Time Less : Missing Moments

टाईमलेस!


पालथ्या तळव्याला थोडसं चाटून “टॅम्प्लीज” केलंय का कधी? 🤛🏻 लपाछुपीत “धप्पाsss” म्हणून बोंबलायला मिळालंय का? 😹 “नॉटॅठोम” म्हणताना उकळ्या फुटलेल्या आठवतात का? “कटाsssप” म्हणून एखाद्याला डावातून हाकललंय का कधी? गटारीत गेलेला बॉल बाऱ्या लावून काढलाय का कधी? 🎾

हे सगळं वाचताना जर दिल गार्डन गार्डन होत असेल, तर बिंगो! 💐 तुमचं बालपण कमाssल भारी होतं! परवा घरी अशीच एक मैफल रंगली आणि नुसत्या जुन्या आठवणींनीच्या रानात फेरफटका मारून यायला झालं. 😇

आपल्या लहानपणीचे खेळ म्हणजे कसे लाइव्ह असायचे ना! उन्हाळी सुट्टी म्हटलं की तर आमचा नुसता धांगडधिंगा असायचा. 🪄नुसता ‘बझ’ असायचा सगळ्या वातावरणात..! भूक, तहान, झोप आणि घरदार विसरून दिवसभर नुसता खेळ, खेळ आणि खेळच मांडलेला असायचा.

रम्य त्या बालपणी, म्हणजे जेव्हा ‘खेळा’ चा ‘स्पोर्ट्स’ झाला नव्हता तेव्हा आम्ही “डब्बा एक्सप्रेस” (ॲक्चुअली ऐसपैस) हा अतरंगी खेळ खेळायचो. रस्त्यावर खडूने एक गोल आखून, त्या गोलात उभं राहुन जितक्या लांब फेकता येईल तितक्या लांब तो डब्बा फेकायचा. ज्यावर राज्य आहे त्याने पळत जाऊन तो डब्बा आणून पुन्हा गोलात ठेवायचा. तो आणेपर्यंत बाकीचे गडी लपायचे. मग एकेकाला हुडकून (होय.. शोधायचो नाही.. हुडकायचो… :)) त्याच्या नावाने डब्यावर पाय ठेवून “अमक्याचा डबा-ऐसपैस” असं ओरडायचं. या लपंडावात धप्पा देणे म्हणजे गोलातला डब्बा लाथ मारून उडवणे. जाम राडा घालायचो यार गल्लीत! 💃🏻

ऑल टाईम टॉप “लपंडाव” खेळताना लपणारे देखील हुशार! एकमेकांचे शर्ट आणि टी-शर्ट बदलून लपायचे. बिचाऱ्या गड्यानं चुकीचं नाव घेतलं की मग अंडं. नाहीतर सगळे मिळून त्याला धप्पा द्यायला टपलेलेच असायचे. फार वेळ एखादं बेनं सापडलं नाही तर शेवटी शेवटी त्याला शोधायचा डाव घरातल्या लोकांवर यायचा! 🙆🏻‍♀️

आणि एक रेट्रो फन म्हणजे “आबाधबी उर्फ धपाधपी”! लै म्हन्जे..लै भारी गेम… त्यात आम्ही प्लस्टिक चा बॉल वापरायचो…जी पाठ शेकुन निघायची..:) चिक्कीबॉल आणि आबाधबी हे तर लईच डोंगर व्हर्जन होतं. चिक्कीच्या वाळक्या शेंगा गोळा करायच्या आणि त्याची चेचुन चेचुन तेल लावून पेस्ट बनवायची. त्या पेस्टचा टणक गोळा बनवायचा. मग त्याच्यावर चिंध्या गुंडाळायच्या आणि वर एक चांगले कापड गुंडाळून वाकळेच्या जाड दोर्‍याने शिवायचो. त्याने धबाधबी खेळायची. खतरोंके खिलाडीच आम्ही जणू! पण धबाधबी खेळण्यापेक्षाही चिक्कीबॉल बनवणे माझे आवडते काम आणि माझी स्पेशालिटी! 🎾

