्न सुभाष झाल्टे महाराज* हे चालवीत आहे. शिवना नगरीचे नाव देशभर करण्यास सूर्य नारायण महाराज यांचा मोलाचा वाटा होता. ग्राम दैवत शिवाबाई देवीची उपासना करण्यात झाल्टे परिवाराच्या *7 पिढ्या* झिजल्या आहेत. तर परिवारातील इतर सदस्यांनी धार्मिक परंपरा जतन करीत सेवा दिली आहे. ब्राम्हण वाड्यात असलेल्या गुरु पादुका संस्थान ची धुरा पिढीजात वारशाने झाल्टे परिवार वाहत आला आहे. *18 व्या* शतकातील या गुरुपिठात मोठ्या प्रमाणात योग शास्त्र, व्याकरण, हस्तकौशल्य, न्यायशास्त्र आणि अध्यात्म या सारखे अभ्यासक्रम हाताळल्या जायचे. या बाबत मी झाल्टे परिवारातील गणेश झाल्टे यांना काही पुरावे आहेत का..? म्हणून विचारले… तर त्यांनी अडगळीत पडलेल्या काही भव्य मोठ्या जुन्या कोठाराकडे (पेट्या) बोट दाखवत.. यात सर्व पुरावेच आहेत म्हणून सांगितले. मी आपलं नेहमीच्या अनुभवाप्रमाणे ही बाब टाळण्याचा प्रयत्न केला. कारण मी कुठेही गेलो की सांगणारा खूप पुरावे आहेत म्हणून बोलतो अन प्रत्यक्षात एक-दोन संदर्भहीन कागदे आणून टेकवतो. हा माझा दांडगा अनुभव…! मी त्यांना यातील एक कोठार उघडण्याची विनंती केली असता त्यांनी मला “तुम्ही सवडीने या” म्हणून सांगितले. आम्ही रविवार चा दिवस निवडला, त्यांनी त्यास होकारही दिला. मधले 5-6 दिवस मला कोठारात काय असेल? हा प्रश्न स्वस्थ बसू देईना…..! मी पुन्हा रविवारी शिवना गाठले. गणेश झाल्टे यांनी खूप आत्मीयतेने स्वागत केले. व मी मूळ मुद्याला हात घालीत कोठार उघडण्याची विनंती केली. अडगळीत पडलेलं कोठार उघडल्यानंतर त्यातील दस्तऐवज बघून माझ्या सारखा भुरटा संशोधक मात्र चाट पडला. एक-एक गाठोडं बघून मला आनंदाचे भरते येत होते.

अडगळीत संग्रहालय

प्रत्येक गाठोड्यात 17 व्या व 18 व्या शतकातील दुर्मिळ ग्रंथ संपदा सापडत होती.

प्राकृत, संस्कृत, अरबी, फारसी, उर्दू, मोडी, मराठी अशा विविध भाषेतील शेकडोच्या घरातील हस्तलिखिते, वतनपत्रे, हस्तलिखित पोथ्या, बंधपत्रे, ईस्ट इंडिया कंपनीचे टपालपत्रे, निजाम पोस्ट खात्याचे टपालपत्रे,  सन्मानपत्रे, रुसूम, सचित्रित पोथ्या, मराठी व्याकरण लिखिते, स्मरणिका, बक्षीसपत्रे, वजीफे, रत्नावली, जलरंग, तैलरंग, पावडर शेडिंग ताम्रपत्रे, कापडी रेशमी सोहळे, विविध प्रकारच्या रंगछटांच्या माध्यमांतून व विविध विषयांवर निर्माण केलेल्या चित्रकृती (Miniature Painting), काच चित्रे (ग्लास पेंटिंग), विविध टपाल तिकिटे, रेखाचित्रे, पंच धातूची सुंदर चित्र रेखाटलेली प्रभावळ, चंदेरी पालखी दंड, पेशवेकालीन चित्रे हे प्रामुख्याने दिसून आले. तर पाचूचा गणपती, स्फटीकाचे श्रीयंत्र, नाणी, पेशवेकालीन शिल्प, हस्तलिखित नाटके, महाभारत, रामायण कथा, हस्तलिखिते, धार्मिक व्यवस्थापनाचे हिशोब, चोपड्या, तंत्र विद्या पत्रे अशा अनेको दुर्मिळ वस्तूंनी ही कोठारे भरली आहेत.

