सुनील उर्फ पिंट्या…
यंदाही दिवाळीत तुझी आठवण आली, मित्रा!
काही मित्रांच्या आठवणी लिहिताना आपण पुन्हा त्यांच्या सोबतचं आयुष्य जगून येतो…
दिवाळी आली की गावची आठवण येते. गाव आठवलं की तिथल्या गल्ल्या, शाळा आणि त्या दिवसांतली आपली माणसं आठवतात.
काही मित्रांना फोन करता येतो. काहींना गावी गेल्यावर भेटता येतं. पण काही नावांपाशी मन थांबतं… आज तुझ्या नावापाशी थांबलंय, सुनील.
सुनील नाईक. आमचा पिंट्या. माझा लहानपणापासूनचा मित्र आणि वर्गमित्र.
“आठवणींचा कप्पा” सुरू करायचा ठरवलं, तेव्हा पहिल्यांदा तुझ्याबद्दलच लिहावंसं वाटलं. पण लिहायला बसलो आणि जाणवलं— तुझ्याबद्दल प्रत्येक वाक्य आता भूतकाळात लिहावं लागतं. ते अजूनही जड जातं.
दोन गल्ल्यांपलीकडचा माझा मित्र
आमचं गाव उंडणगाव. आमच्या घरापासून दोन गल्ल्या सोडल्या की त्याचं घर. अगदी लहानपणापासूनची आमची ओळख. पुढे शाळेत वर्गमित्र झालो आणि मैत्री वाढत गेली.
तेव्हा आपण आठवणी जमवत आहोत, असं कुठे वाटत होतं? शाळा, अभ्यास, बोलणं आणि मस्करी— ते आपलं रोजचं आयुष्य होतं.
आज त्या दिवसांकडे पुन्हा जावंसं वाटतं. काही वेळ सुनीलसोबत बसावं, त्याचं बोलणं ऐकावं असं वाटतं. पण तिथे आता आठवणींच्याच वाटेने जाता येतं.
हुशार, मेहनती आणि थोडा मिश्कील
अभ्यासात सुनील नेहमी हुशार. पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकात त्याचं नाव असायचंच. त्याची मेहनत आणि अभ्यासातलं सातत्य आजही लक्षात आहे.
स्वभावाने सरळ, मनमिळाऊ आणि बोलका. त्याच्यातला मस्करी करणारा मित्रही तितकाच आठवतो. त्याच्याशी बोलताना सहजपणा असायचा. आपल्याला वेगळं काही बनून बोलावं लागत नसे.
साहित्य आणि शास्त्रीय संगीताचीही त्याला आवड होती. त्याचे शब्द, त्याची मस्करी, त्याच्याशी जोडलेल्या कवितांच्या आठवणी… आज एकामागून एक मनात येत आहेत.
तेव्हा सहज ऐकलेले त्याचे शब्द आज पुन्हा ऐकायला मिळावेत, असं मनापासून वाटतं.
वाटा वेगळ्या झाल्या; संपर्क कायम राहिला
शाळा संपल्यानंतर मी गाव सोडून औरंगाबादला, आजच्या छत्रपती संभाजीनगरला आलो. सुनील गावाकडे राहिला. काही वर्षं त्याने खामगावला बहिणीकडे राहून शिक्षणही घेतलं.
आम्ही दूर राहिलो, तरी चांगले संपर्कात होतो. गावी सणासमारंभाला गेलो की भेट व्हायचीच. रोजच्या जबाबदाऱ्यांत वेळ जात होता, पण भेट झाल्यावर बोलण्यात दुरावा वाटत नव्हता.
जुन्या मित्राला आपली नव्याने ओळख करून द्यावी लागत नाही. आपण कुठून आलो, कसे वाढलो, हे त्याला आधीपासून माहीत असतं. सुनीलशी जोडलेली मैत्री अशीच होती.
ती रात्र… आणि तो अनोळखी फोन
रात्री साधारण ११ वाजताजेवण आटोपून मी झोपलो होतो. अचानक मोबाईल वाजला. इतक्या रात्री कोणाचा फोन असेल, असा विचार करत उचलला. नंबर अनोळखी होता.
-
फेसबुकवरून मिळवलेला माझा नंबर
फोन करणाऱ्यांनी फेसबुकवरून माझा नंबर मिळवला होता. ते सुनीलच्या नात्यातले, ओळखीचे लोक होते. त्यांनी विचारलं— “तुम्ही उंडणगावचे ना? तुम्ही सुनीलचे मित्र आहात ना?”
-
मनात सुरू झालेली धाकधूक
त्या प्रश्नांनीच काहीतरी विचित्र घडल्याची चुणूक लागली. मी म्हटलं, “हो… का?”
-
ती बातमी…
त्यांनी सांगितलं की त्यांना पक्की खात्री नाही, पण सुनील हैदराबादमध्ये वारल्याचं कळलं आहे. खात्री करून घेण्यासाठी त्यांनी मला फोन केला होता. मी दोन क्षण काहीच बोलू शकलो नाही. डोकं सुन्न झालं.
