महाशिवरात्री उत्सव उपवास की उपासना?
महाशिवरात्री उत्सवानिमित्त उपवासाचे पदार्थ काय काय करायचे? यासंबंधी बर्याच घरांमध्ये चर्चा सुरू आहेत. सकाळी, दुपारी, रात्री विविध चमचमीत उपवासाचे पदार्थ तयार करण्यातच आपला वेळ जातो.
पण आता ह्या दिवशी काय उपासना करायची? ह्याची चर्चा कोणत्या घरात होते का? बहुतेक ह्याचे उत्तर नाही असेच असेल. एकवेळ उपवास नाही केला तरी चालेल, उपासना केली पाहिजे. विशिष्ट झाडाच्या चिकापासून तयार केलेला साबुदाणा उपासाला कसा काय चालतो? खरे पाहता उपवासाच्या दिवशी साबुदाणा अजिबात खाऊ नये. ह्यापेक्षा ताजी फळले खावीत , फळांचे रस म्हणजेच ज्यूस 😜, आणि भरपूर दूध प्यावे. पोट हलके ठेवावे आणि उपवासाचे पदार्थ तयार करण्यात आणि खाण्यात वेळ घालवण्यापेक्षा उपासनेकडे अधिक वेळ द्यावा अशी माझी सर्वांनाच कळकळीची विनंती आहे.
आता उपासना कोणती करावी? ज्यांना शक्य असेल त्यांनी ११ वेळा रुद्र म्हणावे, नाहीतर ११ वेळा शिवहिम्न स्तोत्र म्हणावे किंवा ११ वेळा शिवतांडव स्तोत्र म्हणावे. तेही शक्य नसेल तर ११ माळा ॐ नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास मृत्युंजय मंत्रांच्या ११ माळा कराव्यात. महाशिवरात्र ह्या तिथीस उपास करून देवळात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले की आपली जबाबदारी संपली असे होत नाही. आपल्याकडून त्या दिवशी उपासना घडणे आवश्यक आहे. ह्या दिवशी संपूर्ण शिवलीलामृत पोथी वाचली तर अतिशय उत्तम. पूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर अध्याय २ रा किंवा अध्याय ११ वा नक्की वाचावा.
वरील विविध पर्यायांपैकी एक किंवा अनेक पर्याय निवडून तुम्ही सर्वांनी उपासना करावी म्हणजेच तो खरा उपवास (उप = जवळ, वास = रहाणे = देवाच्या जवळ राहणे ) ठरेल आणि सर्वांनाच मनःशांती लाभेल.
🚩