मात्र जतन व संवर्धनाअभावी ती अडगळीत पडली आहे. एक प्रशस्त संग्रहालय उभं राहील, एवढी ही विपुल ग्रंथ संपदा परिस्थितीच्या ओझ्याखाली दबून मातीमोल ठरत आहे. याच दुर्मिळ साहीत्यातील काही पत्रव्यवहार वाचून बघितला असता, अनेक विद्यार्थ्यांच्या वडिलांची मुलाची खुशाली विचारणारी पत्रे दिसून येतात. तर “मला सध्या कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसून अमुक नावाचा ग्रंथ टपालाने पाठवावा जेणे करून मी ही पूजा करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल” अशी आर्त विनवणी करणारे पत्र असो की धर्म सभेसाठी आपण निमंत्रित आहात अशी विनंती करणारे संस्थानिकांचे पत्र असो हा गुरु पादुका संस्थान चा गत वैभव दर्शविणारा महत्वाचा पुरावा आहे. तर काही जुन्या हस्तलिखीतात शिवण्याच्या ग्रामदैवत शिवाई देवीचा *“शिवाबाई”* म्हणून उल्लेख आढळतो.

सांस्कृतिक वारसा सांभाळणे हे परिस्थितीनुसार अवघड होऊन बसले आहे. परिसरातील शाळेच्या सहलीत आपण विद्यार्थ्यांना महानगरात नेऊन महागडी तिकिटे काढून संग्राहलय दाखवतो. मात्र आपल्याच गावातील पुराणवस्तू जपणारे संग्राहलय अडगळीत पडले आहे. आज पर्यंत कुणीही हा दुर्मिळ खजिना बघितला असेल असे मला वाटत नाही. ब्रिटिशांनी भारतातील मौल्यवान, भव्य, इतिहासाची साक्ष असणाऱ्या कोहिनूर हिरा, मयूर सिंहासन, उत्कृष्ट शिल्पे, जुनी हस्तलिखिते, बगलिघाट चित्रशैलीतील उत्कृष्ट कलाकृती आदी अनेक प्रकारच्या वस्तू इंग्लंडला नेल्या अन संग्राहलये थाटली. त्याच संग्राहलयातील आपल्याच वस्तू आपण शेकडो डॉलर देऊन बघतो. कारण आपण जतन आणि संवर्धनाचा वारसाच पुढे नेऊ शकलो नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.

पूर्वी हा ठेवा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्याची हस्तलिखित सल्लागार समिती होती. ही समिती या हस्तलिखितांच्या संशोधनाचे कार्य करायची. पण आता ही समिती कार्यरत नाही. मराठी भाषा, वाङमय, वाङमयाचे प्रकार, संस्कृतीचा इतिहास याच हस्तलिखितात दडलेला आहे. याच ठेव्यातून आपण परिसरातील शेकडो वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करू शकतो. हा ऐतिहासिक वारसा इतिहासकार, संशोधक, अभ्यासक, विश्लेषक, पत्रकार यांच्यापासून दुरापास्त राहणे हे खूप मोठे आश्चर्य आहे. भविष्यात कुणी ह्या संस्थानातील दुर्मिळ ठेव्याला साध घालेल हीच अपेक्षा…!

नाहीतर ती काळाच्या उदरात जाणारच….! यात शंका नाही.

 

इतिहासाचा वर्तमानाशी संघर्ष

शेकडो वर्ष न्यायदान करणारे संस्थान आज स्वत: न्यायदानासाठी व्यवस्थेचे उंबरठे झिजवत आहे.

आता शेवटी प्रश्न हाच उरतो की, एवढा वैभवशाली इतिहास असतांना झाल्टे (शास्त्री) परिवार याचे जतन व संवर्धन करण्यासाठी का प्रयत्न करीत नाही? याचे उत्तर खूपच निराशावादी व संवेदनशील मनाला साद घालणारे आहे. निजाम सरकारने गुरु पादुका संस्थान ला *246 एक्कर* जमीन इनामी म्हणून दिली होती. तर अनेक जहागिरदारांनीही सुर्यनारायण महाराज यांना अनेक एक्कर जमीन इनाम म्हणून दिली होती. कुटुंब लहान असल्याने ही जमीन त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी स्थानिकांना वार्षिक मावेज्यापोटी कसण्यासाठी दिली. याच मावेज्यावर संस्थानचा गाडा हाकल्या जायचा. मात्र सुरुवातीला व्यवस्थित मावेजा देऊन नंतर ही लोकं बेईमान झाली. त्यांनी हळूहळू मावेजा कमी करीत तो नगण्य केला. याबाबत विचारणा केल्यास वाद झडायचे. त्यामुळे संस्थानचे उत्पन्न आपोआप कमी झाले. लोकात धार्मिक प्रवृत्ती कमी झाल्याने येणारा भक्त वर्ग कमी झाला.त्यामुळे देणगी स्वरूपातील उत्पन्नही कमी झाले.