आणि “आडमिट किडा” आठवतोय का? राज्य असलेला (तेच ते आजकालचं ‘डेन’ असलेला) गडी एखादं मुक्काम पोस्ट सांगायचा. ते ठिकाण लोखंडाच्या वस्तूंना शिवत शिवत गाठायचं. ⛳प्रकरणात जर एखादा पाण्याचा पाइप वगैरे हाताशी आला की मग निवांत. त्यात मुद्दाम आम्ही खिशात खिळे वैगेरे लपवुन ठेवायचो..आणि वस्तु नसली कि मुद्दाम रस्त्यात फेकायचो. लोखंडच शिवलंय याचं प्रूफ दाखवायला मी तर खिशात मॅग्नेट (लवचुंबक ?🧲🤣) सुद्धा बाळगायचे.

मग त्याचाच सावत्र भाऊ “टीपी टीपी टॉप टॉप”, व्हॉट कलर यू वाँट”? यायचा. काहीतरी भारी रंग सांगायचा शिवायला, सोनेरी, चंदेरी वगैरे. हा खेळ ठरला कि पोरं घरी जाऊन मल्टीकलर्ड कपडे घालून यायची म्हणजे जास्त लांब पळायला नको. 🪂

क्रिकेट खेळायला तर १० बाय १२ ची बोळ वजा जागा पण पुरायची. 🏏 धुणं धुवायचं धुपाटणं घेऊन, सतराशे साठ नियम करून खेळायचो. एक टप्पा आऊट, कंपाऊंड बाहेर मारला कि आऊट, काचेला / गाडीला कसापण लागला कि आऊट, व्हरांड्यात २डी, भिंतीला बाऊंड्री आणि डायरेक्ट कंपौंडला सिक्सर! लई झांगडगुत्ता असायचा लेको! 🤯

आणखी एक लो बजेट खेळ असायचा – “दही भात द्या, पुढंsss जावा..!” घरातल्याच ४ कोपर्‍यात उभे राहयचे नी ज्याच्यावर डाव असेल त्याने हाताचा पसा करत मागायला यायचे. यावर कोपर्‍यातल्याने “त्या घरी जा” म्हणून लांब पाठवायचे नी मग २ कोपर्‍यातल्यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात जागा बदलायची… बदलताना पकडले तर आऊट! कायच्या काय खेळ, पण मजा यायची. 😻

ऑलंपिक लेव्हलचं नेमबाजीचं स्कील लागणारा आणि एक खेळ होता! तुम्हाला “वश्टर” 🪃 आठवतोय का? आधी कचायचे. मातीत एक रिंगण आखायचे रिंगणापासून पाच-सहा फुटांवर एक खच्च्या (रेघ) काढायची. प्रत्येकाने ठरलेली रक्कम किंवा एक / दोन अशा ठरलेल्या कोया / काचा डावावर लावायच्या.आणि एकेकाने त्या खच्च्यावरून ते त्या रिंगणात टाकायचे. एकही कोय् /नाणं / काच रिंगणाच्या बाहेर गेले की आऊट! आपण खच्च्यावरून ठराविक नेम धरून एकाच प्रयत्नात तिला रिंगणाबाहेर काढायचे. ती रिंगणाबाहेर निघाली तर सगळ्या कोया / पैसे / काचा आपल्या. फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करायला कुठल्या कुठल्या उकिरड्यांजवळ फिरायचो. आता आठवलं तरी अंगावर काटा येतो. ईईईई….. तेव्हा सगळं कमाल वाटायचं.