-
गावी केलेले फोन
लगेच त्याच्या भावाला फोन केला. त्याने उचलला नाही. मग गावातल्या इतर मित्रांशी संपर्क केला. कुठेतरी गैरसमज झाला असेल, बातमी खोटी ठरेल, अशीच आशा मनात होती.
-
मित्रांकडून झालेली खात्री
पण दुर्दैवाने बातमी खरी निघाली. सुनीलच्या अकाली जाण्याची खात्री झाली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.
त्याच्या जाण्याची बातमी ऐकत होतो.
एका क्षणात संपूर्ण बालपण समोर आलं
आमच्या लहानपणापासूनच्या आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या. शाळेतला सुनील, गावी झालेल्या भेटी, गप्पा आणि मस्करी… त्याचे शब्द कानात घुमत राहिले.
एखादी जुनी आठवण निघाली की ती त्यालाही सांगावीशी वाटते. त्याला काय आठवतंय ते ऐकावंसं वाटतं. पण आता त्या आठवणीचा दुसरा साक्षीदार बोलायला उरलेला नाही, हे मनाला समजावणं कठीण होतं.
त्या रात्री कितीही आठवलं, तरी शेवटी मन त्याच गोष्टीपाशी येऊन थांबत होतं— आता त्याला पुन्हा भेटता येणार नाही.
नेहमी बोलका असलेला सुनील… अबोल होता
दुसऱ्या दिवशी त्याला पाहिलं.
मनमिळाऊ, बोलका सुनील काहीच बोलत नव्हता. नेहमी चंचल दिसणारा आमचा मित्र शांत निजला होता. चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते.
माझ्या आठवणीतला सुनील सतत बोलत होता…
समोरचा सुनील मात्र अबोल होता.
त्याच्या वडिलांचे आणि भावाचे चेहरे पाहिले. त्या क्षणाबद्दल आजही फार लिहिता येत नाही. काय बोलावं, कसं बोलावं, हे तेव्हाही कळत नव्हतं. आजही शब्द सापडत नाहीत.
त्या दिवसाची आठवण आली की लिहिताना हात थांबतो. थोडा वेळ काहीच सुचत नाही.
तुझं घर तिथेच आहे… तुझी भेट मात्र आठवणीत होते
दिवाळी आली की गावाकडे जावंसं वाटतं. जुनी माणसं भेटतील, गप्पा होतील असं वाटतं. पण त्या भेटींचा विचार करताना तुझी उणीवही सोबत येते.
गावी तुझं घर आजही त्याच दोन गल्ल्यांपलीकडे आहे. आपल्या लहानपणाच्या जागाही तिथेच आहेत. पण तुझी भेट आता आठवणींतच होते.
काही माणसांना आपण रोज भेटत नाही. तरी ती आहेत, पुन्हा भेटतील, याची एक खात्री मनात असते. तुझ्या जाण्याने ती खात्री हरवली, मित्रा.
दोन वर्षं झाली. रोजच्या कामांत आयुष्य पुढे चाललंय. तरी एखादी आठवण आली की मन पुन्हा त्या जुन्या दिवसांत जाऊन बसतं. तिथे तू अजूनही आमचा वर्गमित्र आहेस— हुशार, मेहनती, सरळ आणि मस्करी करणारा पिंट्या.
म्हणूनच या कप्प्यातली पहिली जागा तुला दिली
“आठवणींचा कप्पा” सुरू करताना पहिल्यांदा तुझ्याबद्दल लिहिलं. कारण माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी आधीपासूनच एक जागा आहे. आज ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केलाय.
खूप काही राहिलंय अजून सांगायचं. तुझ्या आठवणी, तुझं बोलणं, आपल्यातल्या गप्पा… पण आज एवढं लिहितानाही मन भरून आलंय. जड अंतःकरणाने इथपर्यंतच लिहू शकलो.
तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला मिळावा. तुझी मैत्री माझ्या आयुष्यात आली, याचं समाधान कायम राहील. आणि तू इतक्या लवकर गेलास, याची हुरहूरही.
प्रिय सुनील उर्फ पिंट्या,
आज हा लेख लिहिताना तुझ्याशीच बोलतोय असं वाटतंय. मध्येच तुझी मस्करी आठवते, हसू येतं… आणि पुढच्याच क्षणी डोळे भरून येतात.
तुझ्याबद्दल खूप बोलू शकतो मी. पण काही आठवणींपाशी शब्द थांबतात. आज तसंच झालंय.
या दिवाळीत माझ्या आठवणींचा हा कप्पा तुझ्यासाठी उघडला. तुला ओळखणाऱ्यांना पुन्हा तुझी आठवण यावी, आणि न ओळखणाऱ्यांना माझा मित्र कसा होता हे थोडंसं कळावं, एवढंच वाटलं.
मित्रा, जिथे असशील तिथे…
दिवाळीच्या शुभेच्छा!
तुझी आठवण येतेय.
निलेश झाल्टे