यातच संस्थानची जमीन कसणाऱ्या काही लोकांनी व्यवस्थेला लाचेची बळी चढवत सातबाऱ्यावर आपली नावे केली. ही आपली वडिलोपार्जित जमीन व्यवस्थेचा बळी ठरू नये म्हणून झाल्टे परिवार न्यायालयात गेला. आज *246* एक्कर जमिनीपैकी *150* एक्कराचा वाद वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहे. उरलेल्या *96* एकरातील *26 एक्कर* जमीन खडकाळ असल्याने कसणे शक्य नाही. उरलेली जमीन संस्थानला दरवर्षी दिड – दोन लाखाचे उत्पन्न देते या जमीवरही आजुबाजुच्या लोकांनी घुसखोरी करुण क्षेत्रफळ कमी केले आहे…..!

न्यायालयाच्या तारखेत झालटे परिवाराचे वर्षातील 250 दिवस असेच चकरा मारण्यात निघून जातात. वयोवृद्ध वेदशास्त्र संपन्न सुभाष महाराजांचा न्यायालयीन तारखेचा दिवस पुकाऱ्याच्या हाकेच्या वाट पाहण्यातच विना अन्नपाणी निघून जातो.
परिवाराच्या एकूण उत्पन्नापैकी 70 टक्के रक्कम न्यायालयीन प्रक्रियेतच खर्च होऊन जाते. अनेकांनी शेती आमचीच म्हणत इतर खोट्या गुन्ह्यात त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला, निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी त्यांना पत्नीचे कुळ दागिने विकावे लागले. कधी काळी शेकडो सेवकांचे शिक्षणासह पोट भरणारे संस्थानाचे व्यवस्थापकच आज घडीला जगण्याचा संघर्ष करीत आहे.त्यांची एक अख्खी पिढी न्यायालयाच्या उंबरठ्यावर संपत आलीय…. आपलीच संपत्ती आपली म्हणून सिध्द करण्यासाठी…. पडक्या वाड्यात राहून इतिहास जपला जातोय. मात्र हाच इतिहास राहणाऱ्यांना मातीत गाडून कधी नवा इतिहास लिहेल हे सांगता येत नाही. पडका वाडा बघून इतिहास हरवल्याची रुख-रुख गणेश यांना अस्वस्थ करते. या वैभवशाली वाड्याचे सदस्य आज बँकेत पिग्मी एजंट म्हणून, तर कुणी पौरोहित्य करून आपला उदार्निवाह चालवतो. शेकडो वर्ष न्यायदान करणारे संस्थान आज स्वत: न्यायदानासाठी व्यवस्थेचे उंबरठे झिजवत आहे.

आजही या गुरु पादुका संस्थानास देऊळगाव राजा येथील बालाजी संस्थानमध्ये मुख्य उत्सवात मान असतो, अशाच प्रकारचा मान शेगाव, अन्वा, धोत्रा, उंडणगाव येथील संस्थानातही त्यांना पिढीजात मिळत आलेला आहे. आन्वाच्या आजुबाई संस्थानाला याच संस्थान ने *18* एक्कर जमीन दान दिली आहे. तर शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मधील उत्पन्नाचा भाग त्याच मंदिराला परत केला आहे. ठराविक लोकांव्यतिरिक्त या संस्थानला आज कुणीही भेट देत नाही. अधुन-मधून एखादा विदेशी पर्यटक भेट देऊन जातो. मात्र स्थानिक यापासून अनभिज्ञ आहेत.

या संस्थानापासून स्थानिकांचा दुरावा हा चिंतेचा विषय आहे. फक्त ब्राम्हण द्वेष म्हणून हा वैभवशाली इतिहास वाळीत टाकता येणार नाही. नाहीतर येणाऱ्या पिढ्या आम्ही काहीच जतन केले नाही म्हणून आपल्याला दोष देतील. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र पुरातत्व विभाग या पैकी कुणीतरी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण या दुर्मिळ ठेव्याचे मालक न होता संरक्षणकर्ते किंवा विश्वस्त व्हायला पाहिजे, तरच तीनशे वर्षांहून जुनी ही हस्तलिखिते जशी आपल्यापर्यंत पोहोचली तशी ती पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचतील. यासाठी हरवलेल्या इतिहासाशी स्थानिकांची नाळ जुळणे हे तेव्हडेच महत्वाचे ….!

