बैल पोळा.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
🔸🔸
———————————————
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
———————————————
श्रावण वद्य अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. त्या विषयाचा उल्लेख असा,
‘शिवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला तेव्हा, तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचिलीत झाले. प्रस्तुत माहात्म्य कथेतही सप्तर्षीनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी-मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले आहे.
इतर काही माहात्म्यकथांत असे ही सांगितले आहे की, गुरूद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला. परंतु पुढे ‘शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल`अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून चंद्राच्या विनंती वरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुरंगरूपात स्वीकार केला.
ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकरीयांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो.
वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतांगायत चालू आहे. गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. आश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणार्या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत. सोडण्यापूर्वी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात ‘तू वासरांचा पिताअशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे.
अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत.
पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघगर्जनेसारखी असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे, असे मत्स्य पुराणात सांगितले आहे.
दहा गायींच्या कळपात किमान चार बैल असावे, असे सांगितले गेले आहे. बैल विकत घेताना प्रथम त्याचे वय विचारात घ्यावे. दात आणि शिंगे यांच्यावरून बैलाच्या वयाचा अदमास घेता येते. बैल चांगला की वाईट ते ठरवण्याची अनेक लक्षणे आहेत. काळा बैल उत्तम, काळया-तांबडया संमिश्र रंगाचा माध्यम व केवळ शुभ्र वर्णाचा त्याज्य समजावे. ज्याचा पार्श्वभाग रोडावलेला आहे. ज्याचा कान व शेपूट तुटलेली आहे असा बैलही अग्राह्यच. ज्याचे खुर बैगणी तो बैल मजबूत व ज्याच्या खांद्यांचा वर्ण निळा, तो बैल मर्द समजावा.
शेपटीचा गोंडा काळा व ज्याच्या कानावर केस असतील तो बैल भाग्यवान असतो. लांब शिंगांच्या बैलाविषयी एका लोकगीतात म्हटले आहे, ते असे,
बडसींगा जनी लीजौ मोल । कुएँमे डारो रूपिया मोल ।
असा हा बैल महिमा आहे. बैलपोळयाच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्ये वाजवून गावभर बैल मिरविले जातात. शेतकरी विविध क्रीडागीते, लोकनृत्ये सादर करतात.
आपला भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळे पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्याला शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात. श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बैलाला न्हाऊ माखू घालून सजवतात व त्याची पूजा करतात. त्याच्या साठी मुद्दाम गोडाचे जेवण तयार करतात व वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढतात.
आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण केला जातो.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