आणि एक जबराट प्रकरण होतं टायर्स फिरवणे 🚲. जुने टायर्स घेऊन ते पळवत त्याची शर्यत लावायची! खूप धमाल यायची टायर्स पळवायला! ते टायर घेऊन मनमुरादपणे रस्त्याच्या, गटारीच्या कडेला, मोकळ्या मैदानात, गल्ली-बोळातून टायरवर काठीच्या टकटकाटात गोंधळ घालायचो. कधी चुकुन गटारीत वगैरे गेले तर हापशा बोरिंगवर निरमा लावून धुवायचो. त्याचे इतके वेड लागलेले असायचे त्याचे कि, घरातल्यांनी दुकानातुन सामान आणायला सांगीतल्यावरही टायर फिरवत फिरवत दुकानला जायचो! 🏂

जिबली / ठिक्कर पाणी – फरशीचा / खापराचा तुकडा घेउन त्याला थुंकी लावुन या रकान्यात फेकायचा आणि एका बाजुने लंगडी खेळत जाउन तो पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायचा…रेषेवर पडला तर आउट! 🤸🏻

बाकी लगोरी, लंगडी, कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, पकडा-पकडी, सोनसाखळी, सुरपाटी, खाम्ब खाम्ब खाम्बोळी, शिवाजी म्हणतो, विषामृत, लंडन लंडन स्टॉप, दगड का माती, दोरीवरच्या उड्या.. 🤼‍♂️कितीतरी खेळ. आणि रुमालपाणी राहिलंच की!

यापैकी कुठल्याही खेळाला अमूक एक जागा किंवा तमूक एक सेट अप अशा कुठल्याच नख-यांची गरज नव्हती.

बैठ्या खेळांची तर बातच अलग! काचा कवड्या – हे ‘लूडो’चं देसी व्हर्जन! पाटाच्या उलट्या बाजुने खडुने किंवा कोळ्श्याने आखुन चिंचोक्याचे दोन भाग करुन खेळायचो.. 🎲

पत्ते.. पत्त्यांमधले बरेच खेळ – झब्बु, बदाम सात, पेनल्टी, लॅडिज.. वक्कखई.. ते लाडू कळ्या.. अजुन कित्ती तरी… चॅलेंज! चॅलेंज – उचलेंज खेळताना तर काय वाट्टेल ती चोरगिरी करायचे दादा-ताई लोक. 😎

नाव-गाव-फळ-फूल या यादीत आम्ही हळु हळु प्राणी, पक्षी, वस्तु, रंग, मेनू, नाटक / सिनेमा असं वाट्टेल ते जोडलं होतं. वह्याच्या वह्या भरल्या होत्या. आणि अजूनही भरतात बरं का! 📘🖊️

नवा व्यापाराची सुरुवात तर त्याच्या पातळ नोटांना नुकत्याच संपलेल्या शाळेच्या वह्यांचे पुठ्ठे चिकटवून व्हायची. ⚖️मुंबई बघून माहित नव्हती तेंव्हा, पण सगळ्या भागांची नावे मात्र तोंडपाठ! दररोज एकेकाच्या घरी दुपारचे जेवण आटोपुन बसायचो ते थेट संध्याकाळ पर्यंत. खूप मजा यायची. त्यातील चिराबाजार, गेट वे ऑफ इंडिया, वाळकेश्वर, चौपाटी… अहाहा! बहार!

राजा – राणी – चोर – शिपाई, फुली – गोळा, बिट्ट्या (ते वर टाकून काही काही म्हणून झेलायचा खेळ), पेनच्या रिकाम्या रिफीलनी साबणाच्या पाण्याचे फुगे, हिंगाच्या डब्याच्या झाकणांचे तराजु, नारळाच्या करंटीचे सुतळी ओवून केलेले फोन? क्रिएटिव्हिटीची कमाल! 🥇

घर घर …. ह्या खेळाशिवाय लहानपण पुर्ण होउच शकत नाही.. घर बनवण्यासाठी चटइ, साडी, छत्र्यांचा वापर .. शेंगदाणा उघडुन त्यात गुळ घालून चिकटवलेले लाडू! ⛱️⛺