समृद्धीचा साक्षीदार भग्न वाडा

दसऱ्याच्या दिवशी शिवन्यातील ब्राह्मण वाडा (गुरू पादुका संस्थान) पाहण्याचा योग आला. मित्राकडून ऐकलेल्या, गुरु पादुका संस्थान बघण्याचा माझा आग्रह त्या दिवशी पूर्ण झाला. या वाड्यातच हे गुरु पादुका संस्थान आहे. एका छोट्याशा बोळातून गेल्यानंतर डाव्या बाजूला वाड्याचे विटामध्ये रेखीव काम केलेला गतवैभव दर्शविणारे भव्य प्रवेशद्वार दृष्टीक्षेपात पडते .प्रवेश द्वारावारील नगारखाना लक्ष वेधून घेतो. येणाऱ्या- जाणाऱ्याला बाहेरूनच त्याच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीची कल्पना येते. दरवाज्या च्या बाजूला असणाऱ्या वाड्याच्या संरक्षक भिंती कधीच्याच काळाआड गेल्या आहेत. वाडा तसा एखाद एकरात पसरलेला जाणवतो. तर मुख्य वाडा हा *150 x 300* फुटाचा आहे.

वाड्याला दोन मुख्य प्रवेश द्वार असल्याचे दिसते. मुख्य वाड्याला एक मजबूत लाकडी द्वार आहे. या द्वारासमोरच वाड्याच्या इतिहासाची साक्ष देणारा भला मोठा पिंपळ वृक्ष आहे. दारास लोखंडी कड्या व भवरे आहेत. वाड्यात प्रवेश केल्यावर वाड्याची भव्यता लक्षात येते. वर्षानुवर्षं पावसाच्या माऱ्यामुळे लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी नाहीश्या झाल्या आहेत. लाकडी छत मोडून पडलंय. छताची काही लाकड कशी बशी तग धरून आहेत. दुसऱ्या माळ्यावरील नक्षीदार लाकडी कमानी अस्तित्वाचा लढा देत आहे. तर छताची गळकी पत्रे वेळोवेळी प्रकाशाची तिरीप सोडून जातात. वाड्याचं एक वैभव म्हणजे त्यातला मोठा दगडी चौक, आता मात्र तो भरती टाकून बुजण्यात आला आहे.

डाव्या बाजूला *सदगुरू बाळकृष्ण महाराज* यांचे लाकडी कलाकुसर असलेले मंदिर आहे. मंदिरात अनेक पुरातन देवी-देवतांचे तैलचित्र दिसून येतात. यातील काही पेशवेकालीन असल्याचे जाणवते. वाड्यामध्ये जुन्या धाटणीचे भरपूर पाणी असणारे *४आड* आहेत. वाड्याच्या उजव्या भागातील भव्य *मुदपाक खाना* लक्ष वेधून घेतो. येथेच तेलाचे राजण, अंघोळीसाठी थंड पाणी व गरम पाण्याचे हौद, कोठीघर, दिवाण खाना, धान्य कोठार असा वाड्याचा मोठा जामानिमा दिसतो. यावरून वाड्याची भव्यता लक्षात येते. वाड्याचे अवशेष हेच आज वाड्याची भव्यता व वैभव सांगतात. पूर्वी येथे धर्मपीठ असल्याने बाहेरून वेद शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी, व सेवक यायचे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था येथेच व्हायची. *जेष्ठ वद्य पंचमी ते जेष्ठ वद्य नवमी* ला येथे उत्सव साजरा होतो पूर्वी गाव पंगत असायची. आता पण थोडया प्रमाणात का होईना पाच दिवसात हजार बाराशे लोकांचे अन्नदान होतेच. *संस्कृत* मध्ये आरत्या रचणारे व करणारे हे एकमेव धर्मपीठ आहे. उत्सवात हिंदू व मुस्लीम धर्मातील प्रत्येक जातीला मान दिल्या जायचा. यात मुस्लीम समाजाला वाद्य वाजवण्याचा मान दिला जायचा. या उत्सवाला आजही खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भक्त येतात. उत्सवाची परंपरा आजही कायम आहे, मात्र धार्मिक उदासीनतेमुळे लोकसहभाग नसण्यातच जमा आहे.

वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना….!

शेवटी प्रमोद देर्देकर यांच्या शब्दात…….!

 

Get In Touch

Meet Us

Brahman Galli, Shivna,
Ta. Sillod, Dist. Aurangabad
Maharashtra, India. 431132

Call Us

+91 9657151550

Email Us

zalteganesh19@yahoo.com

1 thought on “समृद्ध इतिहासाचे अडगळीत संग्रहालय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top