आणि “डॉक्टर-डॉक्टर” 🧑🏻‍⚕️! म्हन्जे क्वॉय..! या लिजन्डरी खेळाबद्दल काय सांगू! भा. पो. करून घ्या!!😜

दिवेलागणी झाली की जिन्यामधे बसून भुताच्या गोष्टी 🧞‍♀️🧟‍♂️🧟‍♀️आणि एकेक ऐकीव किस्से! रात्री लाईट गेल्यावर अंताक्षरी!🎼 नॉस्टॅल्जिया!

तेव्हाचे खेळच असे असायचे की व्यायामाची गरज नव्हती पडत. “अयंऽऽ आपडे (प्रिया – याप्रि – आपडी… नावाच्या अपभ्रंषाचा अडनिडा प्रवास!), तुला मम्मीनं बोलवलंय”,🗣️ जोपर्यंत असा निरोप येत नसे, तोवर आमचं गावभर हुंदडनं चालूच असायचं.

आंब्याच्या वाळवलेल्या कोया, चिंचोके, गोट्या, बिट्टया, कवड्या, काडेपेटीची चपटी करून साठवलेली पाकिटं, सॉफ्टड्रिन्कच्या बाटलीची चपटी केलेली झाकणं, रंगीबेरंगी बांगड्यांच्या काचा हाच लहानपणीच्या बँकबॅलन्स 💰 असायचा.

ते ‘टॅम्प्लीज’ time please असतंय, ‘कटाप’ म्हणजे cut off असतंय, तर ‘नॉटॅठोम’ म्हणजे Not at Home असतंय, हे फार उशीराने समजलं.. समजेपर्यंत या क्रांतीतले सगळे भिडू कुठे तरी हरवून गेले. असलं बरंच काय काय आठवायला लागलं की स्क्रीन धूसर का होतो कळत नाही. 😭

हे खेळ बनवण्यार्‍यांना आणि खिलाडूपणा शिकवण्यार्‍या सलाम! आणि ह्या सर्व खेळांनी बहरलेल्या लहानपणाला सलाम! 🙏🏻

आजकालची पोट्टी, त्या बकवास व्हीडीओ गेमची बटने दाबत… नुसती घरी बसलेली दिसली कि डोक्याचा जयकांत शिक्रे 😡 होतो! आपणही आपल्या मुलांसाठी उरफोड करतोच ना? पण मग कुठे तरी सगळं ‘आउटफोकस’ का बरं होतंय?

आजही मुलं हे खेळ खेळू शकतात. पण कदाचित आपणच त्यांना त्या खेळांपर्यंत न्यायला कमी पडतोय कि काय.. रिऍलिटी चेक व्हायलाच हवा! सुदैवानं खूप उशीर झालेला नाहीये. आताच हालचाल केलीतर ‘आम्ही बि घडलो तुम्ही बी घडाना’ म्हणता येईलच! 👍

यातूनच आपले बालपण समृद्ध झाले होते. मग आता हा टाईमलेस 🔮 वारसा पुढच्या पिढीकडं पोहोचवायलाच हवा, नाही का? नुसतीच भौतिक सुखं पुरवण्यापेक्षा, हा सोनेरी ठेवा हस्तांतरित करूया! अल्ला मंतर… कोल्ला मंतर…म्हणत बिनपैशांचा तो आनंद घेऊया आणि देऊया सुद्धा! तीच खरी श्रीमंती! 💫

3 thoughts on “Time Less : Missing Moments”

  1. Atul Kulkarni

    मस्त..!! सूर पारंब्या,माझ्या मामाचं पत्र हरवलं ,उडाण टप्पू ,पाच तीन दोन,असे अनेक खेळ खेळण्याची मजा काही औरच होती…!!!👍👍👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top